रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या अलिशान घराशेजारी स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली चोरीची स्कॉर्पिओ गाडी सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे कृत्य कोणी व का केले, कुठल्या दहशतवादी संघटनेचा या मागे हात आहे का या आणि अशा सर्व दिशेने मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेनेदेखील या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराजवळ गुरुवारी पहाटे स्पह्टकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार पार्प करून चालकाने शिताफीने पळ काढला. बेवारस उभ्या असलेल्या या गाडीची माहिती मिळताच सर्वच तपास यंत्रणांनी त्या ठिकाणी धाव घेतली. गाडीत जिलेटिनच्या कांडय़ा, धमकीचे पत्र आणि अनेक नंबर प्लेट सापडल्यामुळे आणखीनच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. स्कॉर्पिओ कार ठाण्यातील एका व्यापाऱयाची असून ती विक्रोळी येथून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. पण ती कार कोणी चोरली, चोरून ती ठाण्याला पुठे नेण्यात आली याबाबत ठोस असे काही पोलिसांच्या अद्याप हाती लागलेले नाही. शहरातील सीसीटीव्ही बारकाईने तपासले जात आहेत. कार चोर, गॅरेजवाले यांच्याकडे चौकशी केली जात आहे. त्या गाडीत जिलेटिनच्या कांडय़ा सापडल्या होत्या त्या नागपूर येथून कोणी खरेदी केल्या होत्या याचा शोध घेतला जात असल्याचे त्या अधिकाऱयाने सांगितले.
प्रत्येक शक्यता पडताळून पाहणार
अद्याप कुठल्याही दशहतवादी संघटनेने या कृत्याची जबाबदारी स्वीकारलेली नसली आणि अजून तरी या प्रकरणाशी दहशतवाद्यांचा थेट संबंध समोर आलेला नसला तरी आम्ही हे दहशतवादी पृत्य आहे का त्या दिशेनेदेखील तपास करीत आहोत. प्रत्येक शक्यता पडताळून पाहिल्या जातील. सर्व बाजूने तपास केला जाईल असेही ते म्हणाले. शिवाय आतापर्यंत याप्रकरणी 25 जणांचे जबाब नोंदविण्यात आले असून आवश्यकता असेल तसे आणखी जबाब नोंदविले जातील असेही सांगण्यात आले.
इनोव्हाचा शोध सुरू
विक्रोळी येथून स्काॉर्पिओ कार चोरीला गेल्यानंतर ती ठाण्याला नेण्यात आली, पण ठाण्यात कुठे ते अजून समजू शकलेले नाही. मात्र ठाण्यातून नंबर प्लेट बदलून ती स्कॉर्पिओ मुंबईत आणण्यात आली. त्यावेळी तिच्यासोबत एक पांढऱया रंगाची इनोव्हा गाडीदेखील होती. स्कॉर्पिओ कार अँटिलियाजवळ पार्क झाल्यानंतर इनोव्हा तेथून निघून गेली. त्या इनोव्हाचा थांगपत्ता अद्याप लागलेला नसून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.
ठाणे पोलिसांचीही मदत घेणार
स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाडी ठाण्यातून मुंबईत आल्या होत्या. तसे सीसीटीव्ही फुटेजदेखील उपलब्ध झाले आहेत. मात्र ठाण्यातून त्या कुठून आल्या ते समजू शकलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात ठाणे पोलिसांचीदेखील मदत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सौजन्य : दैनिक सामना