इरफान खानच्या ‘बिल्लू’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केलेली मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर हिचे नुकतेच सिद्धार्थ चांदेकरसोबत लग्न झालेले असतानाच तिची प्रमुख भूमिका असलेला ‘हॅशटॅग प्रेम’ हा नवा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. तत्पूर्वी या सिनेमाचा ट्रेलर आज सोमवारी रिलीज करण्यात आला. यानंतर आता हा सिनेमा येत्या 19 मार्चला रिलीज होतोय. शीर्षकावरूनच ही एक प्रेमकथा असल्याचं सहज लक्षात येतेय.
यासोबतच मिताली मयेकर आणि सुयश टिळक ही नवी कोरी जोडी आणि त्यांची केमिस्ट्री हीच या सिनेमाची मुख्य खासियत आहे. याची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. या दोघांमधील मैत्री आणि प्रेमाचं नातं अधोरेखित करत हा ट्रेलर कथानकातील इतरही घटनांवर प्रकाश टाकतो. निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली असून हा सिनेमा पिकल एंटरटेनमेंटच्या सहकार्यानं रिलीज होतोय.
राजेश बाळकृष्ण जाधव यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. निखिल कटारे यांनी या सिनेमाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. प्रविण कुवर यांचे संगीत असून गायक-संगीतकार रोहित राऊतने पार्श्वसंगीत दिले आहे.