‘ऑर्डर ऑर्डर’ खुर्चीत बसत जज देशमुखांनी हुकूम सोडला आणि कोर्टात कुजबूज थांबली. ‘तुडुंब’ या शब्दालाही लाजवेल अशी गर्दी कोर्टात झालेली होती. सरकारी वकिल सुरेंद्र पाठक आपला कोट सावरत उठले आणि त्यांनी शांतपणे गर्दीवर एक नजर फिरवली. पत्रकारांची गर्दी तर होतीच होती, पण जास्ती गर्दी बॅ. धवल राजहंसच्या चाहत्यांची होती.
उजवा गाल तुच्छतेने उडवत सरकारी वकील बॅ. पाठक यांनी जज देशमुखांना अभिवादन केले आणि ‘ओपनिंग स्पीच’ला सुरूवात केली, ‘मिलॉर्ड, केस खरे तर अत्यंत साधी, सोपी आणि सरळ पण माणसातल्या जनावराला उघडे पाडणारी देखील आहे! पुरुषाची परस्त्रीसाठीची वासना त्याला किती नीच पातळीवर घेऊन जाऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे ही केस आहे. आरोपीच्या पिंजर्यात उभ्या असलेल्या या इसमाकडे पाहून वाटणार देखील नाही की, वासनेने लडबडलेला हा इसम त्याच्या उपकारकर्त्याचा विश्वासघात तर करणारा आहेच, पण त्याच्या खून देखील करायला त्याने मागेपुढे पाहिले नाही.
धवल उसळून म्हणाला, ‘ऑब्जेक्शन मिलॉर्ड! सरकारी वकिलांनी माझ्या अशिलाच्या चारित्र्यहननाचा जो घृणास्पद प्रकार चालवला आहे तो त्वरित थांबवावा! आणि कोर्टाचे मत विनाकारण कलुषित करू नये अशी माझी विनंती आहे!’
‘मिलॉर्ड… परस्त्रीवर वाईट नजर टाकणार्या आणि प्रसंगी तिला मिळवण्यासाठी खून करणार्याच्या चारित्र्याचे पोवाडे गायले जावे अशी आरोपीच्या वकिलांची इच्छा आहे का?’ बॅ. पाठकांनी तिरस्कारभरल्या शब्दांत विचारलं.
धवल तात्काळ उत्तरला, ‘आरोपी आणि गुन्हेगार यातला फरक तुम्हाला माहित नसावा याचे आश्चर्य वाटते बॅ. पाठक! गुन्हा सिद्ध तर होऊ द्या! मग तुम्ही अगदी तासभर गुन्हेगाराचे ‘गुण गाईन आवडी…’ केले तरी चालेल.’
कोर्टात खसखस पिकली आणि जजसाहेबांच्या हातोड्याच्या आवाजात विरळ होत गेली. जज म्हणाले, ‘सरकारी वकील आणि आरोपीचे वकील; दोघांना कोर्ट सांगू इच्छिते की, ते त्यांच्या चेंबरमध्ये चर्चा करत नसून, कोर्टात उभे आहेत. तेव्हा कोर्टाच्या मर्यादा पाळून कामकाज चालावे. एकमेकांशी हुज्जत न घालता, न्यायासनाच्या माध्यमातून आपली मतमतांतरे समोर आणावीत. बॅ. राजहंस ‘ओपनिंग स्पीच’ हे अत्यंत महत्त्वाचे असले, तरी फक्त सरकारी वकिलांनी आरोपीच्या चारित्र्याविषयी केलेल्या वर्णनावरून कोर्टाचे मत बनत नसते. कोर्ट हे कायम साक्षी-पुरावे पडताळूनच मत बनवत असते. माननीय सरकारी वकिलांनी वैयक्तिक टिपणी टाळून केसची पार्श्वभूमी समोर आणावी. ऑब्जेक्शन सस्टेंड!’
‘ऑब्जेक्शन सस्टेंड’ झाल्याच्या दु:खापेक्षाही, जज साहेबांनी राजहंसला झापले याचा आनंद पाठकांच्या चेहर्यावरून नुसता ओसंडून वाहायला लागला. आनंदाच्या भरात त्यांनी दोन हातांनी मस्त टिचकी वाजवली आणि मुद्द्यांना हात घातला.
‘मिलॉर्ड, आरोपीच्या पिंजर्यात एखाद्या संतमहात्म्याच्या चित्तवृत्तीने उभा असलेला हा इसम, प्रत्यक्षात किती पातळयंत्री आहे याचा लेखाजोखाच आज मी इथे सादर करणार आहे. मनोज पंडित, वय वर्षे अवघे तीस. लहानपण बालसुधारगृहात घालवले आणि तरुणपण तुरुंगात आत-बाहेर करत घालवत आहे. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी हा महान माणूस गर्दची वाहतूक करताना पकडला गेला, तेही शाळेच्या दप्तरातून. हे साहेब कधी शाळेत गेलेलेच नाहीत आणि कुठल्या शाळेत यांचे नाव देखील नोंदवलेले नाही हे समजल्यावर तर तपास अधिकारी देखील थक्क झाले. बालसुधारगृहात हे महाशय जरा जास्तच सुधारले आणि बाहेर पडल्यावर थेट सोन्याच्या तस्करीतच शिरले. बाई, बाटली, जुगार असे कोणतेच व्यसन याने सोडलेले नाही. तस्करीच्या गुन्ह्यात देखील तीन वर्षे सरकारी खोलीत मुक्काम करून आले.’ काही क्षण थांबून आपल्या बोलण्याचा ऑडियन्सवर किती परिणाम झालाय ते चाचपत बॅ. पाठकांनी उगाचच वातावरण अजून गंभीर बनवले.
