गेले काही दिवस घरात उत्सवी वातावरण आहे. मला काही बोलू नका, मला काहीही काम सांगू नका, मला आंघोळ करायला सांगू नका, मला कोणत्याही गोष्टींचा जाब विचारू नका अशा अविर्भावात लेक बसला आहे-बसला आहे, म्हणजे शब्दशः गेले दोन दिवस संगणकासमोर गाणी ऐकत बसला आहे. या त्याच्या आविर्भावाच्या मागे दहावीचा गड सर केल्याची मस्ती आहे. लढाई न लढता युद्ध जिंकल्याची भावना आहे. मी त्याला जोरात आवाज काढून सांगितलंय की मुकाट्याने आंघोळ करून ये आणि कपडे वाळत घाल आणि नंतर विजय साजरा कर. पण खरं सांगायचं तर मलाच फार फार बरं वाटतंय. लेक दहावीत असल्याचे माझ्यावर एक सामाजिक दडपण होते, ते दडपण आता थोडे कमी झाले आहे. आपण दहावीत किती दिवे लावले आहेत, हे त्याला कुठं माहितीए असा समज फोल आहे, कारण मला दोन मोठ्या बहिणी आहेत आणि मी दहावीला काय दिवे लावलेत याची जाणीव त्या करून देतात.
लेकाची नववीची परीक्षा सुरू असतानाच लॉकडाऊन झाले आणि दीडेक महिना घरात बसून शिकूयात, मग शाळेत प्रत्यक्ष जाऊयात हा त्याचा समज फोल ठरला. दहावीचे वर्ष म्हणजे शाळेत कल्ला करायचाय, स्पर्धा, गॅदरिंग, सगळं सगळं एन्जॉय करायचं अशी स्वप्नं धुळीला मिळाली. पण लेकाच्या भाषेत हे सगळे फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स होते. आपल्या भाषेत भरल्या पोटाच्या चिंता. त्यामुळे मला घरी बसल्याबसल्या काही त्रास होत नाही अशी घोषणा त्याने केली. त्याच्या बोलण्यात तथ्य होतंच. पण मग मला शंका आली की त्याला फक्त त्रास होत नाही, असं नाहीए, तर तो घरातली शाळा अति एन्जॉय करतोय. मी आजूबाजूला वावरत असले की शाळेतील दृष्य दिसायचे, आणि चेहर्यावर गंभीर भाव. आणि दूर गेले की चिरंजीव स्वतःशीच हसताना किंवा जोरजोरात की बोर्ड बडवताना दिसायचे. नंतर लक्षात आले की मागल्या बेंचावर बसणार्या विद्यार्थ्यांची संघटना इथे ऑनलाइनसुद्धा जोरात सुरू आहे. वर्ग सुरू असताना साहेब न थांबता मित्रांशी बोलत होते.
अभ्यासक्रम शिकवून संपला आणि पेपर सोडवण्याचे सत्र सुरू झाले. माझ्या खोलीच्या बाहेर लेकाची अभ्यासिका. तुला त्रास नको म्हणून दार लावून घेतो म्हणून लेक माझ्या रूमचे दार नीट ओढून घेऊ लागला. मी कधीही बाहेर आले की त्याचे पेपर वाचणे सुरू असायचे. इतकेच नाही तर पेपरचे पानही बदललेले नसायचे. मला शंका आली आणि हेडफोनची वायर काढली तर समोर प्रश्नपत्रिका ठेऊन लेकाची संगीतसाधना सुरू होती हे लक्षात आले. आता असे विद्यार्थी असले तर शिक्षिका बिचार्या काय करणार? बरं मनातले विचार मोकळेपणाने व्यक्त करायची मुभा आईवडलांनी दिली असल्याने, अरे अभ्यास अजून का करत नाहीस, असे शिक्षिकेने (ऑनलाइन सत्रात) विचारल्यावर ऑनलाइन शाळेत मला लक्ष केंद्रित करता येत नाही असे बाणेदार उत्तर कार्ट्याने दिले. शिक्षिकेने शेकडो विद्यार्थ्यांना शिकवले असल्याने तिला काही फरक पडला नाही आणि तिने सांगितले की, आता घरच्या घरी बसून शाळेत हजेरी लावता येते ही तुला मिळालेली संधी आहे की तुझ्यासमोरची समस्या आहे, हे तू स्वतः ठरव. हे सांगणार्या शिक्षिका लॉकडाऊन लागायच्या आधी कधी स्वतः ऑनलाइन क्लासेस घेत नव्हत्या. पण त्या आणि त्यांच्यासारख्या शेकडो, हजारो शिक्षिका शिक्षणाचे हे नवे माध्यम, नवी भाषा शिकून क्लासेस घेत आहेत. सगळ्या मुलांना समजावून घेत अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. त्यात दहावीचे विद्यार्थी त्यांच्या दृष्टीने स्पेशल. इतर मुलांना वेळेचे बंधन, पण या मुलांना कोणत्याही शंका आल्या की त्याची उत्तरं द्यायला सदैव तयार. पण माझा लेक आधीपासूनच शिक्षकांना कशाला त्रास द्यायचा या मताचा आहे, आणि शंका तर त्याला येतच नाहीत.
