शिरसाटवाडी हे गाव शोकसागरात बुडून गेलं होतं. घटनाही तशीच घडली होती. गावातले लोकप्रिय शिक्षक गजानन खांदवे यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गावात जेव्हा ही खबर पसरली, तेव्हा सगळ्यांना प्रचंड धक्का बसला. विद्यार्थ्यांबरोबरच लोकांचेही लाडके असलेले खांदवे सर असे दुर्दैवीरीत्या मरण पावल्याची हळहळ सगळीकडे व्यक्त होत होती.
खांदवे दहा वर्षांपूर्वी इथल्या श्रीमती गोदावरीबाई मिरजकर विद्यालयात गणिताचे शिक्षक म्हणून रुजू झाले होते. गणिताबरोबरच त्यांना इतर अनेक विषयांत गती होती. विशेष म्हणजे मिरजकर विद्यालय ही दुर्लक्षित, मागे पडलेल्या आणि नाठाळ विद्यार्थ्यांची शाळा म्हणून प्रसिद्ध होती. नवीन पालक या शाळेत आपल्या मुलांचं नाव घालायचं सोडा, तिच्या आसपासही मुलांना फिरकू देत नसत. अशा वेळी खांदवे सर या शाळेत दाखल झाले आणि बघता बघता त्यांनी शाळेचा लौकिक वाढवला. गणिताची अजिबात गोडी नसलेल्या विद्यार्थ्यालाही सहज समजेल, अशा पद्धतीनं ते शिकवत. त्यामुळे शाळेची ख्याती वाढू लागली, प्रगती होऊ लागली.
खांदवे सर जगन्मित्र होते. सगळ्यांशी त्यांची छान गट्टी जमत असे, विद्यार्थ्यांशी तर जास्तच. सरांना कुणीच शत्रू नव्हतं. मात्र आपला गुण हा अवगुण ठरतो, तसंच काहीसं झालं होतं. मिरजकर विद्यालय ही शाळा आबासाहेब मिरजकरांनी सुरू केलेली होती. आता त्यांचा मुलगा विराज हा शाळेचा कारभार सांभाळत होता. त्याबरोबरच त्याचे इतरही अनेक व्यवसाय आणि धंदे होते. सत्ता हाताशी असल्यामुळे सगळ्या यंत्रणा आपल्या पद्धतीनं राबवण्याची त्यांची पद्धत होती. अगदी संस्थेच्या शाळा, कॉलेजमधल्या शिक्षकांनी, प्राध्यापकांनी आपल्या मर्जीप्रमाणे वागलं पाहिजे, अशाच त्यांच्या सूचना होत्या.
खांदवे सर मात्र अशी बंधनं मानणारे आणि पाळणारे नव्हते. त्यांनी आल्याआल्या चुकीच्या गोष्टींना विरोध केला आणि चांगल्या कामांचा धडाका लावला. त्यांच्यामुळे इतरही शिक्षकांना जोर आला. आपलं काम नेमानं करायचं आणि गैरप्रकारांना विरोध करायचा, हे त्यांचं धोरण होतं. त्यामुळे अधूनमधून विराजदादा आणि खांदवे सरांचे उघडपणे खटकेही उडत होते. अलीकडेच त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. शाळेच्या स्पर्धा रद्द करून मैदानावर एक राजकीय कार्यक्रम घ्यायचं विराजदादांच्या मनात होतं, त्यासाठी खांदवे सरांनी जोरदार विरोध केला होता. गावातूनही विरोध झाल्यामुळे विराजदादांना हा कार्यक्रम दुसरीकडे हलवावा लागला होता.
खांदवे सरांच्या आत्महत्येच्या तपासाची सूत्रं इन्स्पेक्टर प्रकाश लांजेकरांनी हातात घेतली, तेव्हा ही सगळी पार्श्वभूमी त्यांच्यासमोर होती. खांदवे सरांच्या आत्महत्येमुळे गाव हळहळला होता. त्यांच्या मृत्यूला विराजदादा मिरजकरच जबाबदार आहेत, असाच सगळ्यांचा आरोप होता.
‘त्या दोघांमध्ये नंतर पुन्हा काही भांडण झालं होतं का?’ लांजेकरांनी खांदवेंचे मित्र असलेले दुसरे शिक्षक राकेश पाचपुते यांना विचारलं.
