डिसेंबर १९८७ मधली गोष्ट… सकाळी उठल्या उठल्या आकाशवाणीवर जीए कुलकर्णी यांच्या दु:खद निधनाची बातमी ऐकली आणि लगेच माझे मित्र कैलास भिंगारे यांना फोन लावला. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला कर्वेरोड निवांत असायचा. आता एवढी काय वाहनांची मुळीच गर्दी नसायची. मी, भाऊ आणि एक मित्र असे तिघेजण नुकतेच ८३-८४मध्ये मृत्युंजय मंदिराजवळच्या मिलन सोसायटीत एका बंगल्यातला एक भाग भाड्यानं घेऊन राहायला गेलो होतो. गावातून कोथरूडला जायचं यायचं म्हणजे तेव्हा फारच लांबचा पल्ला वाटे.
मी दाई इची फॅक्टरीतल्या केमिस्टच्या नोकरीबरोबरच नाटकांच्या जाहिराती आणि त्यासाठी लागणारी फोटोग्राफी नुकतीच सुरू केली होती.
कोथरूडला घरी जाताना मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला खाली एक खोकेवजा छोटीशी टपरी होती. `सरस्वती लायब्ररी’.
तिचा चालक पोरसवदा, तेल लावलेल्या केसांचा चप्प भांग पाडलेला ग्रामीण बोली असणारा पण पुस्तकांविषयी भरभरून बोलणारा लाघवी उत्साही होता.
तोच कैलास भिंगारे.
आपली लायब्ररी कशी वाढेल, निरनिराळ्या क्षेत्रांत ओळखी कशा होतील, प्रसिद्ध लेखक-कवी आपल्या लायब्ररीला कसे भेट देतील या चिंतेत तो सायकलवरून सतत वणवण करत असायचा.
वाचनाची आवड असल्यानं आम्ही त्या लायब्ररीची `मेंबरशिप’ सुरू केली होती. चालक कैलास भिंगारेचं व्यक्तिमत्त्व `इंटरेस्टिंग’ वाटल्यानं पुस्तक बदलताना अधूनमधून त्याच्याशी गप्पाही व्हायच्या. कोथरूडमधे राहायला आलेले प्रसिद्ध लेखकही ह्या लायब्ररीचे मेंबर असत. खोक्याबाहेर टाकलेल्या बाकड्यावर हे साहित्यिक गप्पा मारताना कधीकधी दिसत. अधूनमधून जवळच्याच एखाद्या हॉलमध्ये कैलास साहित्यविषयक कार्यक्रमही आयोजित करत असे आणि हा ना तो लेखक प्रमुख पाहुणा म्हणून बोलावत असे.
साहित्यिक भूक असणारे बरेच मध्यमवर्गीय तेव्हा कोथरूडला स्थलांतरित होत असल्यानं ह्या कार्यक्रमांना उपस्थितीही चांगलीच असे.
कैलासच्या चिकाटीमुळे पुण्याबरोबरच बाहेरगावचे प्रसिद्ध लेखक-कवी-नट वगैरेही या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून सरस्वती लायब्ररीशी हळूहळू जोडले जाऊ लागले होते.
कैलासला अशा कार्यक्रमांच्या फोटोंची प्रमुख पाहुण्यांबरोबर स्वत:च्या फोटोंची फार हौस असे.
मी फोटोग्राफी करतो म्हटल्यावर कैलासनं त्या कार्यक्रमांचे फोटो काढण्याची मला हळूहळू गळ घालायला सुरुवात केली.
मग मीही `बार्टर सिस्टीम’नुसार कैलासबरोबर एक प्रेमाचा करार केला.
त्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे फोटो मी फक्त एक्सपोज करून द्यायचे, त्याचे डेव्हलपिंग-प्रिंटिंग त्याने स्वखर्चाने करून घ्यायचे आणि त्या बदल्यात अगदी दिवाळी अंकांसहित पुस्तकं मी वर्षभर विनामूल्य वाचायला न्यायची.
तेव्हा एकदोन पुस्तकांनी आमची वाचनाची भूक भागत नसे आणि त्यालाही स्वस्तात आणि भरपूर फोटो मिळत. त्यामुळं हा करार आम्हा दोघांनाही फायद्याचाच होता.
कालांतरानं कोथरूडच्या सांस्कृतिक विश्वात या `सरस्वती लायब्ररी’नं मानाचं स्थान पटकावलं. अगदी पु.ल., कुसुमाग्रज… या लेव्हलचे लेखक-कवी सरस्वती लायब्ररीत पाहुणे म्हणून येऊ लागले…
… आता सरस्वती लायब्ररीनं आणखी मजल मारत मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला, सध्या `किमया’ रेस्टॉरंट आहे, तिथे अजून मोठ्या टपरीत स्थलांतर केलं होतं. मेंबरशिपही दिवसेंदिवस वाढत होती.
एकदा गप्पा मारताना कैलासनं दबक्या आवाजात माझ्यावर बाँब टाकला. मला म्हणाला “कुणाला सांगणार नसलात तर एक गुपित सांगू का?. आपल्या लायब्ररीत चक्क जीए कुलकर्णी येतात..!”