या सगळ्या गोंधळात एक वर्ष निघून गेले आणि माझी अस्वस्थता वाढली. शाळेत प्रत्यक्ष परीक्षा गरजेची आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी लायक नाही. कारण परीक्षापध्दती आणि प्रगती करण्यासाठी तिचा उपयोग या बद्दल मला माहिती नाही फारशी. पण मुलांना काय, मोठ्यांना काय- रोज ठराविक दिनक्रम असला तर फायदेशीर असते असे मात्र मला वाटते. ऑनलाइन आयुष्यात तर रूटीन फारच फायदेशीर. वर्षाचा अभ्यासक्रम संपला तरी परीक्षा होईपर्यंत तोच अभ्यासक्रम घोटत राहायचे ही गोष्ट लेकाला पचत आणि पटत नव्हती हे दिसत होते, मात्र परीक्षा द्यायचा उत्साह होता. पण दरवर्षी मार्चमध्ये उरकल्या जाणार्या परीक्षा एप्रिलमध्ये झाल्या नाहीत आणि मेमध्ये होतील अशी घोषणा केली असली तरी परिस्थिती इतकी चिघळली आहे की त्या होणे अवघड आहे हे दिसत होते. त्यातच राज्य माध्यमिक मंडळाने परीक्षा पुढे ढकलल्या आणि सीबीएसई मंडळाने परीक्षा रद्द केल्या आणि ज्यांना तरीही परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांना परीक्षा देण्याच्या मार्ग खुला ठेवला. चिरंजिवाने आयसीएसई मंडळाच्या घोषणेची वाट न पाहता सेलिब्रेशन सुरू केले. नंतर यथावकाश त्यांच्या मंडळाने सीबीएसईचाच कित्ता गिरवला. पण लेकाचे वैशिष्ट्य हे की शाळेने काहीही सूचना दिल्या नसताना सेलिब्रेशन सुरू केले. बरं त्याची भाषा बघा, माझी परीक्षा रद्द झाली आहे किंवा पुढे ढकलली आहे असे न म्हणता, ‘माझी दहावी आता संपली. मला दहावी झाल्यानंतरच तुम्ही काहीतरी बक्षीस देणार होता, (हे कधी ठरले हे त्यालाच माहित) ते बक्षीस मला द्या,’ हे ठणकावून सांगायलाच सुरुवात केली आहे. पण मी पण त्याचीच दुष्ट आई आहे, त्यामुळे बारावीनंतर काय करणार आहेस हे सांग नाहीतर तुला काही मिळणार नाही, असे सांगायचा प्रयत्न करते आहे, पण माझा आवाज क्षीण आहे, आणि माझ्या बोलण्यात दम नाही. पण त्याच्या डोळ्यात चमक आहे, शाळा संपली आहे, आणि त्याचा आजचा क्षण सोन्याचा आहे.
– भक्ती चपळगावकर
(वर्तमानपत्रांत, वृत्तवाहिन्यांमध्ये अनेक पदांवर काम केल्यानंतर लेखिका आता मुक्त पत्रकार आहेत.)