‘‘छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास आपल्या मनात जिवंत आहे. ज्या मातीत हे तेज जन्माला आले त्या मातीची आपण लेकरं आहोत. छत्रपतींचे तेज आपल्याला संपूर्ण जगात पसरवायचे आहे. यासाठी जे जे काही करायला लागेल ते ते सर्व करण्याची आपली तयारी आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज किल्ले शिवनेरी गडावर केले. ‘‘शिवरायांच्या काळातील युद्धे आता जरी नसली तरी कोरोनाबरोबर आपली लढाई सुरू आहे. मास्क हीच आपल्या या युद्धातील ढाल आहे, हे विसरू नका,’’ असे आवाहन त्यांनी केले.
किल्ले शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391व्या जयंतीचा सोहळा कोरोना नियमावली पाळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिमाखदार आणि पारंपरिक रीतीरिवाजानुसार साजरा झाला.
गडावरील अभिवादन सभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर उपस्थित राहण्याचा बहुमान शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या आशीर्वादाने तसेच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आम्हाला सलग दुसऱयांदा लाभला आहे. शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हायला शिवजयंतीच पाहिजे, असा काही मुद्दा नाही. शिवरायांना आपल्या मनात, हृदयात अखंड एक स्थान आहे. कधीही, पुठेही, कोणत्याही कामाला निघताना छत्रपतींचे स्मरण होतेच. कोणतेही चांगले काम, पवित्र काम सुरू करायचे म्हटल्यावर छत्रपती शिवरायांचे नाव आठवते. कारण ते आपल्या रक्तातच आहे.’’
अनेक राज्ये लयास गेली,’ असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये वेगळेपण काय आहे, तर लढण्यासाठी तलवारीची आवश्यकता असतेच, पण नुसती तलवार घेतली म्हणजे युद्ध जिंकता येते असे नाही, तर ती तलवार पकडण्याची जिद्द लागते, युद्ध जिंकण्याची एक ईर्षा लागते, निश्चय लागतो, जिगर लागते, आणि ती प्रेरणा छत्रपतींनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना आज कितीही वर्षे झाली, म्हणजेच 300, 400, हजारो वर्षे झाली, तरी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवतच राहणार. म्हणून या दैवताला वंदन करण्यासाठी आपण शिवनेरी गडावर आलो आहोत.’
…तर शिवरायांनीही रयतेचा जीव धोक्यात टाकला नसता!
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘दरवर्षी आपण शिवजयंती उत्साहात साजरी करतो; परंतु या वर्षी कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. विदर्भामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री, गृहमंत्री काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या काळामध्ये घराघरात फिरले आहेत; परंतु त्यांनाही या आठ दिवसांत कोरोनाची लागण झाली आहे. म्हणून शिवजयंती मर्यादित स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज आज असते, तर त्यांनीदेखील रयतेचा जीव धोक्यात टाकण्याचा निर्णय घेतला नसता. त्या काळातदेखील छत्रपती शिवाजी महाराजांची दृष्टी होती, विचार होता. हा विचार किती महत्त्वाचा होता, ते क्षणोक्षणी आपल्या सर्वांना जाणवते. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱयांचे पैवारी होते, रयतेचे राजे होते. त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य सत्ता उपभोगण्यासाठी नव्हते, तर शेतकऱयांच्या, रयतेच्या कल्याणासाठी होते. रयतेला धोका निर्माण होईल असा कोणताही निर्णय महाराजांनी घेतला नाही.’
उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संभाजीराजे छत्रपती, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार विनायक मेटे, अतुल बेनके, जुन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्याम पांडे, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सनदी अधिकारी संकेत भोंडवे आणि डॉ. सदानंद राऊत यांना ‘शिवनेरीभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
सापांना वेळीच ठेचावे लागते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सनदी अधिकारी संकेत भोंडवे यांना छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार तर सर्पदंशावर अनेक वर्षे कार्य करणारे डॉ. सदानंद राऊत यांना शिवनेरी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, समाजात काही साप असतात ते दंश करत असतात त्यावर इलाज असतो, तो म्हणजे अशा सापांना वेळीच ठेचावे लागते. म्हणून अशा डॉक्टरांची आवश्यकता आहे.
शिवनेरीवरील वनस्पतीचे ‘शिवसुमन’ नामकरण
सन 1865 साली फ्रेरेरा इंडिका नावाच्या वनस्पतीचा शोध शिवनेरी किल्ल्यावर इंग्रज संशोधकाने लावला होता. या वनस्पतीचे आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘शिवसुमन’ असे नामकरण आणि पोस्ट तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
तर अजित दादांच्या मनात काय चालले आहे ते मला कळेल
समोरच्या माणसाच्या मनात काय चालले आहे हे समजणारी ‘इंगीत विद्याशास्त्र’ ही भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अवगत असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मला देखील अजित पवारांना अवगत असलेली इंगीत विद्याशास्त्र ही भाषा आता शिकायची आहे. म्हणजे ही भाषा मी शिकलो तर अजित दादांच्या मनात काय चालले आहे ते मला कळेल. अजित दादांनी मास्क घालू दे, अथवा गॉगल लावू दे, तरी देखील त्यांच्या मनात काय सुरू आहे हे मी ही भाषा शिकल्यानंतर ओळखून दाखवेन, असे सांगताच शिवप्रेमीमध्ये हशा उसळला.