शिवडी-न्हावाशेवा जोडणाऱया ट्रान्स हार्बर लिंकचे काम वेगात सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पारबंदर प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली. मुंबईच्या समुद्रातील 21 कि.मी. लांबीच्या या पुलामुळे कोकण मुंबईच्या अधिक जवळ येणार आहे. गोवा महामार्ग चारपदरी झाल्यानंतर वेळेची बचत होणार असतानाच त्यात या हार्बर लिंकमुळे भर पडणार आहे. एवढेच नव्हे तर मुंबई, नवी मुंबईतील ट्रफिक जाममधूनही सुटका होणार आहे.
यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे प्रकल्पाच्या कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
प्रकल्पाच्या पुलाचे बांधकाम प्रगतीपथावरआहे. प्रकल्पाचे काम 42 टक्के पूर्ण झाले आहे. साडेचार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे. देशातील सर्वात लांबीचा समुद्रावरील पूल म्हणून या प्रकल्पाची ओळख झाली आहे. रायगड मार्गे गोवा आणि पुणे एक्प्रेस वे या मार्गामुळे मुंबईच्या जवळ येणार आहे.
समुद्रात सोळा कि.मी.चा पूल
या प्रकल्पात मुंबई शहरातील शिवडी व न्हावाला जोडणाऱया 22 कि.मी. लांबीच्या सहा पदरी पूल आहे. या पुलाची समुद्रातील लांबी 16.5 कि.मी. आहे. पुलावर जाण्यासाठी 5.5 कि.मी.चा मार्ग आहे. या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व नवी मुंबईतील शिवाजीनगर आणि राष्ट्रीय महामार्गावरील चिले गावाजवळ आंतरबदल (इंटरएक्सचेंज) आहे.
प्रकल्पासाठी जपानचे कर्ज
या प्रकल्पासाठी जपानच्या जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीने कर्ज दिले आहे. या प्रकल्पाची किंमत 17 हजार 843 कोटी रुपये आहे.