पवित्र गंगा नदीचे उगमस्थान असलेल्या उत्तराखंडच्या देवभूमीत रविवारी पुन्हा एकदा महाभयंकर जलप्रलयाने हाहाकार उडाला. चमोली जिल्ह्यातील तपोवनच्या जोशी मठ परिसरात हिमकडा तुटून ऋषिगंगा नदीत कोसळला. या नदीचा प्रवाह पुढे रैणी गावात धौलीगंगा नदीत मिसळला. त्यामुळे धौलीगंगा नदी अक्राळविक्राळ रूप धारण करून वादळाच्या वेगाने वाहू लागली. या महापुराचा प्रवाह इतका जबरदस्त होता की मार्गातील तपोवन धरण, बोगदा, आसपासची घरे पूर्णपणे भुईसपाट झाली. मोठमोठय़ा मशिनरी वाहून गेल्या. यात जवळपास 176 हून अधिक नागरिक वाहून गेल्याची भीती आहे. सायंकाळपर्यंत 10 जणांचे मृतदेह हाती लागले.
रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पुढील तासाभरात दुर्घटनेची बातमी सगळीकडे पसरली व सर्व सुरक्षा यंत्रणांनी युद्धपातळीवर बचाव कार्य हाती घेतले. ऋषिगंगा नदीचा रैणी गावात धौलीगंगा नदीशी संगम होतो. हिमकडा कोसळून या दोन नद्यांच्या वाढलेल्या भयंकर पाणीपातळीमुळे परिसरात प्रचंड हाहाकार उडाला. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने तातडीने आसपासची गावे रिकामी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याशी फोनवरून चर्चा करून सर्वतोपरी मदतीचा हात पुढे केला. दुर्घटनेत धौलीगंगा नदीवरील ऋषिगंगा वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. जोशी मठाच्या नुकसानीची माहिती अजून पुढे आलेली नाही.
मृतांच्या कुटुंबीयांना सहा लाखांची मदत
महापुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी 2 लाख तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी प्रत्येकी 4 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली.
महापूराचा धोका कायम असल्यामुळे उत्तराखंडच्या चमोलीपासून हरिद्वारपर्यंत तसेच श्रीनगर, उत्तरप्रदेशमध्येही ‘रेड ऍलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उत्तराखंड पोलिसांच्या म्हणण्यानुसार, श्रीनगर, ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये पाणी धोक्याच्या पातळीवर जाऊ शकते. उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीच्या किनारी भागातील शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंडच्या जोशी मठाजकळ हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे अत्यंत दुखी आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो. मला विश्वास आहे की, बचाव पथके लवकरात लवकर या संकटावकर मात करतील.
– रामनाथ कोविद, राष्ट्रपती
गंगामातेचे उगमस्थान असलेले उत्तराखंड नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. येथील दुर्दैवी परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे. संपूर्ण हिंदुस्थान उत्तराखंडच्या सोबत उभा आहे. देश सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करीत आहे. या ठिकाणी वैद्यकीय सुविधा कुठेही कमी पडू नयेत, यावर सरकारने भर दिला आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
या कठीण परिस्थितीत मोदी सरकार उत्तराखंडमधील जनतेच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे आहे. आपत्तीतून सावरण्यासाठी उत्तराखंड सरकारला आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल. परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यास सरकारचे प्राधान्य आहे. – अमित शहा, गृहमंत्री
कुठे व किती हानी झाली?
– तपोवनमध्ये खासगी वीज कंपनीच्या ऋषिगंगा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आणि एनटीपीसी या सरकारी कंपनीच्या प्रकल्पाचे काम सुरू होते. हे दोन्ही प्रकल्प महापुरात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
– एनटीपीसीच्या प्रकल्पात 150 हून अधिक मजूर बुडाल्याची भीती आहे. या ठिकाणाहून सायंकाळपर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले.
– ऋषिगंगा हायड्रो पॉवर प्रोजेक्टच्या आकारातून 15 ते 20 कामगार बेपत्ता आहेत. या परिसरातील जोशीमठ मलारिया हायवेवरील बीआरओचा पूलही तुटला.
2013च्या ढगफुटीनंतरची सर्वांत मोठी नैसर्गिक आपत्ती
जून 2013 मध्ये घडलेल्या ढगफुटीनंतरची ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. 2013 साली ढगफुटी व हिमकडा कोसळून रुद्रप्रयाग, चमोली, उत्तर काशी, बागेश्कर, अल्मोडा, पिथौरागढ जिह्यांत हाहाकार उडाला होता. त्याकेळी 4,400 हून अधिक लोकांचा बळी गेला होता.
असे चालले मदतकार्य
– दुर्घटनेचे वृत्त कळताच लष्कर, हवाई दल, एनडीआरएफ, आयटीबीपी व एसडीआरएफच्या शेकडो जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.
– तपोवन प्रकल्पाजकळील बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी आयटीबीपीच्या जवानांनी तातडीने खोदकाम सुरू केले. या बचाव मोहिमेत सर्व 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
– अलकनंदा परिसरात राहणाऱया नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. भगीरथी नदीचा प्रवाह बंद करण्यात आला.