कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी वारीचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला असल्याने भाविकांची गर्दी रोखण्यासाठी वारीच्या कालावधीत पंढरपूर शहरात संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस विभागामार्फत जिल्हाधिकाऱयांकडे पाठविल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. संचारबंदी एक दिवसाची असेल की दोन दिवसांची याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील, असेही त्या म्हणाल्या.
सातपुते म्हणाल्या, कोरोना संसर्ग अद्यापि कायम असल्याने शासनाने लॉकडाउनचा कालावधी फेब्रुवारी अखेरपर्यंत वाढविला आहे. यापूर्वी आषाढी आणि कार्तिकी वारींवर कोरोनाचे निर्बंध घालून वारी प्रतीकात्मक साजरी करण्यात आली आहे. माघी वारीदेखील प्रतीकात्मक साजरी करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. 23 फेब्रुवारीला माघी एकादशी आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने 22 व 23 फेब्रुवारी असे दोन दिवस भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रांताधिकाऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे माघी यात्राकाळात संचारबंदी लागू करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविलेला आहे. आमच्याकडेही तो प्रस्ताव आला आहे. त्यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव देणार आहोत. यात्रेच्या वेळी पंढरपुरात गर्दी होऊ नये, यासाठी सोलापूर जिल्हा बॉर्डर, तालुका आणि शहराच्या हद्दीवर अशा पद्धतीने त्रिस्तरीय नाकाबंदी केली जाणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम उपस्थित होते.