आज जर प्र. ल. आपल्यात असते तर त्यांच्या पंच्याहत्तरीचा यंदाचा अमृतमहोत्सवी वर्षाचा आनंदसोहळा त्यांचे मित्र, हितचिंतक, निर्माते, कलाकार, प्रकाशक यांनी अत्यंत आपुलकीनं, उत्साहानं साजरा केला असता, पण… पण आज ते आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्या कलाकृतींतून, लेखनांतून, निर्व्याज मैत्रीतून ते आपल्यासोबत सदैव राहतीलच. प्र. ल. नावाचे पर्व, त्यांचं मैत्र, त्यांचं जीव लावणं, त्यांचा दरारा, त्यांचं कर्तृत्व कालही होतं, आजही आहे आणि उद्याही सर्वांच्या मनात अखंड ज्योतीसारखं सदैव तेवत राहील एवढं खरं…
प्र. ल. म्हणजे गोळीबंद, आशयघन, प्रभावी संवादी एकांकिका, खिळवून ठेवणारं नाट्य, वेगळ्या, गूढरम्य व्यक्तिरेखा असलेली नाटकं… काही वर्षांपूर्वी पु.लं.च्या एका स्पर्धेच्या नाटकाचा मुहूर्त श्रेष्ठ प्रशिक्षक, अभिनेता, दिग्दर्शक कमलाकर सोनटक्के यांच्या हस्ते झाला होता. तेव्हा सोनटक्के सर म्हणाले होते, ‘प्र. ल. हा नाटककार म्हणजे जी. ए. कुलकर्णी आणि चिं. त्र्यं. खानोलकर यांचं मिश्रण असून यांच्यामधलं हा काहीतरी वेगळं असं तो देतो.’
हे ऐकल्यावर त्याचक्षणी मयेकरी शैलीत प्र. ल. म्हणाले, ‘मी दोन्हींच्या मधला अजिबात नाही. मला माझं नाटक लिहायचं आहे.’
मुंबई सेंट्रलच्या बीआयटी चाळीत, जीवनाचे चटके आणि फटके सोसत, प्रखर वास्तवाच्या निखार्यावरून वाटचाल करणार्या प्र. लं.चा स्वभाव, वागणं-बोलणं म्हणजे एक वेगळंच कोडं होतं. काटेरी फणस आणि शहाळं यांच्यासारखं त्यांचं व्यक्तिमत्त्व… बोलणं-वागणं स्पष्टच, रोखठोक (काहींना फटकळ वाटणारं) स्वभाव म्हणजे एक अद्भुत मिश्रण (काहींना प्र. ल. अहंकारी, अहंगंडाने पछाडलेले, उद्धट वाटणारे) पण ज्यांनी त्यांच्या आपुलकीचा, मायेचा, प्रेमाचा, हळवेपणाचा, संवेदनशीलतेचा अनुभव घेतला आहे, त्यांना प्र. ल. म्हणजे प्रेमळ, पारदर्शी, निरपेक्ष, नि:स्वार्थ असं ‘फार वेगळं असं व्यक्तिमत्त्व’ आपल्याला लाभलं असं हमखास वाटायचं, वाटले.
प्र. ल. बेस्ट आस्थापनेतली चाकरी सांभाळून ‘लेखनकाम’ करायचे. मुंबई सेंट्रल बस डेपोमधल्या ऑफिसात त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे असंख्य चाहते हमखास असायचे, भेटायचे, पण कधी प्र. लं.नी दोस्ती-यारीचा गाजावाजा केला नाही वा गैरफायदाच काय, पण फायदाही कधी घेतला नाही. त्याचवेळेस माझ्यासारखे अनेकजण अक्षरशः ‘प्रलमय’ झाले होते, आजही आहेत. प्र. ल. कर्तृत्वाचा, मैत्रीचा त्यांच्यातील माणसाचा, माणुसकीचा करिश्मा तेवढाच उत्तुंग होता. प्र. ल. नावाचं गारूडच तसं होतं. त्यांच्या लेखणीचा दबदबा, दराराच तसा होता. ऑफिसमधल्या टेबलावरचे कामाच्या कागदांचे ट्रे झटपट रिकामे करण्यात ते वाकबगार होते. दोन बेचक्यातली सिगारेट आणि गप्पागोष्टीत रममाण झालेले प्र. ल. म्हणजे माणसांच्या जंगलात तपाला बसलेला तपस्वीच वाटायचा.
