(टोचन) – टोक्या टोचणकर
कोरोनाची साथ गेल्या वर्षी ऐन बहरात आली होती त्यावेळी आम्ही मीडियातज्ज्ञ मित्रमंडळींनी ‘कोरोना’ नावाचे चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. तो किती योग्य होता हे आज आम्हालाच काय जगाला कळून चुकले आहे. चर्वण पोस्वामी हे आमचे सल्लागार असल्यामुळे काहीच प्रश्न नव्हता.
यंदा तर पंतप्रधानांनी ‘लस उत्सवा’ची पर्वणीच दिली. एकीकडे देशात ‘कोरोना’बळींची संख्या वाढत असताना असा उत्सव साजरा करणे हे विसंगत वाटत असले तरी विसंगतीत सुसंगती पाहणे हे केंद्र सरकारप्रमाणे आमच्या चॅनेलचेही वैशिष्ट्य आहे. केंद्राने अपयशाचे खापर राज्यांवर फोडले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी तर देशात कुठेही लसींचा तुटवडा नाही, असे हर्षोत्फुल्ल चेहर्याने सांगितले होते. आम्ही आमच्या चॅनेलच्या प्रमुख संचालक ढमढेरेबाईंना याबाबत सांगितले तर त्या आमच्यावरच उखडल्या. त्या म्हणाल्या, मी त्यांच्या भक्त मंडळींपैकी आहे हे तुम्हाला माहीत नाही का? आज त्यांच्या सर्वेसर्वा प्रमुख नेत्यांच्या जिवावरच मी हा डोलारा उभा केला आहे. त्यांचे काहीही खोटे असले तरी ते खरे म्हणून रेटून सांगणे, त्यांच्याविरुद्धच्या बातम्या दाबून टाकणे, त्यांची सत्ता असलेल्या राज्यात कोरोनाने उडवलेला हाहाकार लोकांपर्यंत न पोहोचविणे ही आपली राष्ट्रीय कर्तव्यं आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात याबाबत तर बोलूच नका.
– मॅडम, देशात कोरोनाचे भयावह चित्र असताना हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळाव्याला त्या सरकारने परवानगी दिलीच कशी? १७ लाख ३३ हजार साधू तिथे शाही स्नानांसाठी जमले होते. त्यातील एक हजाराहून जास्त भाविकांना कोरोनाबाधा झाली. मध्य प्रदेशच्या महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी कपिल देव यांना कोरोनाबाधा होऊन त्यांचे निधन झाले. शेकडो कोरोनाबाधित रुग्णालयात दाखल आहेत. मग हे आम्ही दाखवायचे नाही?
– माणसे कोरोनाने मरत नाहीत तर वय झाल्यामुळे मरतात हे मध्य प्रदेशचे पशुपालन मंत्री प्रेमसिंह पटेल यांचे वक्तव्य तुम्ही वाचले अथवा ऐकलेले दिसत नाही. तुम्ही असे करा की आता ताबडतोब माझ्यासमोर त्यांची या विषयावर ऑनलाइन मुलाखत घ्या. हां. व्हा. सुरू.
– नमस्कार प्रेमसिंहजी.
– नमस्कार.
– आप पशुपालन मंत्री हैं ना?
– हां, जी.
– आपको पशू बहोत प्यारे लगते हैं क्या?
आपके मंत्रिमंडल में कितने पशु है?… (मॅडम डोळे वटारते)
सॉरी, मैं क्या बोलता हूं, कोरोनामुळे होणारे मृत्यू कोणी रोखू शकत नाही, असे आपण का म्हणालात?
– मै डॉ. झिडे गुरुजींका शिष्य हूं. उन्होने सच ही कहा है की कोरोना आणि मृत्यूचा काहीही संबंध नाही. वय झाले किंवा वेळ झाली की माणूस मरतो. हे मृत्यू सरकारच काय कोणीच रोखू शकत नाही.
