• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

विजय कृष्णकुमार चव्हाण…

(ब्रेक के बाद) - पुरुषोत्तम बेर्डे

पुरुषोत्तम बेर्डे by पुरुषोत्तम बेर्डे
April 22, 2021
in भाष्य
0
विजय कृष्णकुमार चव्हाण…

टुरटूर नाटकातल्या कलाकारांची जमवाजमव हा माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय कालखंड…
जानेवारी १९८३ची आठ तारीख वगैरे असेल… टुरटूरच्या रिहर्सल्स सुरू झाल्या होत्या… विजय कदमसह लक्ष्मीकांत बेर्डे, चित्रा पालेकरसह सुधीर जोशी अशी कास्टिंग आधीच झाली होती… लक्ष्या आणि विजय कदम लिहितानाच डोक्यात होते… चित्रा पालेकर, सुधीर जोशी यांची कास्टिंग नाट्यपूर्ण रीतीने झाले… `या मंडळी सादर करू या’ या आमच्या हौशी संस्थेतले विजू केंकरे, पकी निमकर आणि मंग्या तराळकर (मंगेश दत्त : गायक) हे होतेच. विजू केंकरे एकपाठी आणि प्रचंड स्मरणशक्तीचा, म्हणून त्याला स्टेपनीच्या रूपात वापरायचे ठरवले… कोणत्याही रोलसाठी तयार राहा म्हटले होते… या सर्वांना रिहर्सलला बोलावले पण भूमिका ठरवल्या नव्हत्या… हक्काने बोलावले होते त्यांना…
आता आणखी चार मुलं हवी होती… चांगली हवी होती… मी अस्वस्थ होतो… पहिलेच व्यावसायिक नाटक… शिवाय निर्माताही मीच.. त्या दिवशी गोट्याला (सावंत) सकाळी फोन केला…
मी : गोट्या, आज तू काही मुलं बोलवतोयस ना?
गोट्या : एकच आणतोय… बापूंच्या (आत्माराम भेंडेंच्या) नाटकात आहे… चेतन दळवी नाव आहे त्याचं… पण विज्या पण आणतोय एकाला… त्याच्या कॉलेजातला आहे… रूपारेलचा…
मी : अरे वा… मस्तच… पण याआधी काम केलंय ना त्याने?
गोट्या : ते तू विज्यालाच विचार…
मी : ओके…
विज्या फ्रीलान्स फोटोग्राफर होता… कॅमेरा घेऊन कुठे हुंदडत असणार कोणास ठाऊक… तरी मी आयएनटीत फोन केला…
मी : पुरू बेर्डे बोलतोय… विजय कदम आहे का तिकडे?
पलीकडून : एक मिनिट… विजय एएए…
मग विजय : हॅलो… बोल…
मी : अरे तू संध्याकाळी कोणाला तरी आणतोयस ना?
विज्या : अरे तो माझा क्लासमेट आहे… आमच्या रूपारेलच्या नाटकात होता… शिवाय आमच्या रंगतरंग संस्थेच्या शफाअतखानच्या `आणि वशा प्रेमात पडला’ या एकांकिकेत होता… बेस्ट अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड विनर आहे…
मी : हो? चालेल. आण…
रिहर्सलला विजू केंकरे पोचला होता…
विजू : अरे बाळा (म्हणजे मी), विजय कदम एक मुलगा घेऊन येतोय… मिलमधला आहे…
मी : मिलमधला? नाही रे… रूपारेलचा आहे…
विजू : होता… आता मिलमध्ये आहे… परवाच मी त्याच्या मिलचं नाटक बघितलं…
मी बुचकळ्यात… हा कोणीतरी वेगळा असेल…