‘या तीन वर्षाच्या काळात काय झाले, कसे झाले माहिती नाही, पण तुरुंगात याला एक महागुरू भेटला, आणि मन्याचा मनोजराव पंडित झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर साहेबांनी थेट झारखंड गाठले आणि तिथल्या एका खाणमालकाच्या; विकास दुबेच्या व्यवसायातच शिरकाव केला. तुरुंगातल्या याच्या महागुरूचे कोणतेसे उपकार म्हणे त्या खाणमालकावर होते आणि त्याची परतफेड त्याने थेट मनोज पंडितला १५ टक्के व्यावसायिक भागिदारी देऊन केली. वाल्याचा वाल्मिकी व्हायची सुवर्णसंधी चालून आली होती मिलॉर्ड… पण… हा पणच कलियुगात फार घातक असतो. सरळ आयुष्य कधी जगण्याचीच सवय नसलेल्या मनोज पंडितला हे सामान्य माणसाचे आयुष्य फारच मिळमिळीत वाटायला लागले होते. अशातच एक दिवस विकास दुबेने मनोजला घरी जेवायला बोलावले आणि सगळा घात झाला. विकासच्या बायकोवर, रेशमावर मनोजची नजर पडली आणि त्याच्यातला ‘कली’ जागा झाला. तिला मिळवण्यासाठी मनोजने अनेक कट कारस्थाने रचले, पण ती पतिव्रता दाद लागू देत नाही म्हणल्यावर पिसाळलेल्या मनोजने सरळ विकास दुबेलाच संपवले. अन्न देणार्याच्याच हाताला चावण्याचे हे घृणास्पद कृत्य कसे घडले ते पुराव्यानिशी कोर्टासमोर आणले जाईलच, मिलॉर्ड.’
बॅ. पाठक दीर्घ ओपनिंग स्पीच संपवत खाली बसले आणि जज देशमुखांनी सहेतुक नजरेने धवलकडे बघितले. बॅ. पाठकांनी अत्यंत मुद्देसूदपणे कोर्टातील प्रत्येकाच्या मनात मनोज पंडितची एक ‘नराधम’ अशी प्रतिमा तयार करण्यात जवळजवळ यश मिळवले होते म्हणा ना. त्यात ही पहिलीच केस अशी होती, ज्यात आरोपी निर्दोष आहे याची स्वत: धवललाच खात्री वाटत नव्हती आणि त्याचे निर्दोषत्व सिद्ध करणारा काडीचाही पुरावा हातात नव्हता. प्रचंड ओझे मनावर बाळगत धवल उभा राहिला…
‘मिलॉर्ड, ओपनिंग स्पीच हे खरे तर केसची मांडणी करण्यासाठी, पार्श्वभूमी समजावण्यासाठी असते. यातले ९० टक्के काम माझ्या बॅरिस्टर मित्रांनी पूर्ण केलेलेच आहे. आरोपीला निर्दोष सिद्ध करण्याचे काम माझे साक्षी-पुरावे करतीलच!’ दोन-तीन वाक्यात धवलने बोलणे संपवले. मात्र मनोज पंडित निर्दोष असल्याचा त्याचा आत्मविश्वास; बॅ. पाठकांनी अत्यंत प्रयत्नाने उभ्या केलेल्या मनोजच्या ‘नराधम’ प्रतिमेला एक तडा नक्की देऊन गेला होता. केस रंगणार आणि धवल काहीतरी जादू करणार हे नक्की होते.
‘इन्स्पेक्टर साबळे…’ पुकारा झाला आणि साबळेंनी स्टँड घेत सरावाने शपथ पूर्ण केली.
‘इन्स्पेक्टर साबळे, घडलेल्या गुन्ह्याबद्दल आणि तपासाबद्दल तुम्ही कोर्टाला काय माहिती द्याल?’
इन्स्पेक्टर साबळेंनी एकदा जज साहेबांकडे बघत मान तुकवली आणि बोलायला सुरूवात केली, ‘चार एप्रिलला सकाळी सकाळी चौकीत फोन आला की, खाडीत एक रक्ताळलेले पोते पडले आहे आणि त्यात मानवी शरीर आहे. मी आणि माझी टीम तातडीने तिथे पोचलो. धान्याच्या एका पोत्यात एक प्रेत कोंबून भरण्यात आले होते. मृतदेह पुरुषाचा होता आणि त्याला गोळ्या झाडून मारण्यात आले होते. मृतदेहाच्या पोत्यात अडकलेले एक तुटलेले शर्टाचे बटण आणि जवळच पडलेला एक लायटर यावरून आम्ही तपासाची चक्रे फिरवली. नशिबाने त्या लायटरच्या मागेच स्टिकरने एक मोबाईल नंबर चिकटवलेला होता, त्याचा आम्ही माग घेतला आणि मनोज पंडितच्या घरी पोचलो.’
‘आरोपी घरातच होता? त्याने गुन्हा लगेच कबूल केला?’
‘आम्ही त्याच्या घराची बेल वाजवल्यावर त्याला दरवाजा उघडायला तब्बल दहा मिनिटे लागली. रात्री खूप दारू प्यायल्याने पटकन जाग आली नाही, बेल ऐकायला आली नाही असे आरोपीने सांगितले. त्याला मृतदेहाचा फोटो दाखवल्यानंतर आधी आरोपीने त्याला ओळखण्यास नकारच दिला. मात्र त्याच्या घराच्या झाडाझडतीत आम्हाला मृत इसमाचा आणि आरोपी मनोज पंडितचा एकत्र फोटो सापडला, बंदूक सापडली आणि गुन्हा उलगडत गेला.’
