अन्नदाता जर रस्त्यावर बसतो तर त्याला प्रतिसाद दिलाच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मांडली.
दोन महिन्यांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत पत्रकारांनी विचारले असता पवार म्हणाले, इतके दिवस कष्टकरी वर्ग रस्त्यावर बसला आहे, त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचाच प्रतिसाद म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरे तर चांगले नाही. मात्र कधीतरी आपले पंतप्रधान तिकडच्या गोष्टींबद्दल बोलले होते. आता तिकडून प्रतिक्रिया येत आहेत असे सांगून पवार म्हणाले,
‘शेतकऱयांना सरकार कधी खलिस्तानी म्हणते तर कधी अतिरेकी ठरवते. शेतकरी आंदोलनाला बदनाम केले जात आहे हे चांगले नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा. पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गडकरी यांनी पुढाकार घेतला तर मार्ग निघू शकेल. यात कृषीमंत्री तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही असे स्पष्ट करून पवार म्हणाले, सर्वोच्च स्तरावरून प्रयत्न झाला तर शेतकऱयांनीसुद्धा चर्चा करावी. स्वातंत्र्यानंतर असे देशात कधीच घडलेले नाही हे सरकारने लक्षात घ्यावे.
विधानसभा अध्यक्षपदाची जागा काँग्रेसचीच
नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर बोलताना शरद पवार म्हणाले,विधानसभा अध्यक्षपदाची ही जागा काँग्रेसचीच आहे. ही जागा काँग्रेसची असली तरी अन्य सहकऱयांशी चर्चा करण्याची महाविकासआघाडीत पद्धत आहे. जेव्हा आमच्याकडे तो विषय येईल तेव्हा आम्ही तिघे बसून चर्चा करू. वीज बिल आणि त्याविरोधातील भाजपच्या आंदोलनावर बोलताना शरद पवार यांनी आपण राज्य प्रशासनात लक्ष घालत नाही. यासाठी राज्यातील लोक आहेत, असे त्यांनी सांगितले