सुधीर, चित्रा, पकी, मंग्या आले… लक्ष्याबरोबर एक जण आणि विज्या कदमबरोबर एक असे दोघे आले.. लक्ष्याने ओळख करून दिली… `हा चेतन दळवी… बापूंच्या नाटकात आहे…’
मी स्क्रिप्ट दिली… चेतनला वाचायला सांगितले… मराठी माणसाचा रोल वाचायला दिला… वाचताना चेतनला घाम फुटला… अडखळत धडपडत वाचत होता… लक्ष्या अस्वस्थ झाला… सुधीर जोशी त्याला ओळखत असावा… त्याच्या वाचनाला दात काढून हसत होता… चेतन आणखी कॉन्शस झाला…
गोट्या : बाळा… जरा इकडे ये…
त्याचं वाचन थांबवायला सांगून गोट्या मला बाजूला घेऊन गेला…
गोट्या : बाळा, तो इंग्लिश मिडियमचा आहे… तू त्याला मराठी माणूस नको बनवूस…
मी : का? मी करून घेईन त्याच्याकडून… छान पर्सनॅलिटी आहे त्याची… मराठी शोभेल…
गोट्या : नको.. ही भाषा त्याच्या तोंडात बसायला एक महिना लागेल त्याला… शिवाय कोकणी आहे तो गोव्याचा… सरदारजी करू या त्याला…
मी : सरदारजी? गोटु, अरे ती तर आणखी कठीण भाषा… पंजाबी छाप मराठी बोलायचंय… त्यापेक्षा मग गुजराती करू या…
गोट्या : जमेल त्याला… बेसिकली तो मेडिकल रिप्रेझेंटटिव्ह आहे… डॉक्टर आणि डीलर्समध्येच असतो… मराठी सोडून काहीही कर… सॉलिड फ्लेक्झिबल आहे… मला माहिताय… मी काम केलंय त्याच्याबरोबर… बघ… तुला योग्य वाटेल ते कर…
चेतनने रिक्वेस्ट केली… मला थोडा वेळ द्या… सरदार करूनच दाखवतो… स्क्रिप्ट घेऊन चेतन बाजूला गेला…
पुरू… हा विजय चव्हाण… आमच्या एकांकिकेत होता… विजय कदमने ओळख करून दिली…
मोठे बोलके डोळे… कुरळे केस… मोनालिसा टाइप हसरा चेहरा… मिश्किलता जरा जास्तच… शिडशिडित बांधा… दोन्ही गालांवर मुरमं…
मी : मराठी वाचता येतं?
तो : म्हणजे?
चेतनमुळे उगाचच मी विचारले…
अरे, मुन्शीपाल्टीपास्नं रूपारेलपरेन एकाच शाळेत आम्ही दोघे… इंग्लिश बोलायला सांगितलंस तर पळून जाईल… विजय कदमने त्याची वकिली केली…
ठिकाय… तुला पाहिजे ते वाच यातलं… ड्रायव्हर-कंडक्टर आणि मास्तर सोडून…
विजय : थोडं वाचून बघू?
मी : बघ…
थोड्या वेळाने चेतनने सरदारजी बोलून दाखवला… अगदी सराईतपणे पंजाबी मराठी… धम्माल… मी ताबडतोब ओके केला… गोट्याच्या जिवात जीव आला…
विजय चव्हाणने जो गुजराती केला, त्याने तिथे उभे असलेले सगळेच हसत होते… डोळे मोठ्ठे करून तोंडाचे विचित्र हावभाव करून विजयने जबरदस्त गुजराती इम्प्रोवाईज केला…
सुधीर जोशी जवळ येऊन म्हणाला, बाळा, हे दोघे जबरदस्त आहेत… घेऊन टाक यांना…
…आणि विजय दत्तात्रेय कदमने आणलेला विजय कृष्णकुमार चव्हाण व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पणासाठी सिद्ध झाला…

