ब्रिटनच्या महिला व समानता मंत्री आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव एलिझाबेथ ट्रस यांनी आपल्या शिष्टमंडळासह पालिका मुख्यालयात ‘हेरिटेज वॉक’ घेतला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांचे स्वागत केले. ब्रिटनसोबत महाराष्ट्राचे व्यापारी संबंध वाढवणे, व्यापार वाढवण्यासंबंधातही यावेळी चर्चा झाली.
पालिका मुख्यालयाचे हेरिटेज वैभव पाहून इंग्लंडच्या या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. आदित्य ठाकरे यांच्यासह पुरातन वारसा तज्ञ भरत गोठोस्कर यांनी शिष्टमंडळाला पालिका मुख्यालय इमारतीची ऐतिहासिक माहिती विशद केली. तसेच इमारतीचे वैशिष्टय़े स्पष्ट केली. यावेळी इंग्लंडचे महाराष्ट्रासोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यासंदर्भात चर्चाही झाली. या क्षेत्रात नव्या संधी शोधून त्यांना बळ देण्यावर यावेळी एकमत झाले. याप्रसंगी ब्रिटनचे दक्षिण आशिया व्यापार आयुक्त तसेच पश्चिम हिंदुस्थानसाठीचे बिटिश उप उच्चायुक्त ऍलन गिमेल हेदेखील उपस्थित होते. या वेळी महापौरांच्या वतीने स्नेहाचे प्रतिक म्हणून साडी भेट देण्यात आली. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे बोधचिन्ह असलेले पदक व नागरी दैनंदिनी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. यावेळी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, सुधार समिती अध्यक्ष सदा परब, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा श्रद्धा जाधव, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष श्रीकांत शेटय़े, आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा राजराजेश्वरी रेडकर आदी उपस्थि होते.