‘दॅट्स ऑल मिलॉर्ड. गरज पडल्यास मला इन्स्पेक्टर साबळेंना पुन्हा बोलावण्याची परवानगी देण्यात यावी.’ जज देशमुखांनी होकार भरला आणि लांब ढांगा टाकत बॅ. पाठकांनी खुर्ची गाठली.
धवल मात्र चांगलाच विचारात पडला होता. बॅ. पाठकांनी इतकी महत्त्वाची साक्ष अशी अर्धवट का सोडली? हा नक्कीच एक सापळा होता. पण आता सापळ्यात शिरण्यावाचून गत्यंतरही नव्हतं. धवलने एकदा केस सावरत मनावरची निराशा झटकली आणि तो इन्स्पेक्टर साबळेंकडे वळला.
‘तर साबळे साहेब, तुम्हाला झडतीत आरोपी आणि मृताचा एकत्र फोटो सापडला, बंदूक सापडली त्यानंतर तो हबकला, त्याने गुन्हा कबूल केला आणि तुम्ही त्याला अटक केलीत. बरोबर?’
‘नाही… फोटो सापडल्यावर आरोपीने दोघांची ओळख असल्याचे मान्य केले. मात्र या खुनाशी संबंध असल्याचा त्याने साफ शब्दात इन्कार केला.’
‘म्हणजे तुम्ही त्याला फक्त संशयावरून अटक केली आहे?’
‘हो तुम्ही तसे म्हणू शकता. मात्र नंतरच्या चौकशीत अनेक पुरावे आणि साक्षीदारांपर्यंत पोचण्यात पोलिसांना यश आले आणि या सगळ्यांनी गुन्हेगार म्हणून एकाच व्यक्तीकडे बोट दाखवले… तो होता मनोज पंडित.’
‘दॅट्स ऑल मिलॉर्ड.’
‘सरकारी वकिलांनी पुढचा साक्षीदार बोलवावा..’
‘चाँद रावत…’ नाव पुकारले गेले आणि एका गुरख्याने आपल्या युनिफॉर्मसकट स्टँड घेतला.
‘तर मिस्टर चाँद रावत तुम्ही कुठे काम करता?’
‘मी दरवाजावर उभा असतो साहेब,’ रावतने निरागसपणे उत्तर दिले आणि जज देशमुखांसकट सगळे हास्यकल्लोळात बुडाले. इतका वेळ पसरलेला ताण हलका करायलाच जणू रावत आला असावा.
‘कुठे काम करता म्हणजे, कोणाकडे काम करता? मालक कोण? पत्ता काय?’ त्रासलेल्या सुरात बॅ. पाठक चित्कारले.
‘मी सुरतवाला साहेबांच्या बंगल्यावर असतो साहेब. जुन्या खाणीच्या बरोबर समोरचा बंगला आहे त्यांचा. तोच त्यांचा पत्ता पण आहे. मी तिथे काम करतो अन राहतो म्हणून माझा पत्ता पण तोच आहे,’ रावतने खुलासेवार उत्तर दिले आणि शांत झालेले कोर्ट पुन्हा गडगडले.
‘बरं बरं! आरोपीच्या पिंजर्यात उभ्या असलेल्या इसमाला तू आधी कधी बघितले आहेस का?’
‘आधी म्हणजे? त्याची गाडी धडकली त्याच्या आधी का, आजच्या आधी?’
बॅ. पाठकांनी शांतपणे रावतकडे पाहिले. आपण आपले डोके आपटावे, का रावतचे डोके फोडावे हा विचार बहुतेक ते करत असावेत.
‘आपण प्रश्न जरा बदलून विचारू रावत. तीन एप्रिलच्या रात्री तू आरोपीला पाहिलेस का? आणि कुठे पाहिलेस?’
‘ऐसा सिध्धा पुछो ना शाब! त्या रात्री अडीच पावणेतीनच्या सुमाराला बागेत धप्पकन आवाज झाला. नेहमीसारखा नारळ पडला असणार होता, पण उगाच शंका नको, म्हणून मी बंगल्याला एक फेरी मारून आलो. केबिनमध्ये शिरणार तोवर गेटसमोरून एक गाडी जोरात पुढे गेली आणि खाणीजवळ मोठा आवाज झाला. मी छोटे गेट उघडून बाहेर बघितले तर एक गाडी तिथल्या खांबाला धडकली होती आणि दरवाजा उघडून एक माणूस बाहेर येत होता. त्याला धड चालता पण येत नव्हते. मी माझ्या साथीदाराला तेनसिंगला बंगल्यावर नीट लक्ष ठेवायला सांगितले आणि खाणीकडे गेलो. प्रकाशात या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. याने धडपडत एक पोते बाहेर काढले आणि ढकलत खाणीकडे नेले. त्याच्या हातात एक पिस्तुल पण होते. जाताना त्याने मागे वळून पाहिले आणि बहुतेक त्याचे माझ्याकडे लक्ष गेले असे वाटून मी खूप घाबरलो आणि त्याची पाठ वळताच बंगल्याकडे पळत सुटलो.’