पहिला ब्रेक
टुरटूरचे प्रयोग सुरू झाले… विजय हळूहळू सर्वांमध्ये मस्त मिक्सअप झाला… त्यात विजय कदम आणि तो बालमित्र… लालबागला भारतमाता थेटराच्या आसपास राहणारे… द्वाडपणा दोघांच्याही अंगात ठासून भरलेला… रिहर्सलचा मधला वेळ धमाल करण्यात निघून जायचा… मी ती सवलत मुद्दाम दिली होती… जेजेच्या स्टडी टूरवर आधारित एकांकिका आम्ही कॉलेजमधल्या, सतत एकत्र असलेल्या वर्गमित्रांनी मिळूनच केली होती… आता ती नाटकाच्या स्वरूपात व्यावसायिक रंगभूमीवर नवीन मुलांना घेऊन येत होती… त्यांचं आपसात कमालीचं उत्तम ट्यूनिंग होणं अत्यंत गरजेचं होतं… चित्रा पालेकर सर्वात सिनियर… पण तीसुद्धा मस्त अ‍ॅडजस्ट झाली सर्वांमध्ये… इतर मुलांमध्ये विजू केंकरे (बंगाली) संदीप कश्यप (मद्रासी), प्रकाश निमकर (सिंधी), हरीश तुळसूलकर (मराठी) दीपक शिर्के (काळा, उंच, धिप्पाड), चेतन दळवी (सरदार) आणि विजय चव्हाण (गुजराती)… या सगळ्यांची रिहर्सलाला आणि त्याव्यतिरिक्तही धमाल चालायची…
टुरटूरचा पहिला बाहेरगावचा प्रयोग म्हणजे नाशिकचा प्रयोग… तोपर्यंत मुंबईत आठ प्रयोग झाले होते. बुकिंग अजिबात नव्हते, पण उत्साह दांडगा होता… नाटकाच्या बसेस या नाटक कंपनीच्या स्वत:च्या बसेस असत… आजही आहेत… पण तेव्हा मोजक्याच होत्या… चंद्रलेखा, कलावैभव, माऊली प्रॉडक्शन, भद्रकाली प्रॉडक्शन अशा मोजक्या … आम्हाला त्यादिवशी एकही बस शिल्लक नव्हती… जायचं कसं हा प्रश्न होता… शिवाय त्या दिवशी दुपारी चार वाजता शिवाजी मंदिरला सुधीर जोशीच्या `जोडीदार’ नाटकाचा प्रयोग होता. तो संपल्यावर आमचा मॅनेजर दिलीप जाधव (आताचा अष्टविनायक संस्थेचा यशस्वी निर्माता) त्याला टॅक्सीने घेऊन येणार होता… आम्हाला वेगळी पर्यायी योजना करावी लागली…
तेवढ्यात विजय कदमने बातमी आणली… विजय चव्हाणच्या मामाची ट्रॅव्हल कंपनी आहे… त्यांच्याकडे असेल बस… चव्हाण आणि कदम बस बुक करायला गेले… ती नेमकी १८ सीटर बस होती आणि आम्ही सगळे मिळून २२जण… तरी म्हटले या घेऊन… त्यात वरती नेपथ्याचे पडदे टाकले… आत सामान ठेवले… कसेबसे बॅकस्टेजवाले आणि चार आर्टिस्ट त्यात कोंबले… तशात ड्रायव्हर म्हणाला `हिच्यात जास्त माणसं नका बसव… गाडी ताशी ५० किलोमीटरच्या फुडे भागनार नाय…’ बस छोटी, त्यामुळे बाप्पा (दीपक शिर्के) त्यात मावेना… कदम आणि चव्हाण यांनी बाप्पाला कंपनी म्हणून मिळेल त्या वाहनाने पुढे व्हायचे ठरवले आणि ते निघाले…
इकडे दिलीप जाधवने एक अँब्युलन्स अरेंज केली… म्हणाला, यातून पुरू, लक्ष्या, चित्रा, केंकरू, चेतन, पकी निमकर आणि मंग्या वगैरे जा… मी सुधीरला घेऊन पोचतो साडेनऊपर्यंत टॅक्सीने… अँब्युलन्समधून जायचं तर मुंबईबाहेर पडेपर्यंत पेशंट म्हणून कोणीतरी स्ट्रेचरवर झोपा म्हणून ड्रायव्हर अडून बसला… चित्रा तयार झाली… तिने एक जाडजूड इंग्रजी पुस्तक वाचायला आणले होते… म्हणाली, `डोंट वरी… झोपते मी. पुस्तक वाचत रिलॅक्स होईन… ड्रायव्हरच्या बाजूला वॉर्डबॉय म्हणून मंगेश दत्त बसला… मी, पकी, चेतन आणि लक्ष्या चित्राचे नातेवाईक म्हणून तिच्या कडेला बसलो… आणि अशा प्रकारे टुरटूरचा पहिला विस्कळीत दौरा नाशिकला निघाला…
