आज बरोब्बर एक वर्ष झालं ‘जनता कर्फ्यू’ला आणि त्यापाठोपाठ टाळ्याथाळ्यांच्या गजरात स्वागत समारंभपूर्वक देशात आलेल्या करोनाने वर्षभर ठोकलेल्या मुक्कामाला.
हे वर्ष सगळ्या मानवजातीसाठीच यादगार आहे.
माणसाच्या आयुष्यात एखादं वर्ष संस्मरणीय असतं, चांगल्या किंवा वाईट अर्थाने. चांगलं वर्ष संपता संपू नये असं वाटतं. वाईट वर्ष सहा महिन्यांतच आटोपेल तर बरं असं वाटतं. पण, एकाचं चांगलं वर्ष दुसर्यासाठी अतिशय वाईट असू शकतं. हा जगाचा नियमच आहे.
पण या नियमांनाही अपवाद असतात. सगळ्या जगासाठी वाईट असलेलंही एखादं वर्ष येतंच आणि सगळ्या जगाला अद्दल घडवून जातं. शंभर वर्षांपूर्वी जगावर स्पॅनिश फ्लू या संसर्गजन्य आजाराच्या साथीचं संकट कोसळलं होतं, तेव्हा त्याचा फटका जगाच्या मोठ्या भागाला बसला होता. तेव्हा जग आजच्याइतकं जवळ आलेलं नव्हतं, ग्लोबल खेडं बनलेलं नव्हतं. म्हणूनच त्यानंतर शंभर वर्षांनी करोनाच्या रूपाने असंच संकट कोसळलं, तेव्हा सगळ्या जगाला त्याचा फटका बसला. त्यातून अजूनही जग सावरलेलं नाही आणि या वर्षी करोनाच्या दुसर्या लाटेचा तडाखा बसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हेही वर्ष बादच धरावं लागणार की काय अशी धास्ती आहे.
संकट माणसावर कोसळणारं असो की मानवजातीवर- ते काही धडे घेऊन येतं. त्या धड्यांपासून आपण काही शिकतो का, असा प्रश्न असतो. गेल्या वर्षाने आपल्याला काय धडे शिकवले?
धडा क्र. १ : साधा सर्दी-खोकला वाटणारा एखादा आजार थेट जिवावर बेतू शकतो. साबणाने धुतला जाणारा एक अतिसूक्ष्म विषाणू फुप्फुसात पोहोचला की आयुष्याचा खेळ संपवू शकतो. कोणालाही आणि कशालाही कमी लेखू नका. वेळ आली की छोटाही मोठा धडा शिकवतो.
धडा क्र. २ : जगात खरी समानता साथीचे आजारच आणतात. श्रीमंतांना, सुखवस्तूंना रोगापासून बचाव करण्याची अधिक साधनं उपलब्ध असतात. त्यांच्यापाशी
लॉकडाऊनसारख्या जालीम उपायांच्या काळात सुखाने जगण्याची व्यवस्थाही असते. पण, रोगापासून बचावाच्या बाबतीत हलगर्जी केली तर विषाणू सगळ्यांना समान न्याय देतो. गरीब श्रीमंत पाहात नाही, फक्त फुप्फुस पाहतो. भारतापेक्षा साधनसुविधासंपन्न आणि श्रीमंत असलेल्या अमेरिकेत करोनाने केलेली वाताहत दुसरं काय सांगते?
धडा क्र. ३ : आज ज्या जगात आपण वावरतो आहोत, ते जग जगाच्या अंतापर्यंत कायम राहील, अशी समजूत कोणीही करून घेता कामा नये. वर्षभरापूर्वी ज्याच्या तोंडावर मास्क असेल असा माणूस शेजारी बसला तर वाटायचं, याने मास्क का घातलाय, याला काय आजार झाला असेल, तो आपल्यालाही होईल का? आज सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क असणं हे ‘न्यू नॉर्मल’ झालं आहे. आज शेजारी बिनामास्कचा माणूस येऊन बसला तर आपल्या तोंडावर पट्टी असली तरी आपण धास्तावतो आहोत. अवघ्या एका वर्षात आपलं जग बदलून गेलं की नाही?