प्र.लं.नी अनेक माणसे जोडली. विनय आपटे, कांचन नायक या दोघांवर प्र.लं.चा प्रचंड जीव. त्याचबरोबर बेस्टमधला अविनाश नारकर, अरुण नलावडे, अरुण शेखर, उमेश मुळीक यांच्यावर मनस्वी प्रेम. तर ‘प्रयोग मालाड’ या संस्थेच्या प्रायोगिक नाट्य चळवळीत प्र.ल. हितचिंतक, मार्गदर्शक म्हणून मनःपूर्वक योगदान देत असे. म्हणूनच प्रयोग मालाड या संस्थेनं २०१५मध्ये प्र. ल. मयेकरांच्या निवडक एकांकिका पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्या होत्या. प्र.लं.च्या गाजलेल्या एकांकिका नव्या पिढीतल्या कलाकार-दिग्दर्शकांना आव्हान म्हणून पेलता याव्यात, त्याचा अनुभव मिळावा हा त्याचा उद्देश होता.
साधारण १९८२-८३मध्ये प्र. ल. मयेकर यांनी एकांकिका लिहायला सुरुवात केली असली तरी त्यापूर्वी त्यांची ओळख ‘कथाकार’ म्हणून सर्वत्र झाली होती. साध्यासुध्या नाही तर ‘सत्यकथां’मधून प्र.लं.च्या कथा प्रसिद्ध झाल्या होत्या, गाजल्या होत्या. साहित्यिकांच्या वर्तुळात ‘प्र. ल.’ या नावाचा दबदबा निर्माण झाला होता. त्यांच्या ‘मसिहा’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार मिळाला होता, तर काचघर, प्रेमाच्या सुलट्या बोंबा हे कथासंग्रहही गाजले होते. मग मात्र त्यांनी कथांकडून एकांकिका, नाटकांकडे मोहरा वळवला होता आणि एकांकिकाकार, नाटककार म्हणून आपलं ‘स्थान, संस्थान’ निर्माण केलं होतं.
प्र. ल. मयेकर यांचा एक प्रगल्भ आशयसंपन्न कथाकार म्हणून सर्वत्र लौकिक गाजला होता.
प्र.लं.च्या एकांकिका आणि नाटकं सशक्त, नाट्यपूर्ण रचना, अर्थपूर्ण, आशयघन, खणखणीत संवाद आणि अटळ संघर्ष ही त्यांच्या लेखनाची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्याचप्रमाणे त्यांच्या कथांबाबत म्हणता येईल. प्र.लं.च्या अनेक कथा जरी १९७० ते ८०च्या दशकातल्या वा त्या आधीच्या असल्या तरी आजही त्याचे महत्त्व जाणवते. ते वादातीत असेच आहे. त्या कथांमधली ती दाहक, प्रखर, विदारक वास्तवता, नाट्यपूर्ण घडामोडी, आगळ्या व कायम स्मरणात राहणार्या व्यक्तिरेखा मोहवून टाकतात, खिळवून टाकतात.