स्वत:च्या मामाची गाडी असूनसुद्धा विजय चव्हाण मित्रासाठी म्हणजे विजय कदमसाठी, आणि विजय कदम बाप्पासाठी मिळेल त्या वाहनाने निघाले… त्यांना चेंबूर नाक्यापासून बस मिळेल अशी अपेक्षा होती… बराच वेळ ती मिळेना… शेवटी एक ट्रक मिळाला… त्यात पुढे ऑलरेडी क्लिनर आणि एकजण बसला होता… त्यामुळे दोन्ही विजय टपावर बसले… ड्रायव्हर बाप्पाला टपावरही घेईना… त्याच्या वजनाने टप खाली येईल म्हणून… बाप्पाने दोघांना धीर दिला… तुम्ही पुढे निघा, मी बघतो दुसरं काहीतरी… ट्रक निघाला… दोघे टपावर… वारा खात… दोघांच्या मनात एकच… बिचारा बाप्पा कसा येत असेल? … ट्रक पुढे हायवेला लागला… एक वाजता निघालेल्या १८ सीटर बसला ट्रकने इगतपुरीला मागे टाकले… बस ४०, ५०च्या स्पीडने सरपटत होती… त्यातल्या मुलांना टाटा करून ट्रक पुढे निघाला… तेवढ्यात शेजारून एक मर्सिडीज जाताना दिसली… तिच्या पुढच्या सीटवर बाप्पा म्हणजे दीपक शिर्के ऐटीत बसला होता… स्साला काय ह्याचं नशीब… ह्याला लिफ्ट मिळाली तीपण मर्सिडीजमध्ये? अभिनंदन म्हणून दोघांनी त्याला टाटा केलं… बाप्पानेही स्वत:च्या वडिलांची गाडी असल्याप्रमाणे त्यांना टाटा केले आणि निर्दयपणे पुढे निघून गेला… आधी मर्सिडीज, मग अँब्युलन्स, नंतर विजय चव्हाणच्या मामाची गाडी अशा क्रमाने नऊ वाजेपर्यंत सगळे पोचले…
आता फक्त सुधीर जोशी यायचा होता… साडेनऊ झाले… पावणेदहा झाले… दहा सव्वा दहा… बाहेर बर्‍यापैकी गर्दी होती… काहीतरी वेगळे पाहायला मिळणार म्हणून… पण सुधीरचा पत्ता नव्हता… अखेर सगळ्यांनी मला आग्रह करून सुधीरची भूमिका करायला भाग पाडले… केवळ शो मस्ट गो ऑन म्हणून मी उभा राहिलो, पण एका अटीवर… विजय चव्हाण आणि केंकरू माझ्या आजूबाजूला असतील… दोघेही स्ट्राँग मेमरीवाले… एकाची मेमरी फेल गेली तर दुसरा असावा म्हणून… तसे सगळ्यांनी धीर दिला आम्ही आहोत… स्साला… मीच लिहिलेलं, बसवलेलं नाटक. पण टेन्शनमुळे ब्लँक झालो होतो…
साडेदहाला प्रयोग सुरू केला १० मिनिटानी सुधीरची एंट्री… पहिली एंट्री घेतली आण्िा तेवढ्यात सुधीर आणि दिलीप पोहोचले… थोड्या वेळाने मी विंगेत पाहिलं… सुधीर तिथे उभा अपराध्यासारखा… मी स्टेजवरच गॅपमध्ये विजय चव्हाण आणि केंकरूला सांगितले, सुधीर आला मी जातो… दोघानी धरून ठेवले, एक्झिटला वेळ आहे थांब… दोन वाक्यं आहेत यानंतर… अखेर ‘नो मिस्चिफ नथिंग डुइंग’ हे शेवटचे वाक्य बोलून मी एक्झिट घेतली आणि विंगेतल्या सुधीरवर माझ्या अंगावरच्या कपड्यांचा आणि टोपीचा त्याच्यावर अभिषेक करायला सुरुवात केली… सुधीर बोंबलत होता, बाळा, हे बरे दिसणार नाही… प्रेक्षक काय म्हणतील?
मी : अरे सुधीर, त्यांना आनंदच होईल तुला बघून… माझ्याबरोबर तेसुद्धा तुझी वाट बघत होते खाली माहिताय?
सुधीर : अरे पण…? असं कधी झालं नव्हतं….
