वांद्रे टर्मिनस ते रामनगर एक्स्प्रेसचे पाठचे दोन डबे जोगेश्वरी आणि राममंदिर स्थानकांदरम्यान ‘कपलिंग’ तुटून वेगवेगळे झाल्याचा विचित्र अपघात गुरुवारी सकाळी घडल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. हे डबे जोडल्यानंतर पुन्हा वसई रोडजवळ कपलिंग तुटल्याने हे डबे सेवेमधून हटविण्यात आले.
ट्रेन क्र. 09075 वांद्रे टर्मिनस ते रामनगर एक्स्प्रेसचे मागचे दोन एलएचबी कोच सकाळी 5.27 वाजता जोगेश्वरी आणि राममंदिरदरम्यान अचानक ‘कपलिंग’ तुटून गाडीपासून वेगळे झाले. यानंतर एकच गोंधळ उडाला. दुरुस्ती पथक घटनास्थळी पोहोचून सकाळी 6.40 वाजता ट्रेनचा बिघाड दुरुस्त करण्यात आला.
या गोंधळामुळे 73 मिनिटे गाडी रखडली. त्यानंतर ही ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर नायगाव आणि वसई रोडदरम्यान सकाळी 7.17 वाजता हे डबे पुन्हा एकदा वेगवेगळे झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हे डबे सेवेमधून हटविण्यात आले. यामुळे पुन्हा ही ट्रेन 21 मिनिटे रखडली. त्यानंतर 7.38 वाजता ही ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या घटनेचा पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या वाहतूक सेवेवर परिणाम झाला. या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.