• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

काय, सध्या काय करतेस?

- भक्ती चपळगावकर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 22, 2021
in मातीच्या चुली
0
काय, सध्या काय करतेस?

 

हा प्रश्न नोकरी सोडलेल्या अनेक पोरीबाळी, बायकांना विचारला जातो. प्रश्न विचारण्यामागे काही गंभीर कारण नसते. कित्येकदा कोणत्या विषयावर चर्चा करावी हे न कळल्यामुळे, तर कधी तुम्ही यापूर्वी नोकरी करत होता हे माहित असल्याने हा प्रश्न विचारला जातो. जर मला कुणी हा प्रश्न विचारला आणि जर मला हिंदी सिनेमाच्या भाषेत, ‘मेरे अंदर की भड़ास’ काढायची असेल तर मग समोरच्याचे काही खरे नसते. मी प्रश्न विचारणार्‍याला प्रतिप्रश्न करते, ‘म्हणजे काय?’ समोरची व्यक्ती म्हणते, ‘काही नोकरी वगैरे?’ मी म्हणते, ‘मग असं विचारा की, पैसे कमावतेस का? पैसे कमावायला घराबाहेर जातेस का? कारण तू काय करतेस म्हटल्यावर मला मी करत असलेल्या अनेक गोष्टींची यादी मनात आली, आणि त्यातलं काय काम सांगू हे काही कळेना मला.’
मी वयाच्या सतराव्या वर्षी नोकरी करायला सुरुवात केली आणि ती पुढे सतरा वर्षे करतच राहिले. मग मन चिपाड झाल्यानंतर मी नोकरी सोडली. आता आपण नोकरी सोडली तर मस्तपैकी आराम करुयात असेही ठरवले होते, पण झाले भलतेच, नोकरीच्या ठिकाणी जाताना आणि परतताना मिळून जे हक्काचे दोन तास मिळत होते, तेही मिळेनासे झाले. माझी एक जवळची मैत्रीण मला एकदा म्हणाली, ‘बायकांनी नोकरी का करावी सांगू? सकाळी छान तयार होऊन घराबाहेर पडता येतं आणि घरामध्ये जे कामाचे ढीग असतात, त्याकडे जरा दुर्लक्ष करता येतं आणि स्वतःसाठी जरा जगता येतं.’ हे सांगणारी मैत्रीण दुबईसारख्या महानगरीतल्या सगळ्यात मोठ्या मॉल्समध्ये इव्हेंट ऑर्गनायझर आहे, तिची स्वतःची कंपनी आहे, आणि जवळ मोठा स्टाफ. प्रत्येक इव्हेंट यशस्वी होण्यासाठी तिला मरमर मेहनत करावी लागते. तरी घर सांभाळणे किती जिकिरीचे आहे याची जाणीव तिला आहे. त्याचबरोबर घरी कितीही अडचणी आल्या तरी त्यांच्यासह मात करून घराबाहेर पडून मेहनत करण्याची जिगर आहे.
शिक्षित असून नोकरी न करणार्‍या स्त्रियांना कमी लेखण्याचा सध्या ट्रेंड आहे, आणि दुसर्‍या बाजूला ‘आम्ही नाही बाबा आमच्या मुलांना कामवाल्यांच्या/ डे केयरवाल्यांच्या हाती सोपवत’ असे म्हणणार्‍या/म्हणणारे कमी नाहीत. पण नोकरी करण्याच्या मुळाशी इतर अनेक कारणं आहेत. त्यापैकी दोन महत्त्वाची म्हणजे आर्थिक गरज आणि तुमची उत्कट इच्छा. तुम्हाला नोकरी सोडून कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडायची इच्छा असेल पण जर ईएमआय भरायचा असेल तर तुम्ही मन मारून काम करता. कितीही संकटं आली तरी मी घराबाहेर पडून काम करीन असे जेव्हा एखादी आई ठरवते, तेव्हा त्यात तिची तिच्या कामाविषयीची श्रध्दा असते आणि तिच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठीही ती ते करत असते. मुंबईत राहणार्‍या लाखो आया रोज मनावर दगड ठेऊन कामाला जातातच. त्याचबरोबर या धकाधकीत स्वत्त्व आणि सत्व गमावण्याच्या सीमेवर असलेल्या अनेक स्त्रिया नोकरी सोडण्याचा निर्णय घेतात. या दोन्ही प्रकारच्या स्त्रियांवर दगड मारण्याआधी लोकांनी स्वतःकडे डोळस नजरेने बघितले पाहिजे.
