राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रूही’ हा कॉमेडी हॉरर सिनेमा येत्या 11 मार्चला सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. आजच सोमवारी निर्मात्यांनी सोशल माध्यमांवर याबाबतची घोषणा केली. तोपर्यंत राज्यात पूर्ण क्षमतेने सिनेमागृहे उघडली असतील अशी आशा आहे, असेही निर्मात्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
हा सिनेमा जिओ स्टुडिओज आणि मॅडॉक फिल्मची प्रस्तुती आहे. हार्दिक मेहता यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात वरुण शर्माही एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची पटकथा ‘फुकरे’ हा हीट सिनेमा लिहिणाऱ्या मृगदीप सिंह लांबा यांनीच लिहिला आहे. ते या सिनेमाचे सहनिर्मातेही आहेत. निर्माते दिनेश विजन म्हणाले, राजकुमार रावचा ‘स्त्री’ हा हॉरर कॉमेडी सिनेमा 2018मध्ये हीट झाल्यामुळे त्याच पठडीतला सिनेमा बनवायचे आम्ही ठरवले.
मग नायक म्हणूनही राजकुमार राव हाच कथानकानुसार फिट बसला, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा सिनेमा एका गायक भुतावर बेतलेला आहे. हा सिनेमा गेल्याच वर्षी पूर्ण होऊन रिलीज होणार होता, पण कोरोना संकटामुळे तो अजून सुरूच होऊ शकलेला नाही.