‘क्रॉस…’
धवलने उलटतपासणीला नकार दिला आणि आता आश्चर्य करायची वेळ बॅ. पाठकांवर आली होती. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हटल्यावर धवल आकाश पाताळ एक करून त्याला खोटे पाडण्याचा प्रयत्न करेल, निदान त्याच्या साक्षीविषयी शंका तरी उभी करेल असे त्यांना वाटले होते. विचारांमधून त्यांनी स्वत:ला सावरले आणि पुढच्या साक्षीदाराला कॉल दिला.
एका अत्यंत तेलकट माणसाने स्टँड घेतला.
‘तुमचे नाव? व्यवसाय?’
‘माझे नाव मीर अब्दुल्ला साहेब! मी सध्या ‘जन्नत’ बारला रात्रपाळीचा मॅनेजर आहे.’
‘आरोपीच्या पिंजर्यालत उभ्या असलेल्या इसमाला ओळखता?’
‘चांगलाच!’
‘कसे काय?’
‘दोन वर्षापूर्वीपर्यंत मी भडवेगिरी करायचो साहेब,’ गजरे किंवा चणे विकायचो अशा थाटात अब्दुल्ला बोलला अन संपूर्ण कोर्टाने ‘आ’ वासला.
‘त्याचा आणि तुमचा आरोपीशी असलेल्या ओळखीचा काय संबंध?’
‘आठवड्याच्या आठवड्याला त्याला पोरगी मीच पुरवायचो साहेब. जन्नतलाच तर पडलेला असायचा तो.’
बॅ. पाठकांनी एक गंभीर हुंकार भरला आणि जजसाहेबांकडे पाहिले. ‘तीन एप्रिलच्या रात्री तुमची आणि आरोपीची भेट झाली होती?’
‘नाही! पण चार एप्रिलच्या पहाटे तो जन्नतला दारू पार्सल घ्यायला आला होता,’ अब्दुल्ला चांगलाच मुरलेला पंटर होता हे नक्की.
‘तो तसा कायम यायचा?’
‘कल्पना नाही साहेब. तो तुरुंगातून बाहेर आला, तेव्हा मी ‘जन्नत’मध्ये कामाला सुरुवात केली नव्हती. त्यानंतर तो मुंबई सोडून गेला आणि मग भेटच झाली नाही.’
‘त्या रात्री जेव्हा तो दारू घ्यायला आला, तेव्हा काही विचित्र जाणवले? त्याच्या वागण्या-बोलण्यात?’
‘हो साहेब! तो आधीच खूप प्यायलेला होता, त्यात तो गाडी असूनही संपूर्ण भिजलेला होता. त्याच्या बुटांना प्रचंड चिखल लागलेला होता आणि तो खूप घाबरलेला वाटत होता.’
बॅ. पाठक पुढचा प्रश्न विचारणार, तोवर घड्याळाने दिवस संपल्याची हाक दिली आणि अब्दुल्लाची साक्ष अर्धवट राहिली. धवल मात्र एकटक अब्दुल्लाकडे पाहात शांत बसून होता.
रात्रीचे साडेबारा वाजायला आले होते अन् धवल शांतपणे आपल्या बंगल्यात येरझारा घालत होता. त्याच्या वकिली आयुष्यात तो पहिल्यांदाच येवढा दोलायमान अवस्थेत पोचला होता. हातात काही नसताना त्याने मनोजची केस स्वीकारली होती. पश्चाताप करायला लावणार का काय हा मनोज? त्याने गडबडीने फोन उचलला आणि अत्यंत विश्वासू अशा मदतनीसाला फोन लावला.
‘सेनापती… तू आणि तुझी माणसं लगोलग कामाला लागा आणि मी सांगेन त्या माणसांवर २४ तास पाळत ठेवा. त्यांच्या मिनिटामिनिटाची खबर माझ्यापर्यंत पोचली पाहिजे. आणि बाय हूक ऑर क्रूक एक व्यक्ती मला परवाच्या दिवशी कोर्टात हजर हवी आहे! तिला कशी आणायची ही जबाबदारी तुझी!’
घड्याळाच्या ठोक्यांबरोबरच जज देशमुखांचे आगमन झाले आणि ते स्थानापन्न होताच कोर्टातील इतरांनीही जागा पकडल्या. अब्दुल्लाची अर्धवट राहिलेली साक्ष पुन्हा सुरू होणार होती.
‘तर अब्दुल्ला, आरोपी तुझ्याकडे आला त्यावेळी तुझे आणि त्याचे काही बोलणे झाले?’
‘नाही साहेब. तो खूप घाबरलेला होता आणि सतत मागे वळून गाडीकडे बघत होता. मी दिलेली बाटली त्याने झडप घालून घेतली आणि तो निघून गेला.’
‘तो खून किंवा प्रेताच्या संदर्भात काही बोलला? किंवा त्याला काही महत्त्वाचे सांगायचे आहे असे वाटले का?’
‘ऑब्जेक्शन युवर ऑनर! सजेस्टिव क्वेश्चन!’
‘ऑब्जेक्शन सस्टेन्ड.’
‘दॅट्स ऑल मिलॉर्ड,’ बॅ. पाठक म्हणाले, आणि जणू त्या क्षणाचीच वाट बघत असलेल्या धवलने अब्दुल्लाचा ताबा घेतला.
‘अब्दुल्ला, तू म्हणालास की मनोज तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तुमची भेट झालीच नाही. बरोबर?’
‘एकदम बरोबर साहेब.’
‘मग तो मुंबई सोडून गेला हे तुला कसे समजले?’
‘आँ?’