‘एवढे शिकून घरीच बसायचं होतं तर शिकलात कशाला?’ असले फालतू प्रश्न विचारणार्‍यांना काय सांगावे? पितृसत्ताक पद्धत कोळून पिऊन असले प्रश्न विचारले जातात आणि गंमत म्हणजे बर्‍याचदा हे प्रश्न विचारणार्‍यांना आपण स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार करत आहोत असे वाटते. अहो, शिक्षण व्यक्तीला सुजाण, सजग, सुबुद्ध बनवते, त्याचबरोबर त्याला स्वावलंबी बनवते. शिक्षण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करते हा स्त्री शिक्षणाचा एकमेव उपयोग असेल तर मुलगी जन्मल्यापासून ‘शहाणी हो, मोठी हो, गुणी हो’ असा आशीर्वाद न देता, ‘पैसे कमाव’ असा आशीर्वाद तरी देत जा. स्त्रीपुरूष समानता स्त्री आणि पुरूष दोघांनीही एकमेकांचा सन्मानाने वागवले तर अस्तित्वात येते. बायकोचा पगार आपल्या खात्यात डायरेक्ट जमा करणार्‍या नवर्‍यांची कमी नाही.
आपल्या देशात एक मोठा कामगार वर्ग अदृष्य आहे. तो आपल्या आजुबाजूला असतो, काम करत असतो, पण जेव्हा आपल्या देशाचा जीडीपी निश्चित करायची वेळ येते किंवा एम्प्लॉयमेंट रेकॉर्ड बनतात तेव्हा हा वर्ग कितीही मोठ्या भिंगाचा चष्मा घातला तरी खोलवर रुजलेल्या पितृसत्ताक समाजाला दिसत नाही. हा वर्ग म्हणजे घरी राहून काम करणार्‍यांचा वर्ग. मध्यंतरी एके ठिकाणी वाचलं की आपल्या देशांतल्या स्त्रियांसाठी घरकाम हे कर्तव्य आहे आणि पुरुषांसाठी पर्यायी गोष्ट. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या मते, भारतातल्या स्त्रिया दररोज सरासरी ३५२ मिनिटं घरकाम करतात, तर पुरुष ५० मिनिटं. (थोडं काम पुरूष पण करतात हो) विनीत जॉन सॅम्युअल नावाचा आर्थिक विषयांवरचा ब्लॉगर म्हणतो, एक अब्ज तीस कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशांतल्या ४९ टक्के लोकसंख्येचे अर्थव्यवस्थेतले बिनपगारी योगदान लक्षात न घेता देशाचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) मोजणे चुकीचे आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दहा वर्षांपूर्वी म्हटले, भारताने स्वतःच्या घरी काम करणार्‍या स्त्रियांच्या कामाचे मूल्य काढले तर भारताचा जीडीपी तीस टक्क्यांनी वाढेल.
म्हणून नोकरी सोडून घरी राहण्याचा निर्णय घेणार्‍या ‘तिला’ तू सध्या काय करतेस हा प्रश्न विचारणार असाल तर ‘तिच्या’ वतीनं काही उत्तरं मला सुचली आहेत.
मी सध्या (स्वतःच्या) मुलांच्या ट्युशन घेते.
मी सध्या गृह आर्थिक व्यवस्थापक म्हणून काम करते.
मी सध्या ज्येष्ठ नागरिक मदतनीस म्हणून काम करते.
मी सध्या शेफ म्हणून काम करते.
या उत्तरांची यादी संपत नाही.
ही उत्तरं जरी मला सुचत असली तरी प्रत्येक वेळी कुठल्या कुठल्या फॉर्मवर स्वतःच्या नावासमोर हाऊसवाइफ असं लिहिताना प्रत्येक वेळी छातीत कळ उठते. किती वाईट शब्द आहे हा. हाऊसवाइफ-घर सांभाळणारी बायको. मी फक्त बायको कधी झाले? मी माणूस आहे, स्त्री आहे. बायको, आई, मावशी, आत्या, मामी वगैरे सगळे माझ्या दृष्टीने दुय्यम आहे. आता हाऊसवाइफला पर्यायी शब्द आलाय, होममेकर-घराला घरपण देणारी बायको. हा शब्दही मला साफ मान्य नाही. मरमर करून नोकरी करणारी बाई काय घराला घरपण देत नाही का? ती होममेकर का नाही? ती तर दिवसभर काम करून, संध्याकाळी लोकलमध्येच भाजी निवडून घरी येऊन पुन्हा घरच्या लोकांच्या आवडीचा स्वयंपाक करते. तिची मेहनत कमी महत्वाची का?

(बातमीदार, वृत्त संपादक, सहसंपादक अशा अनेक पदांवर काम केल्यानंतर लेखिका सध्या मुक्त पत्रकार म्हणून काम करत आहेत.)

Previous Post

‘सिलसिला’ आला नि संपला?

Next Post

प्रेमपत्राचा इतिहास

Next Post
प्रेमपत्राचा इतिहास

प्रेमपत्राचा इतिहास

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.