जरीन खान बॉलीवूडमधली एक गोड अभिनेत्री आहे… पण ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ या सिनेमानंतर ती दिसलीच नाहीये. त्यात तिने एक समलैंगिक व्यक्तिरेखा साकारली होती. आताच मिळालेल्या वृत्तानुसार लवकरच ती ‘पातालपानी’ या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय. नुकतेच या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. राज आशू यांचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा ‘आजाद देश के गुलाम भूत’ या कथानकावर बेतलेला आहे. यात जरीन खान आणि करणवीर बोहरा प्रमुख भूमिकेत दिसणार असून इला अरुण, राजेश शर्मा, अली असगर, उपासना सिंह, अदिती गोवित्रीकर, सुमित गुलाटी आणि राकेश श्रीवास्तव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत असे कळते. या सिनेमाबाबत जरीन खान म्हणते, हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हॉरर कॉमेडी सिनेमा करणं खरं तर खूप कठीण असतं. पण म्हणूनच ते काम आव्हानात्मकही आहे. म्हणूनच हा सिनेमा करताना नक्कीच मजा येईल, असेही ती स्पष्ट करते. सरकारने आखून दिलेल्या नियमावलीनुसार या सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले आहे.