धडा क्र. ४ : आपली कंपनी, आपले मालक, आपले सहकारी असं सगळं काही आपलं आहे, असं आपण धरून चालतो. नियतीचा एक तडाखाही त्या गृहितकाला उद्ध्वस्त करायला पुरेसा ठरतो. करोनाकाळाने लोकांना काय काय दशावतार दाखवले दुर्दैवाचे. जिथे निष्ठेने वर्षानुवर्षं सेवा बजावली तिथे फक्त एका फोनवर किंवा मेसेजवर नोकरीतून कमी केलं गेलं, नोकरीची आणि उत्पन्नाची सर्वाधिक गरज असताना. घरांच्या कोंडवाड्यांत अनिश्चित काळासाठी कोंडले गेलेले असताना हा मानसिक आघात केवढा भयंकर असेल. त्याहून भयंकर होती ती वरिष्ठांची आणि सहकार्यांची वर्तणूक. आपण हे नाईलाजाने करतो आहोत, सगळं काही ठीक झालं की पुन्हा नोकरीत घेऊ असा दिलासा देण्याइतकाही मोठेपणा कोणी दाखवला नाही. ज्यांच्याबरोबर सुखदु:खाच्या गोष्टी केल्या, एकत्र एकमेकांचे डबे खाल्ले, असे सहकारी, निव्वळ व्यवस्थापनाची खप्पामर्जी व्हायला नको म्हणून साधा फोनही करत नाहीत ख्यालीखुशाली विचारणारा, हाही अनुभव विदारक होताच ना!
धडा क्र. ५ : जिथे या काळाने आपले वाटणारे लोक आपले नाहीत असं अंजन घातलं डोळ्यांत, त्याच वेळी त्याच काळाने तोवर परके असलेले लोक आपले खरे हितचिंतक आणि मित्र आहेत, हेही दाखवून दिलंच की. सामान्य म्हणून हिणवल्या जाणार्या माणसांनीच एकमेकांना आधार दिला. ज्याची स्वत:ची स्थिती ढासळलेली आहे, अशा माणसाने आपल्या घासातला घास काढून दिला. जिवावरचा विषय असूनही सच्चे लोकसेवक गोरगरिबांना आधार देण्यासाठी झटत राहिले, आरोग्यसेवकांनी, कायदा सुव्यवस्था रक्षकांनी प्राणांची बाजी लावून हे संकट परतवलं. महाराष्ट्रात तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपाने या कठीण काळातून खंबीरपणे राज्य निभावून नेईल असा आश्वासक, वडीलधारा माणूसच गवसला प्रत्येक घराला.
धडा क्र. ६ : करोना येवो, लॉकडाऊन होवो की काही होवो, जोवर आपण जिवंत आहोत, तोवर जगणं संपत नाही, हा मोठा धडा प्रत्येकाला मिळाला. नोकरीधंदा गमावल्यावर अनेकांना त्यांच्यातच दडलेल्या वेगळ्या कौशल्यांचा साक्षात्कार झाला. अनेक छोटे उद्योजक, व्यावसायिक तयार झाले. माणुसकीला पारख्या झालेल्या मालकांच्या नोकरीवर लाथ मारण्याची हिंमत मिळाली. नोकरीपेक्षा स्वयंरोजगारातून आपण अधिक सुखी आणि स्वावलंबी होऊ शकतो, असा साक्षात्कार झाला.
करोनाकाळाने आप्तेष्ट हिरावून नेले, अनेक विपदा आणल्या, भविष्याच्या योजना उद्ध्वस्त करून टाकल्या, वर्तमानाचा विस्कोट करून टाकला, हे सगळं खरंच आहे. पण, आपण सामान्य नाही, या राखेतून भरारी घेणारे फिनिक्स आहोत, याची जाणीवही याच करोनासंकटाने करून दिली ना! त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, आभारच मानले पाहिजेत त्याचे.