व्हय देवा म्हाराजा तुया स्वामी समर्था, बाय माज्ये गावच्ये मर्यादा, तुका ह्या भरलेला श्रीफळ ठेवन तुजो मान काडलेलो आसा, तो मान्य करून घे.
लिंगा जैना ब्राह्मणा स्वामी समर्था, पाच पुरी बारा आकारा
आज धरतरीचो देव भूमीचो आकारी नि चौर्याऐंशीचो अधिकारी सामील होवन, आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीन, ह्यो होळयेचो सण आमी साजरो करताव..
तेवा ह्यो जो काय देवा आमचो महाराष्ट्र आजतागायत माणिक मोत्यांनी राखलंस, शेराक सवाशेर दिलंस, पाचाचे पंचवीस केलंस, तशीच राठी फुडे चालू ठेवन शेवाचाकरी करून घे म्हाराजा!
राजसत्तेचो देवचार, पूर्वसत्तेचो देवचार सामील होवन, ईठलाय नवलाय कोटकारी सामील होवन, बाराचे पूर्वज सामील होवन, गावडे वस गावडे पूर्वज सामील होवन, देवा श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे हेंच्यानी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेवन ह्या महाराष्ट्र भूमीतल्या रयतेक सुखा-समाधानान जगण्यासाठी जा जा काय करूचा ता करून, फुडच्या काळातसुद्धा आपल्या महाराष्ट्र कुटुंबाची पताका उंच फडकावित ठेवायची आसा असा ठरवलेला आसा. तेंका येश आनि बरकत देवन सगळ्या मराठी राज्याची रखवाली कर महाराजा!
आज रवळनाथ पावणाय राजी होवन, बिरा म्हाराजा स्वामी समर्था तू सामील होवन ही जी काय सालाबादप्रमाणे होळयेच्या खुटार तुजी सगळी लेकरा जमान तेनी तुका हात जोडलेले आसत त्येंची शेवा मान्य करून घे म्हाराजा! देवा आज ही जी तुज्या महाराष्ट्राची बदनामी करीत, जेनी जेनी धुमशाना घालीत, आपली तुंबडी भरूचा राजकारण करूचा ठरवलेला आसा त्येंचे दात त्येंच्याच घशात घाल म्हाराजा! चतु:शीमेच्या भायरसून काळी टोपी घालनारा, काळी करणी करनारो ह्यो जो कोणी कवाडबावला आणून महाराष्ट्रात ठेवलेला आसा तेका धडो शिकवन, विधान परिषदेच्या आमदारांची यादी लवकरात लवकर मंजूर करूची सुबुद्धी दे म्हाराजा! उलट्या काळजाची कसाब करणी करनार्या टीव्ही चॅनलच्या चष्मेवाल्या अँकराची वाकडी शेपटी सरळ करून मुंबय पोलिसांची विनाकारण निंदा करणार्या नटीची छुट्टी करून टाक म्हाराजा! रोजच्या रोज आमच्या महाराष्ट्रावर भुकत र्हवणार्यांच्या मालकांच्या आंगार खाजकुयली टाकून तेंचो माज सटासट उतरवन टाक म्हाराजा!
भूत प्रेत समंधाक बांदून ठेवणार्या चतु:शीमेच्या अधिकार्या, म्हापुर्सा म्हाराजा, समर्था धरतीच्या आकारा, ह्या तुका महाविकास आघाडीचा अक्षरी ल्हाना ठेवलेला आसा ता मान्य करून घे म्हाराजा! सुज्ञान लेकराच्या हातान, अज्ञान लेकराच्या हातान, जर काय चूकभूल झाली आसात, तर या ल्हान्यापान्यावर राजी होवन सगळ्या राज्याची रखवाली कर म्हाराजा!
देवा तुजा टरबुजासारख्या लेकरू नरड्याच्या ईकारान शीक आसा नि ता सभागृहात नि भायर रस्त्यावर आनि टीव्हीच्या मायकान समोर पन वगीच आरड हुयेल मारीत आसता नि खोटा-नाटा रेटत आसता नि त्येच्या बायलेन पन आपल्या नरड्यात सूर नसताना महाराष्ट्राची क्रूर इटंबना चालवलेली आसा… त्या त्यांच्या इकारावर लवकरात लवकर वशेद सोदून दी म्हाराजा!
पंचाक्षरी विषयात आज ह्या ठिकाणी पंचशील ल्हाना ठेवलेला आसा. तेचो मान आज भरलेला फळ ठेवलेला आसा. ह्या फळार तू मर्यादा आज राजी होवन पंचाक्षरी गार्डी धोंड्या चतु:शीमेच्या अधिकार्या राजी होवन, ही जी काय करोनाची पनवती रयतेच्या पाठी लागली हा, ती ताबडतोबीन तुज्या ताब्यात घे म्हाराजा! तोंडार मुसक्या बांदा, हात धुवीत र्हवा, सणासमारंभात गर्दी करून करोनाचो फैलाव करू नकात अशी इनवणी, दातांच्ये कनये करून सरकार आनि डाक्टर करतहत. ती मनावर घेवन तिच्यापरमाण सगळे येवार करूची सद्बुद्धी आमच्या सगळ्या लोकांका दी म्हाराजा! न्हान न्हान पोरांचे शाळा परत सुरू होवंदेत, कालिजा उगडांदे, सगळ्यांचे परीक्षा येळेर होवंदेत, असा गाराणा तुज्या पायाकडे रुजू करून घे म्हाराजा! दोनव तोंडान बोलनार्या नि करोनाचा पन राजकारण करणार्यांका पायाबुडी घालून त्येंची दात कसाळ त्येंच्या घशात घाल म्हाराजा!
आज अवगत चाळेगत मोडात्री निरंकार ह्येंका गुळ-खोबरा, काजाळ-कुकू दिलेला आसा. मालवणी शब्दांच्या फुला फळांनी तुझी वटी भरलेली आसा. त्या परमाणा तू आज मर्यादा राजी होवन, ह्या हिंदुत्वाच्या नावावर जातीपातीत धर्माधर्मात भावाभावात कुटुंबाकुटुंबात विष पेरणार्यांचा, विश्वासघाताचा, खोटेपणाचा सगळा विष तुज्या ताब्यात घे. त्येंच्या कर्माची फळा तेंका भोगूक लाव आनि मुंबयच्या नावाक, महाराष्ट्राच्या नावाक काळा फासूक बगनार्यांका भस्मसात करून टाक म्हाराजा!
अष्टकोटी भुतांच्या भूपाळा, स्वयंभू बिरामणा दयाळा, चोर्याऐंशीच्या चाळ्या, भगतांच्या कृपाळा सालाबाद प्रमाणे ही तुझ्या बालगोपाळांनी होळी उबी केलेली आसा… ती फाल्गुन अमवाश्येक जळताना तिच्याबरोबर सगळी पनवती, सगळो हलकटपणा, दिल्लीवाल्यांचा सूडाचा राजकारन जळान जावंदेत आनि महाराष्ट्र धर्माची माया सगळ्यांच्याच मनात उमळान येवंदेत म्हाराजा!
व्हय म्हाराजा ऽऽ!!
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि विडंबनकार आहेत)