ममतादीदींनी गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात पदयात्रा काढत पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर जोरदार पलटवार केला. पंतप्रधान मोठमोठय़ा गोष्टी करतात. ते म्हणतात, बंगालमध्ये परिवर्तन होणार आहे. खरं परिवर्तन तर दिल्लीत होणार आहे. त्यांनी बंगालमधील महिलांच्या सुरक्षेवर बोलण्याआधी उत्तर प्रदेश, बिहारची परिस्थिती बघावी, असे उत्तर ममतादीदींनी दिले.
मी ‘वन-ऑन-वन’ खेळण्यासाठी तयार आहे. केंद्र सरकारने दिल्ली विकली, अनेक संस्था विकल्या. उद्या ते ताजमहालही विकतील. मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावरील स्टेडियमही स्वतःच्या नावावर करून घेतले. देशात मोदी आणि अमित शहा हे एकच सिंडिकेट आहे. हे दोघे भाजपचेही ऐकत नाहीत. मोदी खोटारडे आहेत. ते सोनार बांगलाबद्दल बोलत आहेत. पण सोनार हिंदुस्थानचे काय? इंधनाच्या किंमती वाढल्यात, बँका विकल्या जाताहेत आणि हे बंगालमध्ये स्वप्ने विकायला आले होते, अशा शब्दांत ममतादीदींनी मोदींच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.
सौजन्य : दैनिक सामना