राज्यपाल ही कुणी व्यक्ती नव्हे तर ती व्यवस्था असते आणि त्याचा मान राखला जाणे अपेक्षित असते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला हीच समाधानाची बाब आहे. राज्यपाल आणि सरकार मतभेद असू शकतात. यापूर्वीसुद्धा झाले, अशी कबुली विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत दिली.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, राज्यात आजही कोरोनाची गंभीर स्थिती आहे. परंतु ज्या पद्धतीने राज्यात कोरोनाचे संकट हाताळले जात आहे ते अतिशय गंभीर आहे. आधीही सातत्याने कमी चाचण्या केल्याने महाराष्ट्रात कोरोना वाढला. केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात महाविकास आघाडी सरकारचे अपयश स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने कोरोना नीट हाताळला असता तर 9 लाख 55 हजार रुग्णांची संख्या कमी झाली असती आणि 30 हजार 900 मृत्यू कमी झाले असते. आता ही जबाबदारी कोणाची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अमरावतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह देणारे रॅकेट असल्याचा आरोप केला. नवी मुंबईत 7 हजार 800 पॉझिटिव्ह अहवाल विनाचाचण्यांचे आल्याचा दावा करीत कोरोनाच्या काळातसुद्धा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
धार्मिक स्थळांमुळे कोरोना वाढतो का?
हे वर्ष संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सावता महाराज, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताई यांच्या समाधीचे 725 वे वर्ष आहे, परंतु त्यासाठी सरकारने कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन केलेले नाही. शिवजयंती आणि मंदिरे व धार्मिक स्थळांमुळेच कोरोना वाढतो का, असा सवालही त्यांनी यावेळी सरकारला केला.
सौजन्य : दैनिक सामना