कथाकार प्र. ल. मयेकर एकांकिका आणि नाटक या माध्यमाकडे वळण्यामागच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे बेस्ट आस्थापनाच्या ‘बेस्ट कला, क्रीडा मंडळाची नाट्य चळवळ’. दरवर्षी स्पर्धेसाठी लागणार्या नव्या नाटकाची गरज लक्षात घेऊन प्र.लं.नी पहिलं, पूर्ण लांबीचं नाटक लिहिलं ते राज्य नाट्य स्पर्धेकरिता ‘आतंक’ नावाचं… त्यानंतर ‘अथ मनुस जगन हं’, ‘अनंत अवशिष्ट’, ‘अग्निदाह’, ‘आद्यंत इतिहास’, ‘तक्षकयाग’ अशी अनेक नाटके त्यांनी लिहिली. मात्र प्र. ल. मयेकर नावाचा नाट्यसृष्टीत दबदबा निर्माण झाला तो ‘मा अस् सावरीन’ या कुमार सोहनीनं दिग्दर्शित केलेल्या सर्वत्र गाजलेल्या नाटकामुळे. दिल्लीच्या एन.एस.डी.मधून मुंबईत आलेल्या कुमार सोहनीचं हे पहिलं भरघोस यश. अर्थात यात लेखक ‘प्र.ल.’ महत्त्वाचेच… नाट्यदर्पण आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेकरिता प्र. ल. मयेकर यांनी ‘होस्ट’, ‘आय कन्फेस’, ‘रोपट्रिक’, ‘अब्दशब्द’, ‘रक्त प्रपात’, ‘अनिकेत’ अशा पुरस्कारप्राप्त एकांकिका अक्षरशः गाजवल्या होत्या.
‘‘प्र. ल. मयेकर यांच्या शब्दप्रधान एकांकिका, नाटके फार वेगळी वाटत. खरं तर मराठी रंगभूमीला शब्दप्रधान नाटकांची फार मोठी परंपरा आहे. मयेकर ही परंपरा मानत असावेत. त्यांचं वेगळेपण म्हणजे ते तत्कालीन इतर नाटककारांपेक्षा वेगळे तर होतेच, पण ते साहित्यातले अधिक होते. जी. ए. कुलकर्णींचा त्यांच्या लेखनावरचा प्रभाव असला तरी मयेकरांची स्वतःची शैली होती आणि ती जी.एं.च्या सावलीत तयार झालेली नव्हती. कारण दोघांची साहित्यभूमी वेगळी होती.
व्यावसायिक रंगभूमीच्या पडत्या काळात प्रलंनी एकांडी शिलेदारी करीत तिच्यातली धुगधुगी कायम ठेवली. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे मच्छिंद्र कांबळींसाठी लिहिलेलं नाटक ‘पांडगो इलो रे बा इलो’ हे त्रुफान सुपरहिट नाटक होय. या नाटकात मच्छिंद्रसोबत सखाराम भावे अक्षरशः धुमाकूळ घालायचे. ‘वस्त्रहरण’ नाटकानंतर ‘पांडगो…’ हे नाटक म्हणजे मच्छिंद्रला सापडलेली सोन्याचं अंडं देणारी कोंबडीच होती, असं मला तेव्हाही वाटायचं आणि आजही वाटतं…
दरम्यान, चंद्रलेखाच्या मोहन वाघ यांनी प्र. ल. मयेकर यांच्याकडून एक नाटक लिहून घेतलं होतं- ‘दीपस्तंभ’. त्याच्या कथानकाचे बीज एका ऑस्ट्रियन सीरियलमध्ये होते. त्याच कथानकावर राकेश रोशन, रेखा, कबीर बेदी यांचा ‘खून भरी माँग’ हा सिनेमा खूप गाजला होता. रिटर्न टू एडनर आधारित असलेल्या चंद्रलेखाच्या ‘दीपस्तंभ’चं दिग्दर्शन दिलीप कोल्हटकर यांचं होतं, तर त्यात डॉ. गिरीश ओक, संजय मोने, अमिता खोपकर होते. दीपस्तंभ हे नाटक खर्या अर्थानं व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी झालेलं