मी : आता होईल…. सुधीर आपलं हे आधुनिक लोकनाट्य आहे… पहिला प्रयोग आहे इथला… रसिकांना आणि ह्या रंगभूमीला खरा आनंद होईल… तू उशिरा आलास यात तुझा दोष नाही… निर्धास्त जा… प्लीज…
आणि सुधीरने एन्ट्री घेतली टाळ्यांचा कडकडाट झाला… विजय कदमने अ‍ॅडिशन घेतली, मायझयो ह्यो कोन?… लक्ष्याने त्यावर कडी केली… `हा खरा मास्तर… मघाशी बोनेट आलं होतं… आता खरी बस आली…’ पुन्हा बंपर लाफ्टर… पुढचा प्रयोग धम्माल झाला…
प्रयोग संपला… नाशिककरांनी प्रत्येक कलाकाराला डोक्यावर घेतलं… नाटकाच्या आगामी यशाची आणि त्यातल्या प्रत्येक कलाकाराला स्टार बनवण्याची जबाबदारी रंगदेवतेने घेतलेली जाणवली….
आता परतीचा प्रवास… बाप्पाची मर्सिडीज त्याला सोडून तिच्या खर्‍या मालकाबरोबर निघून गेली, त्यामुळे त्याने ट्रेनने जाणे पसंत केले… त्याच्याबरोबर आणखी चारपाचजण गेले…
बाकीच्यांनी विजय चव्हाणच्या मामाच्या बसमधून जायचे ठरवले… ड्रायव्हरने आधीच सांगून टाकले, किती वाजता पोचनार म्हायत नाय… जेनला बसायचा तेनी बसा… झोपाया जागा नाय… सामायन आणि पोरा… खालीच र्‍हातील… घायगडबड करायची नाय…’
जणू काय परत घेऊन जाणे विजयचीच जबाबदारी असल्याप्रमाणे सगळे त्याच्याकडे बघत होते… विजयने म्हटले, `चलो डरनेका नही… जे होयल ते…’ गाडीत अक्षरश: सगळ्यांना कोंबले… चित्राला जरा ऐसपौस जागा दिली… बाकी सगळे भावी स्टार मुटकुळी मारून एकावर एक अकरा सारखे गच्च फिट झाले… साधारण सकाळी दहाच्या सुमारास जाग आली असेल एकेकाला… दादर आले की काय? अशा भीतीने बाहेर पाहिले… बस अक्षरश: सरपटतच चालली होती… इतकी हळू की ती फक्त बैलगाडीलाच ओव्हरटेक करीत होती… तेही थांबलेल्या….
अशी ही भरगच्च बस दुपारी चारला कशीबशी शिवाजी मंदिरला पोचली… तिथे उतरताच विजय चव्हाण ड्रायव्हरला झापत होता, च्यायला, मामाच्या ह्या डब्यामुळे माझी केवढी इज्जत गेली म्हायताय? २०च्या स्पीडने गाडी चालवलीस तू?
तो : गाडी होरलोड होती… हेंच्यासारखे (शेजारी सुधीर जोशी उभा होता) मोठे मोठे बोजे गाडीत होते… रिक्स होती म्हनु हलु मारली गाडी… (आणखी इज्जत जायला नको म्हणून सुधीर तिथून सटकला)… मी विजयला शांत केले… विजयने त्याला पुन्हा झापले…
विजय : कानफाट फोडीन बोजे बोलशील तर… चल जा… मामाला सांग रिपेर करायला…
पैशे? ड्रयव्हरले विजयला पंक्चर केले.
ठिकाय ठिकाय… मामाला सांग मस्तय गाडी… छान प्रवास झाला… संध्याकाळी भेटतो…
पुढे `विजयच्या मामाची बस’ म्हटले की विजय तिथून पळ काढायचा…
विजय कदम आणि विजय चव्हाण यांच्या आपसातल्या मस्तीला कधी कधी ऊत याचा… दोघेही सतत एकमेकांची भंकस करण्यात मग्न असायचे. घट्ट मैत्री होती तरीही एकमेकांच्या बापापर्यंत मस्करी चालायची… विजय चव्हाणच्या वडिलांना विजय कदम `कृष्णकुमार’च म्हणायचा… तर कदमच्या वडिलांना चव्हाण `दत्तूशेट दत्तूशेट’ म्हणायचा… चव्हाणच्या वडिलांना तपकीर ओढायचे व्यसन तर कदमच्या वडिलांना विडी ओढायचे व्यसन… तेही हाताची आणि ओढायची विशिष्ट लकब… दोघे एकमेकांच्या वडिलांची नक्कल करून खूप हसवायचे… विजय कदम जोरात गाणं म्हणायचा… अब महम्मद रफी का