‘कलाकारांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱया फोर्ट येथील जहांगीर आर्ट गॅलरीची दारं लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच खुली होणार आहेत. आपल्या कलाकृतीच्या प्रदर्शनासाठी असलेले हे हक्काचे दालन तब्बल 11 महिन्यांनी खुले होणार असल्याने कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आयुष्यात एकदा तरी या कलादालनात आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्याची कलाकारांची ईच्छा असते.
अनलॉकच्या टप्प्यात हळूहळू सर्व गोष्टी पूर्ववत होतायत. चित्रपट, नाटकांचे प्रयोग पुन्हा सुरू झाले तरी जहांगीर आर्ट गॅलरीतील कलाप्रदर्शन मात्र अद्याप सुरू झाले नव्हते. 15 मार्चपासून बंद असलेली आर्ट गॅलरी आता सर्व खबरदारी घेऊन सुरू होत आहे. 16 फेब्रुवारीपासून येथे ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस,’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’चे विजेते बिभूति अधिकारी यांच्या ‘फेथ ऍण्ड फ्युरी’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल. आर्टिस्ट, स्कल्पचर, कार्टूनिस्ट बिभूति अधिकारी हे मूळचे पश्चिम बंगालचे आहेत.पहिल्यांदाच पीव्हीसी पाईप्सचा वापर करत त्यांनी काढलेली चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील.
‘द रोलिंग पेंटिंग’मधून निसर्ग संवर्धनाचा संदेश
निसर्गसंवर्धनाचा संदेश देणारे जगातले पहिले इनोव्हेटिव्ह पेंटिंग ‘द रोलिंग पेंटिंग’ या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे. 594 पीव्हीसी पाईप्सचा वापर करून 5 बाय 4 फूटाची ही पेटिंग तयार केसी आहे. प्रत्येक पीव्हीसी पाईपवर निसर्ग, हरीण, पक्षी, वाघ, मोर अशी जैवविविधता रेखाटण्यात आली आहे. विशिष्ट पद्धतीने या पाईप रोल केल्यावर तब्बल 12 विविध पेंटीग्स पाहायला मिळतील. अशा पद्धतीची पेंटींग कलारसिकांना प्रथमच बघायला मिळणार आहे.