सोनी मनोरंजन वाहिनीवर ‘इंडियन आयडॉल’ या रिअलिटी शोचे 12वे सत्र सध्या सुरू आहे. या आठवड्यापासून हा कार्यक्रम वीकएंडला रात्री 9:30 वाजता दाखवला जाणार आहे. या वीकएंडला प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी गतकाळातली प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर या मंचावर येणार आहे. पती ऋषी कपूरच्या निधनानंतर प्रथमच ती एखाद्या कार्यक्रमात सहभागी होत आहे. हा भाग ‘ऋषी आणि नीतू कपूर विशेष’ भाग असणार आहे. यावेळी दानिश आणि नचिकेतने ‘बचना ए हसीनों’ आणि ‘छुकर मेरे मन को’ ही गाणी सादर केली. या परफॉर्मन्सनंतर नीतू कपूरने पतीच्या आठवणींना उजाळा दिला. ती ऋषी कपूरची अशी मैत्रीण होती, जी इतर मुलींना प्रभावित करण्यात त्याला मदत करायची. परंतु मग ते दोघे एकमेकांना आवडू लागले. ऋषी कपूरला ती खूप गोड आणि गोंडस वाटायची. ते दोघे एकमेकांना बॉब म्हणत असत. ते त्यांनी एकमेकांना दिलेले लाडाचे नाव होते. ऋषी कपूरबद्दल आणखी सांगताना ती म्हणाली, “त्यावेळी तो पॅरिसमध्ये होता तर मी काश्मीरला शूटिंग करत होते. अचानक एक दिवस ऋषीची तार आली, ज्यात त्याने लिहिले होते की तो मला खूप मिस करतो आहे आणि त्याचे माझ्यावर प्रेम आहे.”