अहो, पण तुमच्या मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांना बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा आहे. स्मशानात अंत्य संस्कारांसाठी रांगा लागत आहेत आणि तुम्ही वयाची भाषा करता? मरणारांमध्ये तरुण मंडळीही मोठ्या प्रमाणावर आहेत.
– तरीही मी माझ्या मतावर ठाम आहे. आमचे नेते आणि आमची भक्त मंडळीही ठाम आहेत.
– पण जिथे तुमच्या पक्षाची सरकारे आहेत तिथे तर ‘कोरोना’चा कहर आणि कोरोना बळींची संख्या अफाट आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि तुमच्या पक्षाची सत्ता असलेल्या इतर राज्यांमध्ये तर कोरोना रुग्णांच्या बाबतीत होणारी पिळवणूक असह्य आहे. गुजरातमध्ये तर एका रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी कार गहाण ठेवल्यावर त्यांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. अनेक रुग्ण तर सरकारी इस्पितळात बेवारशासारखे जमिनीवर, टाकलेले आहेत. तुमच्या मध्य प्रदेशात तर एकच ऑक्सिजन आलटून पालटून अनेक रुग्णांना लावतात त्यामुळे रूग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.
– मी म्हटलं ना, मृत्यू कोणी टाळू शकत नाही. तो कशाच्या ना कशाच्या रूपाने येतोच. तो कोरोना असतोच असे नाही.
– मग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोना नाही तर काय झाले आहे?
– ते योगीपुरुष आहेत. इतरांची दु:खे आपल्या अंगावर ओढून घ्यायची त्यांची जुनी सवय आहे. एक लक्षात घ्या. मृत्यूची लाट ही जागतिक समस्या आहे. योगीजी सांगतात, जन्माला येणारा प्रत्येक माणूस मरणारच असतो. जन्माला येताना आपण आनंदोत्सव साजरा करतो, पण मृत्यू झाल्यावर शोक व्यक्त करतो. मात्र काही समाजात आणि पंथात मृत्यूचाही उत्सव साजरा करतात. ते मृतदेह वाजत गाजत आनंदाने नाचत गात नेतात. कारण त्यांना जीवन आणि मृत्यू यातला फरत समजलेला असतो. तुमच्या ‘कोरोना’ चॅनलवरून हाच विचार तुम्ही मांडा. तुम्हाला जगातून प्रतिसाद मिळेल.
– मी आमच्या ढमढेरेबाईंना विचारतो. आपण आपले अमूल्य विचार मांडल्याबद्दल धन्यवाद…. आता ओव्हर टू ढमढेरे मॅडम.
– चांगली झाली हं मुलाखत. मला वाटलं पटेल हा डॉ. झिडे गुरुजींइतकाच विद्वान वगैरे असेल. पण नक्कीच नाही. ज्यांची अक्कल गुडघ्यात असते ना, असे लोक मला ओळखता येतात. उगाच आपले चमकोगिरी करण्यासाठी काहीही अक्कल पाजळतात. शेवटी, चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी आपल्याला काही सनसनाटी विषय हाताळावे लागतात. पुढच्या आठवड्यात आपण आपली ‘कोरोना’ चॅनल टीम चीनला पाठवणार आहोत. तिथून अमेरिका ते बांगलादेश असा दौरा असेल. तिथली स्मशाने तुम्ही कव्हर करायची आहेत. त्यावर आपण एक खास कार्यक्रम करणार आहोत. त्या विषयावरती तिथल्या पंतप्रधानांपासून स्मशानातील कर्मचार्यांसह अनेकांच्या मुलाखती घ्याव्या लागतील. उद्या अनाउन्समेंट करा.
– मॅडम, बाहेर ते तडफडवीस केव्हापासून बसले आहेत. त्यांना कसली तरी उत्तर क्रिया… सॉरी प्रतिक्रिया द्यायची आहे. घेऊ ना आतमध्ये?
– घ्या ना घ्या. ते आहेत म्हणून आपण आहोत, हे विसरू नका.