मुंबई महापालिका अग्निशमन दलामध्ये जीप आणि इतर हलकी वाहने चालवण्यासाठीखासगी तत्त्वावर 54 चालक नेमण्यास मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने विरोध केला आहे. दरम्यान्, पालिका प्रशासनाने आणलेला हा प्रस्ताव स्थायी समितीनेही राखून ठेवला आहे. त्यामुळे तूर्तास हा प्रस्ताव लांबणीवर पडला आहे.
मुंबईत 2015 साली काळबादेवी येथील भीषणआग दुर्घटनेनंतर नेमलेल्या पालिकेच्या समितीने अग्निशमन दलात सुधारणा करण्यासाठी अनेक शिफारसी केल्या. यात समितीने रुग्णवाहिका, जीपतसेच इतर हलकी वाहने चालवण्यासाठी खासगी चालक नेमण्याची शिफारसही केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने खासगी तत्वावर चालक नेमण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र, दलात कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यामुळे अग्निशमन दलाचा नावलौकीक खराब होईल, दलाची प्रतिमा मलीन होईल तसेच या निर्णयाचा परिणाम दलाच्या दैनंदिन कामकाजावर होईल, अशी भीती अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेचे सरचिटणीस बाबा कदम यांनी व्यक्त केली आहे.या भरती प्रक्रियेमुळे अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंत्राटी भरतीला स्थगिती द्यावी, अशी मागणीही कदम यांनी केली आहे. मुंबई अग्निशमन दलात यंत्रचालक विभागात सध्या 665 पदे असून त्यापैकी 158 पदे रिक्त आहेत.