गाना सुनिये कृषणकुमार की आवाजमे, असं म्हणून तपकीर ओढायची अ‍ॅक्शन करून गाणं सुरू करायचा…“तपकीर तेरी दिलमे… जिस दिनसे उतारी है… त्यावर लांबून विजय चव्हाण ओरडायचा, `दत्तू… चल अभ्यासाला बस’ दत्तू नावावरून चव्हाण विजयला भरपूर सतावायचा… मग विजय कदम शेवटचे अस्त्र काढायचा… त्याचे वडील एका मोठ्या कंपनीत नोकरीला होते… तर चव्हाणचे वडील मिल कामगार… त्यावरून खूप छेडाछेडी व्हायची… ते सुरू झालं की मला टेन्शन यायचं…. मी लक्ष्याला म्हणायचो, अरे थांबव त्यांना… हसत हसत तो म्हणायचा, अरे बालमित्र आहेत ते… आता दोघांचे वडील इथे आले तर हा त्याच्या आणि तो ह्याच्या वडिलांचे पाय धरील…
अशा या दोघांनी एकत्र येऊन कोणाची फिरकी घ्यायचे ठरवले तर त्याची खैर नसायची… एकदा दौर्‍यावर असताना जेवणासाठी एक हॉटेलवर बस थांबली… प्रचंड भूक होती सगळ्यांना… नेहमी पत्ता लागणार अशा रीतीने सगळ्यांची फिरकी घेणार्‍या सुधीर जोशीचीच फिरकी घ्यायचं दोघांनी ठरवलं… सुधीर सोडून सगळ्यांना त्यांनी या प्लॅनबद्दल कल्पना दिली… तोपर्यंत प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन यांचेही टुरटूरमध्ये आगमन झाले होते…
हॉटेलमध्ये जाताच सगळ्यानी मेनु मागवला… तोपर्यंत हे दोघे काउंटरवर बसलेल्या मालकाकडे गेले…
चव्हाण : एक रिक्वेस्ट आहे…
मालक : बोला…
चव्हाण : ते तिथे गोरेसारखे जाडे…
कदम : आणि टक्कल पडलेले…
चव्हाण : हां… ते आमचे सर आहेत… ते नुकतेच आजारातून उठलेत …
कदम : त्यांना हेवी औषधे चालू आहेत…
चव्हाण : त्यामुळे त्यांना काही खायला बंदी आहे… त्यांच्या मॅडमनी ती जबाबदारी आमच्यावर सोपवलेय…
कदम : हां… ते ऑर्डर देतील… काहीही मागवतील…
चव्हाण : पण वेटरला सांगा, ऑर्डर घ्या पण काही देऊ नका…
कदम : हळूहळू ते चिडतील एक्साईट होतील… गोंधळ घालतील… तुम्ही फक्त आमच्याकडे बघा… आम्ही तुम्हाला सांगू काय करायचे ते… प्लीज…
चव्हाण : हे असं नाही केलं तर केस हाताबाहेर जायची शक्यता आहे… तुम्हालाच त्रास होईल… प्लीज…
मालक : बापरे… असं म्हणता…? ठिकाय… बघतो…
दोघे जागेवर येऊन बसले… तोपर्यंत सुधीरने भरपूर आयटम ऑर्डर केले होते… मालकाने वेटरला बोलवून ते कॅन्सल करायला लावले…
हळूहळू सर्वांचे जेवण येऊ लागले… सुधीरच्या पुढ्यात प्लेटही येईना … त्याने वेटरकडे पाहून जाब विचारायला सुरुवात केली… वेटरने मालकाकडे पाहिले… मालकाने या दोघांकडे पाहिले… चव्हाणने नकारार्थी मान हलवली, कदमने बोटाने नकार दिला… मालकाने वेटरला मना केले…
असे बराच वेळ चालले… मुलांचे जेवून झाले, पण यांचा हा खेळ चालूच… उलट जेवणाच्या टेस्टची तारीफ करून सुधीरला विचारायचे, तुझं नाही आलं अजून ? मग तो आणखी भडकायचा… मध्येच मालकाने साइडला घेऊन आम्ही बरोबर करतोय ना, विचारले… त्यामुळे सुधीरला संशय आला… मग, हास्याचा स्फोट झाला… सुधीरचे जेवण ऑलरेडी तयार होते… आले… सुधीर स्वत: असले उद्योग करायचा… त्यामुळे त्याने मुकाट्याने सहन केले… दोन्ही विजय त्याचं जेवून होईपर्यंत तिथे थांबले…