‘नाही साहेब, आमच्यासमोर तर काही झालं नव्हतं, पण विराजदादासारखा माणूस एखाद्या माणसावर डूख धरतो, तेव्हा तो माणूस आयुष्यातून उठतो.’
‘तुम्हालाही कधी त्रास दिला होता का त्यांनी?’
‘दिला नाही, पण एकदोनदा द्यायचा प्रयत्न केला होता. खांदवे सरांनी आम्हाला वाचवलं. खरं तर गजानन खांदवे हा आमचा मार्गदर्शक, आमचा आधारस्तंभ होता. आता तोच गेलाय. कदाचित संचालक आम्हाला पुढे त्रास देतील.’ राकेश सर जरा काळजीने म्हणाले.
‘तरीही तुम्ही धाडसाने सगळी माहिती देताय!’ लांजेकरांनी विचारलं.
‘हो.. आमच्या मित्राला, सहकार्याला न्याय मिळायला हवा असं वाटतंय. पण साहेब, आमच्या जिवाला काही धोका होणार नाही एवढं बघा हं. ती माणसं फार वाईट आहेत!’ असंही राकेश सरांनी सांगितलं. लांजेकरांनी त्यांना न घाबरण्याच्या सूचना केल्या आणि तपासाची चक्रं फिरवायला सुरुवात केली.
गावातल्या एका घरात खांदवे सर भाड्यानं राहत होते. त्यांचं कुटुंब त्यांच्या मूळ गावी असायचं. ते अधूनमधून तिकडे जायचे. अलीकडे दोन वर्षांत बायको रेखा मात्र अधूनमधून येत असे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
रेखाला भेटून तिच्याकडून काही माहिती मिळते का बघणं आवश्यक होतं. लांजेकरांनी तिला बोलावून घेतलं. आपण नसताना आपल्या नवर्यानं आत्महत्या करावी, याचा तिला फारच मोठा मानसिक धक्का बसला होता.
‘साहेब, आदल्या दिवशी रात्रीच आमचं फोनवर बोलणं झालं होतं. ते कुठल्यातरी काळजीत आहेत, असं त्यांच्या बोलण्यातून अजिबात वाटलं नाही!’ रेखाला प्रचंड दुःख वाटत होतं. ती ओक्साबोक्शी रडत होती. तिला विचारलेल्या प्रश्नांमधून एवढंच कळलं, की ती जेव्हा जेव्हा गावात यायची, तेव्हा तिने खांदवे सरांना आनंदातच बघितलं होतं. त्यांना कुठलाही मानसिक त्रास असल्याचं जाणवलं नव्हतं. संस्थाचालकांशी जे काही वाद होतील, ते तिथेच सोडून द्यायची खांदवे सरांची सवय होती. त्यामुळे रेखाला वेगळं काहीच जाणवलं नव्हतं.
खांदवे राहत होते, त्या घराची दोन्ही दारं आतून बंद होती. सरांनी आधी ठरवून, कुणाशीही न बोलता आत्महत्या केल्याचं उघड होतं. मात्र कुठलीही चिठ्ठी ठेवली नव्हती, की कुणाशी त्यांच्या मनातलं नैराश्य बोलून दाखवलं नव्हतं. त्यामुळे या आत्महत्येविषयीचं गूढ वाढत चाललं होतं. गावातला भाग असल्यामुळे तिथे कुठे सीसीटीव्ही असण्याची शक्यताही नव्हतीच. त्या रात्री त्यांचं कुणाशी बोलणं झालं होतं का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी फोनचे रेकॉर्ड्स मागवले, पण त्यात संशयास्पद असं काही सापडलं नाही.
इस्पेक्टर लांजेकर त्या भागात नव्या नियुक्तीवर आले असले, तरी त्यांना मिरजकर कुटुंबाचा तालुक्यातला दबदबा माहीत होता. केवळ संशयावरून त्यांच्यापैकी कुणाची चौकशी करण्यानेही काय गहजब होऊ शकतो, याची त्यांना कल्पना होती. तरीही विराजदादा मिरजकरांशी एकदा बोलायला हवं, असं त्यांना वाटलं. लांजेकरांनी थेट मिरजकरांच्या बंगल्यावर जीप नेली.
‘तुम्ही आमच्याकडे चौकशीला आलातच कसे?’ विराजदादांनी नेहमीच्या गुर्मीत लांजेकरांना विचारलं.