प्रलंचं नाटक आहे. त्यानंतर चंद्रलेखासाठी प्रलनं ‘रमले मी’, ‘शतजन्म शोधताना’, गंधा निशिगंधाचा’ ही नाटकं लिहिली. प्र. ल. मयेकर आणि मच्छिंद्र कांबळी या लेखक-निर्माता जोडीनं मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ‘पांडगो’ या तुफान विनोदी नाटकाद्वारे जसा प्रचंड धुमाकूळ घातला होता… त्यानंतर एक नवा नाट्यप्रयोग करून मराठी नाटकात, एक वेगळ्या उंचीचं, तरल, मंत्रमुग्ध करणारं, खिळवून ठेवणारं नाटक सादर करून या दोघांच्या चाहत्यांना, प्रेक्षकांना सुखद असा धक्का दिला होता. ते नाटक म्हणजे, प्रलंच्या लेखणीतून साकारलेल्या सर्वोत्तम टॉप फाइव्ह कलाकृतींतलं पहिल्या क्रमांकाचं नाटक म्हणजे ‘रातराणी’ होय. कुमार सोहनी दिग्दर्शित या नाटकात अरुण नलावडे, उदय म्हसकर, अभिनयाची फुलराणी भक्ती बर्वे आणि जबरदस्त पार्श्वसंगीत यांचा कमालीचा परफॉर्मन्स होता.
भक्ती बर्वे यांच्या मोजक्या गाजलेल्या भूमिकांमधली रातराणीमधली ‘अॅना’ची भूमिका ही शब्दांच्या पलीकडली अशीच होती. प्र.लं. आणि विनय आपटे या जोडीनं केलेल्या ‘रानभूल’ नाटकाने वेगळा तर इतिहास रचलाच पण त्या दोघांची जिवलग मैत्री हा नाट्यसृष्टीतील आवर्जून चर्चिला जाणारा विषय होता. याच जोडीनं ‘डॅडी आय लव्ह यू’, ‘मिस्टर नामदेव म्हणे’ ही नाटकं सादर केली होती.
प्रलं-मच्छिंद्र कांबळी, प्रलं-मोहन वाघ, प्रलं-कुमार सोहोनी, प्रलं-विनय आपटे या कॉम्बिनेशन्सनं मराठी रंगभूमीवर खूप काही दिलं आहे, तर प्रलं-डॉक्टर श्रीराम लागू-कुमार सोहोनी या त्रिकुटाने दिलेलं ‘अग्निपंख’ हे नाटक जबरदस्त गाजलेलं नाटक मानलं जातं. प्रलं आणि मोहन वाघ या जोडीनं ‘आंसू आणि हासू’ हे एक वेगळं नाटक रसिकांना दिलं होतं. ‘तक्षकयाग’ ही प्र. ल. मयेकर यांची कलाकृती माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची, मोलाची आहे, अत्यंत वेगळी, चाकोरी भेदणारी अशी आहे. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असा नारा देणार्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत, तेजस्वी हिंदुत्वाची आठवण करून देणारी जळजळीत, ओजस्वी भाषा म्हणजे ‘तक्षकयाग’चं वैभवच होतं.
प्रलंनी त्यांच्या एकांकिका तर दिग्दर्शित केल्या होत्याच, पण ‘काळोखाच्या सावल्या’, ‘तक्षकयाग’, ‘अंदमान’ अशी नाटकं दिग्दर्शित करून राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावला होता.
स्वतः यशस्वी, सिद्धहस्त नाटककार म्हणून मराठी नाट्यसृष्टीत आपलं स्थान निर्माण करणार्या प्र.लं.नी जयंत पवार, शेखर पाटील या व अशा नाटककारांना नेहमीच आपुलकीनं नाट्यलेखनासाठी मार्गदर्शन केले आहे.
(या लेखासाठी श्रीकला हट्टंगडी, जितेंद्र चासकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.)