‘अब्दुल्ला कानात दडे बसले का अचानक? रीडरला पुन्हा प्रश्न वाचायला सांगू का?’
‘नाही… म्हणजे ते एका कॉमन फ्रेंडकडून कळाले होते.’ अब्दुल्लाचा आवाज एकदम खोल झाला होता.
‘आणि मग इतक्या दिवसांनी अचानक जवळचा जुना मित्र समोर पाहून तू थक्क नाही झालास? मनोज थक्क नाही झाला? त्याने थांबून तुझी साधी विचारपूस देखील केली नाही?’
‘मी.. मी सांगितले ना की तो खूप घाईत होता आणि गडबडीत निघून गेला. मी देखील अर्धवट झोपेत होतो. तो दरवाजा पार करून जात असताना लक्षात आले की हा तर मनोज आहे.’
‘मग तू त्याला आवाज दिला असशील ना?’
‘दिला ना साहेब. पण बाहेरच्या पावसाच्या आवाजात तो बहुदा त्याच्यापर्यंत पोचला नसेल.’
‘म्हणजे बघ, मनोज असा गाडी बाहेर पार्क करून आत आला, सतत घाबरत मागे बघत त्याने दारूची ऑर्डर दिली आणि काउंटरवर पैसे आदळले. बाटली येताच ती घेऊन तो झपाटल्यासारखा बाहेर पडला. बरोबर? वर्णनात काही चुकतंय?’
‘अगदी सेम टू सेम असेच घडले साहेब!’
‘या सगळ्याला किती वेळ लागला असेल अब्दुल्ला? दहा मिनिटे? पंधरा?’
‘छ्या! दिवसाची कोणती पण वेळ असो, आपली सर्व्हिस एकदम क्विक असते साहेब. दोन मिनिटात बाटली घेऊन तो गेला पण.’
‘मग मला सांग अब्दुल्ला, या दोन मिनिटाच्या वेळेत, तू ऑर्डर घेतलीस, पैसे जमा केलेस अन बाटली पण आणून दिलीस. मग या सगळ्या गडबडीत आरोपीचे भिजलेले कपडे, त्याच्या चेहर्यावरचे भाव, पायातले बूट अन त्यांना लागलेला चिखल हे सगळे देखील मनात नोंदवलेस. तू माणूस आहेस का कॉम्प्युटर?’
अब्दुल्ला सुन्नपणे बॅ. पाठकांकडे पाहात उभा राहिला..
‘मिलॉर्ड, गरज पडल्यास मला या साक्षीदाराला पुन्हा उलट तपासणीसाठी बोलावण्याची परवानगी मिळावी.’
‘सरकारी वकिलांची हरकत नसल्यास, कोर्टालाही काही अडचण नाही!’ जज देशमुख बॅ. पाठकांकडे प्रश्नार्थक पहात म्हणाले.
‘नो ऑब्जेक्शन मिलॉर्ड.’
अब्दुल्लाने स्टँड सोडला आणि पांढर्या साडीतला एका पस्तीशीच्या महिलेने स्टँड घेतला. दिसायला तर ती देखणी होतीच पण तिच्याच एक वेगळेच आकर्षण देखील होते.
‘तुमचे नाव?’
‘रेशमा.. रेशमा दुबे…’
‘तुम्ही आरोपीला ओळखता?’
‘दुर्दैवाने! हा माणूस आमच्या सुखी आयुष्यात आला आणि सगळे काही बर्बाद झाले…’ रेशमाला अचानक हुंदका फुटला.
‘माफ करा, मला तुम्हाला त्रास द्यावा लागतोय, पण तुमच्या मिस्टरांच्या खुन्याला फासावर चढवायचे असेल, तर तुमची साक्ष फार महत्त्वाची ठरणार आहे. तुम्ही आरोपीच्या वर्तनाविषयी काही सांगू शकाल?’
‘जनावर.. शुद्ध जनावर आहे हा मनुष्य! मी कधीच माझ्या मिस्टरांच्या व्यवसायात आणि त्यासंदर्भातल्या निर्णयांमध्ये लक्ष घातले नाही. त्यामुळे या माणसाला त्यांनी काय म्हणून पार्टनर बनवले मला खरंच कल्पना नाही. मिस्टरांच्या बोलण्यात याचा बरेचदा उल्लेख असायचा. एका अभद्र दिवशी त्यांना याला घरी बोलावण्याची दुर्बुद्धी सुचली आणि आमच्या हसत्या खेळत्या संसारला नजर लागली. हा आल्यापासूनच याची नजर मला सतत बोचत होती. पुरुषाची वाईट नजर आम्हा बायकांएवढी कोणीच चांगली ओळखू शकत नाही! मी काहीतरी कारण काढून तिथून हलले. पण जेवत असताना देखील याची नजर सतत माझाच वेध घेत होती. हे सगळे इथेच थांबले नाही… त्यानंतर माझे मिस्टर घरी नसताना हा सतत काही ना काही कारण काढून घरी यायला लागला, माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. पण मी त्याला कधीच दाद लागू दिली नाही. एकदा तर मी सरळ त्याच्यावर हात देखील उचलला. त्यानंतर तो घरी येणेच बंद झाला.’
‘तुमच्या मिस्टरांच्या खुनाची बातमी तुम्हाला कधी आणि कशी समजली?’