दुसरा ब्रेक
प्रकाश निमकर एकदा माझ्याकडे एका व्यक्तीला घेऊन आला… शिवाजी पार्कला माझं ऑफिस होतं… त्याने ओळख करून दिली… हा सुधीर भट.. माझा मित्र… नवीन नाटक करतोय…
मी : अच्छा? अरे वा… कोणी लिहिलंय? काय आहे?
सुधीर : आचार्य अत्रेंचं मोरूची मावशी… दिलीप कोल्हटकर बसवतोय…
मी : वा ग्रेट …पण मावशी कोण?
सुधीरने प्रकाशकडे पाहिले, मग म्हणाला, तुमचाच आर्टिस्ट…
मी : कोण? लक्ष्या?
सुधीर : नाही… विजय चव्हाण…
आयला ग्रेट… अशा नावीन्यपूर्ण धाडसी कल्पनांचा मला नेहमीच आदर वाटतो…
मी : मग माझी काय मदत? कर ना, मस्त कास्टिंग आहे…
सुधीर : आणि एक… प्रशांत दामले आणि प्रदीप पटवर्धन पण आहेत त्यात…
आता मी गंभीर झालो… टुरटूरमधले तीन मोहरे सुधीर घेऊन जात होता… आधीच लक्ष्या आणि सुधीरला घेऊन प्रकाश बुद्धिसागरने `शांतेचं कार्टं चालू आहे’ काढलं होतं, ते हिट गेलं… तरी टुरटूर सांभाळून प्रयोग होत होते… चित्राच्या जागी पद्मश्री आली होती… विजय कदम आणि विजय चव्हाण विजयाबाईंच्या ‘हयवदन’मध्ये निवडले गेले, तेही सुरू झालं होतं… आता हे…
सुधीर : टुरटूरच्या तारखांना हात लागणार नाही… मी नवीन निर्माता आहे… स्ट्रगल करावी लागणार तारखांसाठी… लक्ष्या, तू आणि प्रकाश मला या कामात मदत करा… तुमचा शब्द कोणी खाली पाडणार नाही…
मी : नक्कीच सुधीर… खूप छान सेटप आहे… हे नाटक यायलाच हवे… विजयला मोठा ब्रेक आहे हा…
त्यानंतर पंधरा दिवस रोज सुधीर ऑफिसला यायचा. त्याच्याबरोबर कधी कधी त्याचा भाऊ अरूण भटही असायचा… मी जाहिरात, प्रसिद्धी, प्लॅनिंग, कन्सेप्टवर सल्ले दिले…
मोरूच्या मावशीच्या पहिल्या हाफपेज जाहिरातीत सुधीरने जाहीर आभार मानले… त्यात लिहिले, मावशीचे लाडके भाचे लक्ष्मीकांत बेर्डे, पुरुषोत्तम बेर्डे, प्रकाश बुद्धिसागर यांचे आभार…
मावशी पण हिट्ट झाले… १००व्या प्रयोगाला सुधीरने तिघांचा खास सत्कार केला… विजयच्या भूमिकेचे आम्ही प्रचंड कौतुक केले… विजयने मावशी करून बापूराव माने आणि मोहन जोशी या त्यापूर्वीच्या गाजलेल्या मावश्यांनंतर खर्‍या अर्थाने मावशी अजरामर केली …
विजय कदम आणि विजय चव्हाण यांनी बातमी आणली, विजयाबाई आज टुरटूर बघायला येतायत… मला प्रचंड आनंद झाला… २०० प्रयोग होऊन गेले तरी त्यांनी पाहिले नव्हते… त्यांनी यावं अशी खूप इच्छा होती… मी सर्व कलाकारांची स्टेज मीटिंग घेतली … आज विजयाबाई येतायत नाटकाला… प्रयोगाचं गांभीर्य लक्षात घ्या… प्लीज… दोन्ही विजय खरोखरच गंभीर झाले…
चार वाजून गेले तरी बाईंचा पत्ता नव्हता… रवींद्रचा हाउसफुल्ल प्रयोग… साडेचारला बाई आल्या… त्यांना वाटले, असेल साडेचारचा प्रयोग… असो. बाईंचं स्वागत केलं… त्या म्हणाल्या, तुझ्याशी बोलायचंय… मी म्हटले, तुमची वाट बघून सुरू केलं नाटक… तरी चला, मुलं खूश होतील… मीही… नंतर बोलू…
बाई : नको आधी कामाचं बोलू…
मी : बोला
बाई : हे बघ तुझ्या नाटकातली दोन मुलं माझ्या हयवदनमध्ये आहेत… विजय चव्हाण आणि विजय कदम…
बाईनी न चुकता दोघांची नावे करेक्ट घेतली…
मी : हो…
बाई : तुला माहिताय… एनसीपीए हे नाटक घेऊन जर्मनीला चाल्लंय…
आता मात्र माझ्या पोटात गोळा आला…
बाई : प्लीज, दोघांना सोडशील?
बाईंची अख्खी आदरणीय कारकीर्द डोळ्यासमोरून सरकली… बापरे, यांना नाही कसं म्हणायचं?… माझ्या डोळ्यासमोर मघाचे दोन्ही विजय आले… ते गंभीर का झाले ते आता कळले… बाई नाटक बघायला नव्हे, तर राम-लक्ष्मण मागायला आल्या होत्या… तीन महिन्यांसाठी… मी स्तब्ध झालो…
बाई : पुरुषोत्तम… मला माहिताय कठीण निर्णय आहे… पण तू नाही म्हणालास तर…
मी : नाही नाही बाई… तुम्ही नुसता निरोप पाठवला असता तरी हरकत नव्हती… पण दोघेही माझ्यासाठी महत्वाचे आहेत… तुम्हीच सांगा, काय करू? नाटक आत्ताच चालायला लागलंय…
बाई : सांगू? दोघांपैकी असा कोण आहे ज्याच्यामुळे तुझं नाटक थांबेल?
मी : …
बाई : चिंता नको करूस… बोल… तुझं नाटकही महत्वाचं आहे…
मी : बाई… तुम्ही विजय चव्हाणला न्या… कदम नेलात तर नाटक बंद पडेल…
बाई : अरे मग चालेल ना… चव्हाणला नेते… कदमही महत्वाचा होता मला… पण असो… थँक यू व्हेरी मच पुरुषोत्तम…
मी : बाई, नाटकाला बसताय ना?
बाई : अरे मला बघायचंय नाटक… खूप ऐकलंय… नंतर येईन पुन्हा…
विजय जर्मनीला गेला… त्याच्या जागी प्रदीप पटवर्धनने प्रयोग केले…

