अभिनेता संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलीवूडमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. निर्माता करण जोहर तिला आपल्या धर्मा प्रोडक्शन या बॅनरमधून लाँच करण्याच्या तयारीत आहेत. करण जोहर यांनीच ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी शनायाचा एक फोटोही शेयर केला आहे. यामुळे शनाया एकदम प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. करण जोहर शनायाच्या फोटोशूटमधले अनसीन फोटो शेयर करताना म्हटलंय की, डीसीए स्क्वॉडमध्ये शनाया कपूरचे स्वागत… याच वर्षी जुलैमध्ये शनायाचा पहिला सिनेमा आमच्या बॅनरतर्फे लाँच होतोय. तिचा हा प्रवास अविस्मरणीय असेल हे नक्की, असेही ते लिहितात. करण यांच्यासोबतच खुद्द शनायानेही इन्स्टाग्रामवरील आपल्या पेजवर ही आनंददायक माहिती पोस्ट केली आहे. या पदार्पणाआधीही शनायाने ‘गुंजन सक्सेना’ या सिनेमासाठी काम केलंय. पण ते अभिनेत्री म्हणून नव्हे, तर सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून… त्यानंतर ती ‘लाइव्स ऑफ बॉलीवूड वाइव्स’ या वेबसिरीजमध्येही चमकली आहे.