‘३१ मार्चला आर्थिक वर्ष संपलं आणि एक एप्रिलला संध्याकाळी नेहमीप्रमाणे मिस्टरांच्या कंपनीत पूजा आणि छोटीशी पार्टी होती. त्याच रात्री माझे मिस्टर दिल्लीसाठी रवाना होणार होते. त्या पार्टीत देखील मनोजने माझ्याशी पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न केला; मात्र मी सुटका करून घेण्यात यशस्वी झाले.’
‘पुढे?’
‘पण मी यशस्वी झाले हा माझा भ्रम होता. त्याच्या मनात वेगळाच डाव चालला होता. रात्री माझे मिस्टर घरी नसण्याचा फायदा घेऊन हा घरात शिरला आणि याने माझ्यावर झडप घातली. मी खूप प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण माझी ताकद तोकडी पडली. नशिबाने चष्मा विसरल्याने माझे मिस्टर घरी आले आणि त्यांना पाहून हा पळाला. मिस्टरांनी मला सावरले आणि या नराधमाचे कृत्य कळताच ते त्याच्या घरी जाब विचारायला गेले. मात्र त्याआधीच हा मुंबईकडे पळाला होता. रागाच्या भरात मिस्टरांनी ड्रायव्हरला गाडी तशीच मुंबईकडे दौडवायला लावली. त्यानंतर काय घडले कल्पना नाही. पण तीन तारखेला यांचा फोन आला की ते सुखरूप आहेत आणि मनोज पंडितचा पत्ता मिळाला आहे. मी त्यांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला, पण ते ऐकायला तयारच नव्हते. त्यानंतर दुसर्या दिवशी थेट पोलिसांचाच फोन आला की…’ त्या आठवणीने देखील रेशमा गदगदून रडायला लागली.
‘दॅटस ऑल मिलॉर्ड.’
शांत पावले टाकत धवल साक्षीदाराच्या पिंजर्यापाशी उभा राहिला.
‘रेशमा… रेशमाच नाव म्हणालात ना?’
‘हो…’
‘तुमच्या मिस्टरांना गाडी चालवता येते?’
‘नाही. म्हणजे ते नुकतेच शिकायला लागले होते खरे तर…’
‘एकाच ड्रायव्हरच्या भरवशावर झारखंड ते मुंबई हे चाळीस तासांचं अंतर त्यांनी पार केलं असे म्हणायचं तुम्हाला?’
‘मी… म्हणजे मला काही कल्पना नाही. त्यांनी फक्त ओळखीच्या ड्रायव्हरला बरोबर घेतलंय एवढंच सांगितलं.’
‘मिलॉर्ड, पोलिस तपासात अशा कोणत्याही ड्रायव्हरचा उल्लेख नाही. एवढ्या महत्त्वाच्या व्यक्तीचा शोध घ्यायची गरज पोलिसांना वाटली नाही का?’
बॅ. पाठक लगबगीने उभे राहिले. ‘मिलॉर्ड, त्या ड्रायव्हरचा तपास चालू आहे. पण त्याला ओळखणारा एकमेव माणूसच मृत्युमुखी पडल्याने त्याच्या शोधात अडचणी येत आहेत.’
‘बॅ. पाठक, निदान पोलिसांनी दुबेंची गाडी तरी जप्त केली असेल?’
‘नाही बहुदा तो ड्रायव्हर गाडीसकट…’
‘मग कशाच्या भरवशावर तुम्ही ठामपणे सांगता की मिस्टर दुबे गाडीनेच प्रवास करून मुंबईत पोचले?’ धवल गरजला, ‘तुम्हाला ड्रायव्हर सापडत नाही, गाडी सापडत नाही… नक्की तपास तरी कसला केलाय पोलिसांनी?’
बॅ. पाठक मान खाली घालून न्यायाधिशांच्या खरडपट्टीची वाट बघत राहिले…
आता या सेशनला काय होणार? यावर कोर्टात जमलेल्या बर्याच जणांच्या पैजा लागत होत्या. एक मात्र नक्की, की प्रकरण दिसते तितके सोपे नाही आणि धवल नक्की हुकुमाचे पत्ते राखून आहे.
‘तर श्रीमती दुबे, पोलिसांचा फोन आल्यावर तुम्ही काय केलेत?’
‘मी मुंबईला धावले..’
‘तुम्ही धावत धावत मुंबईला पोचलात?’ धवलच्या प्रश्नाने रेशमा जरा कावरी बावरी झालेली दिसली.
‘मी विमानाने मुंबईला पोहोचले.’
‘तुम्ही याआधी कधी मुंबईला आल्या आहात?’
‘ऑब्जेक्शन मिलॉर्ड. माझे वकील मित्र नेहमीप्रमाणे चित्रविचित्र प्रश्नांची गुंतागुंत निर्माण करत, केसला वेगळेच वळण देत आहेत. त्यांना नक्की सिद्ध काय करायचे आहे?
‘मिलॉर्ड, मी खात्री देतो की, माझा प्रत्येक प्रश्न या केसची गुंतागुंत सोडवणारा असेल.’
‘ऑब्जेक्शन ओवररुल्ड!’ जजसाहेब म्हणाले, अन धवलनी रीडरला पुन्हा एकदा प्रश्न वाचायला सांगितला.
‘अं? नाही… मी पहिल्यांदाच आले आहे.’
‘अच्छा! मग तुमच्या घरापासून एयरपोर्टपर्यंत टॅक्सी बुक करणे, तिथून पुढल्या प्रवासाची म्हणजे मुंबईपर्यंतचे विमानाचे तिकीट बुक करणे ही सगळी कामे तुम्ही सराईतासारखी कशी पार पाडली? तेही आयुष्यातल्या अशा कठीण समयी?’