ब्रेक के बाद
मोरूच्या मावशीचे तुफान प्रयोग झाले… विजय खरंच प्रोफेशनल नट होता… त्याच्यामुळे एकही प्रयोग रद्द झाला नाही…
निर्मात्यांचा विचार करून कारकीर्द घडवणार्‍या निळू फुले, अशोक सराफ, डॉ. लागू, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पंक्तीत बसणारा शिस्तबद्ध नट होता विजय (त्यानंतरचे प्रशांत आणि भरत)… ही शिस्त त्याला सिनेमात खूप उपयोगी पडली… म्हणून तर अडीचशेच्या वर मराठी सिनेमे करू शकला… ज्येष्ठांचा आदर आणि सहकार्‍यांना व ज्युनियर्सना लळा हा त्याचा स्थायीभाव त्याला `विजूमामा’ बनवून गेला … तोरडमल, सराफ, बेर्डे यांच्यानंतर मामा ही उपाधी- म्हणजे आईकडचे प्रेमळ नाते- ती विजूला मुलानी आदराने बहाल केली… ही मिळवणं ऐर्‍यागैर्‍याचे काम नाही… नाट्य-चित्रपटसृष्टीतील कर्तृत्ववान आणि आपुलकीच्या लोकांनाच हे नाते मिळाले…
केदार शिंदे या लेखक-दिग्दर्शकाबरोबर मावशीनंतरची त्याची कारकीर्द नाटक-सिनेमात जास्त बहरली… माझ्या शेम टू शेममध्ये आणि नंतर कुमार सोहोनीच्या आणि महेश कोठारेंच्या सिनेमात तो नेहमी उजवा ठरला…
त्याच्यासाठी आदर्श असलेले सगळेच त्याच्या गुरूस्थानी होते …
त्याची अफाट लोकप्रियता त्याच्या अंत्ययात्रेत दिसली… त्याचे सगळे कलाकार मित्र, नातेवाईक, चाहते तुडुंब गर्दीने आले होते… विनोद तावडे, एकनाथ शिंदे, शिशिर शिंदे, राजू केतकर, नील सोमय्या, गंगाधरे ही राजकारणी मंडळी व कार्यकर्ते जातीने हजर होते… हे सर्व म्हणजे त्याची मिळकतच… खरे तर त्याची एक्झिट दोन वर्षे लांबली… कारण लोकांचे प्रेम… त्याच्याप्रती लोकांच्या प्रार्थना… सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे संस्कृती कला दर्पण, महाराष्ट्र शासन आणि झी टॉकीज यांनी त्याला बहाल केलेले जीवन गौरव पुरस्कार… ते त्याला त्याच्या हयातीत हातपाय धड असताना दिले, याबद्दल आयोजकांचे कौतुकच केले पाहिजे… विजयने हे पुरस्कार आजारी असताना स्वीकारले… तेही आनंदाने… हे महत्वाचे…
विजय चव्हाणला त्याच्या नाट्यचित्रपट कारकीर्दीत उपडी होताना पाहिले, उभे राहताना पाहिले, चालताना पाहिले, धावताना पाहिले… ज्येष्ठ झालेले पाहिले… आजारी पडलेला पाहिले, ऑक्सिजन सिलिंडरसह पुरस्कार स्वीकारताना पाहिले… आणि हे सर्व अगदी जवळून पाहिले…
अगदी क्लोज एनकाउंटर …
पण स्मशानभूमीत चितेवर मात्र निपचित पडून असलेल्या विजयला बघवले नाही…
दु:ख त्याच्या जाण्याचे विरून जाईल…
वेदना तो नसण्याची…
सलत राहील

(लेखक नाट्य व चित्रपटसृष्टीतील सिद्धहस्त अष्टपैलू कलावंत आहेत)

Previous Post

दर्शन

Next Post

शाळा सुटली पाटी फुटली

Next Post
शाळा सुटली पाटी फुटली

शाळा सुटली पाटी फुटली

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.