मला सुरुवातीला या थापा वाटल्या. मग कैलासनं त्यांची साधारणत: लायब्ररीत यायची वेळ वगैरे सांगून मला तिथं अभावितपणे हजर राहायला, पण त्यांच्याशी न बोलता, त्यांना ओळख वगैरे न दाखवता फक्त मी त्यांना `पाहून’ लगेच निघायचं, असं सांगितलं.
मी दोनचार वेळा ती वेळ साधून तिथं गेलोही, पण जीए काही आलेच नाहीत. जीएंनी `आपण इथे येतो’ वगैरे कुणाला सांगितलं, तर लायब्ररीत येणं बंद करण्याची तंबी कैलासला दिली होती आणि कुणा भलत्याच (बहुधा बहिणीच्या) नावानं मेंबरशिप घेतली होती.
मी कुणालाही सांगणार नाही आणि गुपचूप जीएंना लांबून फक्त `पाहून’ समाधान मानेन, या अटीवर ते `गुपित’ मला कैलासनं सांगितलं होतं आणि मला तर जीएंना कधी एकदा पाहतोय असं झालं होतं.
आठदहा वेळा जाऊनही जीएंचं दर्शन न झाल्यानं मी तो नाद जवळ जवळ सोडून दिला आणि अचानक मला एके दिवशी सकाळी ही त्यांच्या निधनाची बातमीच ऐकायला मिळाली!
बातमी ऐकून कैलासही सुन्न झाला आणि मला म्हणाला, “चला, आपण जाऊ त्यांच्या घरी. मला माहीत आहे त्यांचं घर..!”
मी माझी स्कूटर काढली आणि (आता सिटी प्राईड आहे त्या जवळच्या तेव्हाच्या) निर्जन रस्त्यानं एका बैठ्या बंगल्यापाशी आम्ही येऊन पोहोचलो,तर तिथं एक बाई शांतपणे सडासंमार्जन करताना दिसल्या. तिथं घरातलं कुणी `गेल्याचं’ वातावरण अजिबातच नव्हतं.
मी कैलासला विचारलं, “कैलास, नक्की हेच घर ना?” तर तो म्हणाला, “हो.. हेच.”
मग मात्र मीच गडबडलो. मला मी नक्की `जीएंच्याच’ निधनाची बातमी ऐकली ना असा संभ्रम वाटू लागला. पण एका बाजूला तर तशी खात्रीही वाटत होती.
आम्हाला काय करावं, ते समजेना. मग मी एक शक्कल लढवली. बाजूला स्कूटर लावून पुढं जाऊन त्या बाईंना फक्त “जीए एए”… एवढंच कसंबसं म्हटलं, आणि त्यांनी उत्तर दिलं…
“हो. त्यांना आचार्य अत्रे सभागृहात ठेवलंय..” आम्ही लगेच टिळक रोडला निघालो आणि आचार्य अत्रे सभागृहात येऊन ठेपलो, तर तिथंही बाहेर तसं काही वातावरण दिसे ना.
आत जाऊन बघितलं तर आतल्या जिन्याखाली राखी चौकड्यांचं ब्लँकेट पांघरलेला, डोळ्यांवर तो प्रसिद्ध गॉगल लावलेला, कपाळावर बुक्का, गळ्यात एक हार आणि तोंडात तुळशीपत्र… असा जीएंचा देह ठेवला होता आणि बाजूला उदबत्त्यांचा जुडगा जळत होता. निलगिरी आणि उदबत्त्यांचा मिश्र दरवळ येत होता. जवळपास, बाजूला `अक्षरश: कुणीही’ नव्हतं. बहुतेक जीएंना तिथं ठेवून पुढची व्यवस्था करायला मंडळी बाहेर गेली असावीत.
त्या अवस्थेतल्या जीएंना पाहून माझे हातपाय थरथरायला लागले आणि घशाला कोरड पडली. मी त्यांच्या पाया पडून बाजूला गप्प उभा राहिलो.
कैलासही सुन्न होता.
दहापंधरा मिनिटांनी ज्यांना `ठिकाण’ कळले होते ती एकदोन मंडळी आली आणि व्यवस्था करायला बाहेर गेलेली तीनचार मंडळीही एक एक करून परतू लागली. अर्ध्या पाऊण तासानं हळूहळू मग एक एक मान्यवरही यायला लागले. गर्दी वाढत गेली आणि जीएंच्या देहावरचा हारांचा भार वाढू लागला. कधीतरी दुरून का होईना, दर्शन होईल अशा आशेनं सरस्वती लायब्ररीसमोर घुटमळणार्या मला जीएंचं `असं’ दर्शन अगदी जवळून घडलं होतं..! मला कामावर जाणं अगदी आवश्यकच असल्यानं कैलासला सांगून, प्रचंड इच्छा असूनही वैकुंठला न जाता मी तिथून खिन्न मनानं बाहेर पडलो..! जीएंचं अत्यंत दुर्लभ असं पहिलं आणि शेवटचं ‘दर्शन’ घेऊन मी धन्य धन्य मात्र झालो होतो..!
– कुमार गोखले
(लेखक ग्राफिक डिझायनर, कॅलिग्राफर आणि ग्लॅमर पोट्रेट फोटोग्राफर आहेत.)