‘मी… म्हणजे मी एका ट्रॅव्हल एजन्सीची मदत घेतली.’
‘कोणत्या?’
‘ऑब्जेक्शन मिलॉर्ड! हे नक्की काय चालू आहे? श्रीमती दुबे या खुनाच्या नंतर अर्थात चार तारखेला संध्याकाळी मुंबईत पोचल्या याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. मृताची ओळख पटल्यावर त्याच्या घरी केलेला फोन देखील त्यांनीच उचलला होता. त्याचा अर्थ त्या तेव्हा झारखंडमध्येच होत्या!’
‘मिलॉर्ड, श्रीमती दुबे खुनाच्या वेळी तिथे उपस्थित होत्या असं सिद्ध करायचे नाहीये मला! मला फक्त एवढेच सिद्ध करायचे आहे की, श्रीमती दुबे प्रवासाची सगळी तयारी करून फक्त पोलिसांचा फोन येण्याची वाट बघत बसल्या होत्या. बरोबर ना श्रीमती दुबे?’ गर्रकन वळत धवलने प्रश्न केला आणि कोर्टातला दंगा जज देशमुखांच्या हातोड्याला देखील आवरणे कठीण झाले. बॅ. पाठक तर सुन्नपणे डोक्याला हात लावून बसून राहिले होते.
‘आरोपीच्या वकिलांना नक्की काय म्हणायचे आहे?’
‘जज साहेब, कोर्टाची परवानगी असेल, तर मी ही साक्ष मध्येच थांबवून एक छोटासा साक्षीदार बोलावू इच्छितो.’
‘परवानगी आहे.’
‘नाव?’
‘श्यामलाल शर्मा.’
‘तुम्ही कुठे काम करता?’
‘माझी स्वत:ची ट्रॅव्हल एजन्सी आहे. मी भाड्याने गाड्या देणे, ड्रायव्हर पुरवणे, विमान, ट्रेनची तिकिटे बुक करून देणे अशी कामे करतो.’
‘तुम्ही मी विनंती केल्याप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातल्या ग्राहकांची यादी आणली आहे का? आणली असेल तर मी तुम्हाला दिलेली नावे त्यात आहेत का, ते सांगाल का?’
शर्मांनी डोळ्यावर चष्मा चढवला आणि यादी उघडली. ‘सर, तुम्ही दिलेल्या नावांमधली सगळीच नावे या यादीत आहेत. या सगळ्यांची तिकिटे मीच बुक केली होती. चार तारखेला दुबे मॅडमसाठी मी तिकिट बुक केले होते आणि दोन तारखेला मिस्टर दुबे आणि पंडितांसाठी…’ शर्माचे वाक्य संपले आणि जज देशमुख देखील खुर्चीत सावरून बसले.
‘मिस्टर दुबे आणि पंडित या दोघांनीही एकाच विमानाने प्रवास केला होता?’
‘हो.’
‘दॅटस ऑल मिलॉर्ड!’ बॅ. पाठकांकडे बघत धवल म्हणाला. पाठकांनी अर्धवट खुर्चीतून उठत ‘आता काय राहिलंय विचारायचं?’ अशा थाटात उलटतपासणीत रस नसल्याची मान डोलावली.
‘श्रीमती दुबे, प्लीज पुन्हा स्टँड घ्या.’
‘श्रीमती दुबे, तुमच्या नवर्याचा खून होणार होता याची तुम्हाला कल्पना होती?’
‘काय मूर्खासारखा प्रश्न आहे हा?’ रेशमाचा चेहरा रागाने लाल झाला होता.
‘नाही, तुम्ही दोन तारखेलाच शर्मांच्या ऑफिसमध्ये चौकशी करून मुंबई विमानप्रवासाची माहिती मागितली होती, म्हणून विचारतोय.’ शांतपणे धवल म्हणाला.
‘मी असे काहीही केलेले नाही.’
‘दुबे मॅडम, माझ्याकडे झारखंड पोलिसांच्या मदतीने मिळवलेले टेलिफोन रेकॉर्डस आहेत. तुम्ही म्हणत असाल तर… बरं ते जाऊ देत. मला सांगा, तुम्ही मीर अब्दुल्लाला ओळखता का हो?’ या प्रश्नाचे उत्तर म्हणजे रेशमाचे चक्कर येऊन पडणे असेल, ही धवलला अपेक्षाच असावी… आणि ती खरंच कोसळली…
‘आय कन्फेस!’
ती काय बोलली हे लक्षात यायलाच सगळ्यांना तब्बल दोन मिनिटे लागली. काय बोलली ही बया? आय कन्फेस? गुन्हा मान्य?? कोर्टातला कोलाहल शांत करायला तब्बल पाच मिनिटे लागली.