‘तुमच्या संस्थेतल्या एका शिक्षकानं आत्महत्या केलीय विराजदादा.. तुम्हाला काळजी वाटायला हवी. आत्महत्येला प्रवृत्त करणं हा गंभीर गुन्हा आहे.’ लांजेकरांनी शांतपणे, तरीही पोलिसांच्या अधिकारानं सांगितलं.
‘तुम्हाला काय म्हणायचंय?’
‘मी काहीच म्हणत नाहीये, तुमचं त्यांच्याशी काय वाजलं होतं, तेवढं सांगा. जेवढी जास्त आणि खरी माहिती सांगाल तेवढं आम्हाला बरं.’ लांजेकरांचा रोख विराजदादांच्या लक्षात आला.
‘हे बघा साहेब, खांदवे सर शिकवायला चांगले होते, पण आपल्या कामापलीकडे जाऊन नको त्या गोष्टीत लक्ष घालत होते. त्यावरनं एकदोनदा आमचे खटके उडालेले, तेवढंच.’
‘तुम्ही त्यांना धमक्याही दिल्या होत्या?’
‘धमक्या वगैरे काय दिलेल्या नव्हत्या. चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या होत्या. पण ते गेल्याचं दुःख आम्हाला पण आहे!’ विराजदादांनी सांगितलं.
‘ठीकेय, आणखी काही माहिती लागली तर येईन किंवा बोलावून घेईन.’ लांजेकरांनी बजावलं आणि तिथून निघाले.
लांजेकरांना आता प्रतीक्षा होती, ती पोस्टमार्टेम रिपोर्टची. तो अजून हातात यायला वेळ होता. त्याआधी त्यांनी सगळी माहिती खणून काढायचं ठरवलं होतं. का कुणास ठाऊक, दोन्ही दारं आतून बंद असली, तरी लांजेकरांना या आत्महत्येच्या बाबतीत आधीपासूनच मनात काही शंका होत्या. एवढा लढवय्या माणूस आत्महत्या का करेल, तेही कुठलीही चिठ्ठी न ठेवता, हे गूढ होतं. आत्महत्या करण्यासाठी माणूस टोकाच्या मानसिक अवस्थेत हवा, पण सरांच्या ओळखीतले जे कुणी होते, त्यांच्या बोलण्यातून असं काहीच जाणवत नव्हतं.
दुसर्या दिवशी सकाळी खांदवे सरांच्या ओळखीतले अविनाश बारगजे हे गावातले एक प्रतिष्ठित रहिवासी पोलिसांना भेटायला आले. लांजेकरांनी त्यांना बसवून घेतलं, येण्याचं कारण विचारलं.
‘साहेब, खांदवे सरांना मी जवळून ओळखत होतो. ते अतिशय उत्साही आणि कामसू असे व्यक्ती होते. पण त्यांच्या मनात काहीतरी सलत होतं.’ बारगजेंनी सुरुवात केली, तसे लांजेकरांचे डोळे चमकले. बारगजेंकडून त्यांना कळलं, की खांदवे सर कुठल्यातरी कारणाने अस्वस्थ होते. त्यांचे पैसे अडकले होते किंवा कुठल्यातरी प्रकरणाचा त्यांना त्रास होत होता. त्यांनी मोकळेपणाने कधी काही सांगितलं नव्हतं, पण कदाचित त्याच त्रासातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज बारगजेंनी व्यक्त केला. लांजेकरांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली. आता तपासाला एक वेगळंच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. लांजेकरांनी बारगजेंना धन्यवाद दिले. त्यांना आग्रह करून चहापाणी घ्यायला लावलं आणि त्यांचा फोन नंबर घेऊन गावाबाहेर तूर्त न जाण्याची विनंती केली.