धवलने खूण केली आणि सेनापतीची माणसे ‘मीर अब्दुल्ला’ला धरून कोर्टात घेऊन आली. धवल आता काय सांगतो, त्याची जज देशमुखांसकट कोर्टातल्या प्रत्येकाला उत्कंठा लागली होती. अपवाद फक्त दोघांचा…
‘मिलॉर्ड, ही केस दिसायला साधी सरळ असली, तरी तिच्या आतमध्ये प्रचंड गुंतागूंत भरलेली होती. दैवाचा खेळ कसा असतो बघा… मनोज पंडितला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि तुरुंगात त्याला भेटला काशीराम झा. मिस्टर दुबेंचा ड्रग्जचा व्यवसाय सांभाळणारा विश्वासू. आपल्या नवर्याचे हे दुसरे रूप रेशमाला देखील माहिती नव्हते हे विशेष. कोळशाच्या वाहतुकीच्या जोडीने दुबे अंमली पदार्थ देखील अगदी राजरोस ट्रान्सपोर्ट करत होता. मनोज त्याच्याशी जोडला गेला आणि मुंबईची बाजारपेठ विस्तारण्याची स्वप्नं दुबे पाहू लागला. पण इथे एक वेगळीच गंमत झाली. दुबेने मनोजला घरी जेवायला बोलावले आणि तिथे रेशमाला पाहून मनोज चाटच पडला. एकेकाळी ‘जन्नत’ सारख्या टुकार लॉजमध्ये वेश्याव्यवसाय करणारी ‘सुषमा’ आता ‘रेशमा’ बनून राजरोस नांदत होती. आता मनोज तिला पुन्हा एकदा उपभोगण्याची स्वप्ने पाहायला लागला, मात्र रेशमा त्याला दाद देत नव्हती. दोन एप्रिलला दुबे आणि मनोज दोघेही मुंबईला जाणार होते. मात्र यावेळी मनोजने आपला शेवटचा डाव टाकला. परत येताना तो दुबेच्या दोन दिवस आधी येणार होता. मात्र यावेळी त्याला रेशमाचा नकार नको होता. त्याने रेशमाला तंबीच दिली होती की, नीट विचार कर आणि तीन तारखेपर्यंत मला तुझा होकार कळव. अन्यथा तिचे खरे रूप दुबे समोर उघड करण्याची त्याने धमकी दिली. पैसा, श्रीमंती, रुबाब या सगळ्यालाच चटावलेली रेशमा आता मात्र हादरली. एकदा हो म्हणून थांबणार्यातला मनोज नाही हे तिला पक्के ठाऊक होते. पूर्ण विचार करून तिने निर्णय घेतला की, मनोजला संपवायचे. एकदा हा सैतान डोक्यात शिरल्यावर, रेशमाने विचार केला की, एक खून तिथे दोन खून करायला हरकत तरी काय आहे? मनोजच्या जोडीनेच दुबेही संपला तर? तसेही स्वैराचारी रेशमा हळूहळू म्हातार्या दुबेला कंटाळायलाच लागली होती. एक पैसा सोडला, तर तिच्या इतर कोणत्याही गरजा तो भागवू शकतच नव्हता. एकदा काय करायचे ते पक्के ठरल्यावर रेशमाला आठवण झाली, ती तिच्या जुन्या हितचिंतकाची. दुबेबरोबर पळून जाताना तिला त्यालाही चुना लावायला लागला होता, पण आता त्याचीच मदत मिळण्यासारखी होती हे तिला माहिती होते. रेशमाने मुंबईत बरीच फोनाफोनी करून अखेर अब्दुल्लाशी संपर्क साधलाच.
मनोज सध्या झारखंडच्या कोण्या व्यापार्याबरोबर अंमली पदार्थाचा व्यवसाय करतो त्याची कुणकुण अब्दुल्लाला होतीच. रेशमाचा फोन आला आणि आपल्यासमोर चक्क अलीबाबाची गुहाच उघडी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने रेशमाला सगळी कल्पना दिली आणि मग दोघांनी मिळून डाव टाकायचे ठरवले. ‘दुबे मरणार आणि त्याच्या खुनात मनोज फासावर जाणार’ असा बेत आखला गेला. मनोज आणि विकास मुंबईत मनोजच्याच जुन्या घरी राहात आहेत त्याचा पत्ता अब्दुल्लाने लावला. त्यानंतर रेशमाने पाठवलेल्या पैशातून त्याने एक पिस्तुल खरेदी केले. नशिबाने त्याच रात्री एका ‘डील’वरून मनोज अन विकासमध्ये चिक्कार वाद झाला होता. अगदी शेजार-पाजारपर्यंत आवाज पोचला होता. दोघेही बेसुमार प्यायले होते. अब्दुल्लाने या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले आणि विकासचा काटा काढला. एकदा का मनोजला विकासचे प्रेत सापडले की, तो काय करतो यावर त्यांची पुढची खेळी अवलंबून होती. सुदैवाने घाबरलेल्या मनोजने, आपल्यावर खुनाचा आळ येऊ नये, म्हणून प्रेतच नाहीसे करायचे ठरवले. रेशमाला तो कसेही गप्पा बसवू शकला असताच. पण त्याच्या पाळतीवर असलेल्या अब्दुल्लाने पुरावे पेरले आणि पोलिसांना खबर दिली. स्वत:देखील खोटी साक्ष द्यायला हजर झाला.
पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास केला, पण काही गोष्टी मला खटकत होत्या. ती प्रेताच्या पोत्यावर सापडलेली तुटकी गुंडी, ती ज्या शर्टाची होती, तो शर्ट मनोजच्या घरात न सापडणे, पोत्याजवळ फोन नंबर लिहिलेला लायटर सापडणे, अब्दुल्लाने मनोजचे केलेले वर्णन आणि मनोज वाईट नजर ठेवत असूनही रेशमाने नवर्याला त्याची कल्पना देखील देण्याचा प्रयत्न न करणे.. असे बरेच काही.
एकूणात काय तर सरळ दिसणारी ही केस निघाली मात्र विलक्षण!
– प्रसाद ताम्हनकर
(लेखकाचे गुन्हेगारी कथालेखनावर प्रभुत्व आहे)