‘मेजर, आपल्याला पुन्हा स्पॉटवर जायचंय.’ असं म्हणून लांजेकरांनी हवालदाराला गाडी काढायला लावली. खांदवे सरांच्या घरी ते आले आणि पुन्हा सगळ्या गोष्टींची नीट तपासणी केली. काही वस्तू नव्याने ताब्यात घेतल्या, त्या तपासणीसाठी पाठवून दिल्या. त्यांच्या डोक्यात काही चक्रं फिरत होती हे नक्की. सगळी तपासणी पुन्हा झाल्यावर ते मागच्या दारापाशी गेले. दाराच्या वर असलेली कडी काढली. दोन्ही बाजूंना उघडणारं दार होतं ते. लांजेकर दारातून बाहेर गेले. जाताना त्यांनी दोन्ही दारं एकात एक अडकवून थोडीशी ओढली. त्यांनी कडी आधीच थोडी वर घेतली होती. बाहेरून दोन्ही दारं एकदम ओढल्यावर एक चमत्कार झाला. कडी वर सरकली आणि आपोआप लागली.
‘मेजर, हे बघितलंत? याचा अर्थ आत कुणीतरी होतं, त्यानं बाहेर जाऊन दार लावलंय आणि दार आतून बंद असल्याचा आभास निर्माण केलाय. आता मला लवकरात लवकर पोस्टमार्टेम रिपोर्ट हवाय!’ लांजेकरांनी सूचना केली आणि ते गाडीत जाऊन बसले.
दुपारीच पोस्टमार्टेमचा रिपोर्ट हातात आला आणि तो बघून लांजेकरांचा चेहरा उजळला.
‘हे बघा, म्हटलं नव्हतं? ही आत्महत्या नाही, हा खून आहे! काल घटनास्थळी गेल्यापासून मला ते सारखं जाणवत होतं. कुणीतरी खांदवे सरांना गळा दाबून मारलंय आणि नंतर फासावर लटकवलंय.’ लांजेकरांच्या चेहर्यावर आत्मविश्वास झळकला.
‘पण कुणी साहेब?’ हवालदारांना काही अंदाज येत नव्हता.
‘आहे एक संशयित. आपण घटनास्थळावरून जे ठसे घेतलेत, त्यांचा रिपोर्ट आता येऊ दे, मग उचलूया.’ असं म्हणून लांजेकरांनी विषय संपवला.
दुसर्याच दिवशी ते रिपोर्टही आले आणि लांजेकरांनी थेट अविनाश बारगजेंचं घर गाठलं.
‘चला, बारगजे साहेब. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकायचा तुमचा प्रयत्न तुमच्याच अंगाशी आलाय!’ असं म्हणून लांजेकरांनी बारगजेंची कॉलर पकडली आणि त्यांना गाडीत टाकलं. आता गयावया करण्यापलीकडे बारगजेंच्या हातात काही उरलं नव्हतं.
‘खांदवेंनी आत्महत्या केलेली नाही, त्यांना गळा दाबून मारलं गेलंय. तुमचे ठसे सापडलेत त्यांच्या गळ्यातल्या दोरीवर आणि दारावरसुद्धा. आतून दार बंद असल्याचं नाटक तुम्ही कसं सादर केलंत, तेही समजलंय. आता फक्त त्यांना मारायचं कारण सांगा!’ लांजेकरांनी दम दिल्यावर बारगजेंची बोबडीच वळली. ‘खांदवे स्वभावानं चांगले होते साहेब. माझी त्यांची हल्लीच ओळख झाली होती. ते कुणालाही मोकळेपणानं मदत करायचे. माझं धंद्यात नुकसान झालं होतं. दुकान बंद पडलं होतं, पैशांची गरज होती. मी त्यांच्याकडून पैसे घेतले. एकदा नाही, अनेकदा घेतले. त्यांनी ते दिले, पण मी ठरलेल्या वेळेत परत केले नाहीत. बरंच कर्ज झालं होतं. मी कर्ज फेडण्यासाठी काही प्रयत्नही करत नाहीये, हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला झापलं. माझ्याविरुद्ध तक्रार करायचा इशारा दिला. मला भीती वाटली. सर जे ठरवतील ते करतीलच, याची खात्री होती. त्या दिवशी त्यांना समजवायला घरी गेलो, पण आमचं जोरदार भांडण झालं आणि मी त्यांचा गळा दाबून त्यांना मारून टाकलं.’ बारगजेंनी कबुली दिली.
पोलिसांकडे इतरही पुरावे होतेच. त्यांनी बारगजेंना कोठडीत टाकलं. केवळ परोपकारी वृत्तीतून एका चांगल्या माणसाचा निष्कारण बळी गेला होता.
(लेखक मालिका व चित्रपट क्षेत्रात नामवंत संवादलेखक आहेत)