हल्ली सिनेमांचा दर्जा हा बॉक्स ऑफिसवर कमावलेल्या गल्ल्यातून ठरवला जातो. मात्र अशावेळी कोणी कलाकार बॉक्स ऑफिसचे आकडे त्यांच्यासाठी महत्वाचे नाहीत असे सांगत असतील तर ते खोटं बोलतात असे मत बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने व्यक्त केले आहे.
बॉलीवूडमध्ये अजय देवगणने स्वत:चे स्थान भक्कम केले असून त्याचा 2020 साली प्रदर्शित झालेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा त्याचा 100वा सिनेमा प्रचंड गाजला होता. मोजकेच सिनेमे करायचे पण ते उत्तम करायचे या मताचा हा अभिनेता आहे. अजय देवगणने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की ‘पूर्वी सिनेमा चांगला असेल तर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळायचा. प्रेक्षकांनी सिनेमागृहे भरली जायची. तिकीटे मिळायची नाहीत. तेव्हा तो चित्रपटाच्या कथेमुळे चालायचा. ते त्या चित्रपटाचे यश असायचे. मात्र अलिकडे चित्रपटाचा दर्जा बॉक्स ऑफिसवरच्या कमाईने ठरवला जातो. मात्र काही सिनेमे त्याला अपवाद असतात. आजही बॉक्स ऑफिसवर आपटलेल्या काही सिनेमांची क्लासिक सिनेमांमध्ये गणना केली जाते. काही वेळेला विषय चांगला असतो, त्यातून एखादा चांगला संदेश पोहोचवायचा असतो मात्र प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवतात. पण अलिकडे चित्रपटाचे यश त्याच्या कमाईवरुन ठरवले जाते त्यामुळे बॉक्स ऑफिसचे आकडे महत्वाचे नाहीत असे सांगणारे माझ्या मते खोटं बोलतात’
ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत अजय देवगणने म्हटलंय की, कोरोनाच्या महामारीत ओटीटी प्लॅटफॉर्म हे अनेक कलाकारांसाठी वरदान ठरले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म सिनेमागृहातला आनंद देऊ शकत नाही, मात्र त्या माध्यमातून जगभरातल्या चाहत्यांपर्यंत पोहोचता येऊ शकते. त्यामुळे कोरोना महामारीत बंद पडलेली सिनेमागृहे ही ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी वरदानच ठरला असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
पूर्वीच्या सिनेमांबाबत बोलताना अजय सांगतो की, ‘माझे वडील वीरु देवगण उत्तम दिग्दर्शक होते. त्याकाळात एखादा चित्रपट सलग पन्नास ते साठ आठवडे चालायचा. पण आता तशी परिस्थिती नाही. अलिकडे चित्रपटाची व्याख्या बदललेली आहे. सिनेमागृहाच्या गल्ल्यावरुन चित्रपटाचा दर्जा ठरवला जातो. अभिनयासाठी माझा जन्म झाला आहे, मला चित्रपट आवडतात आणि मी मोकळ्या वेळेत चित्रपटाविषयीच विचार करत असतो. ‘मे डे’ हा माझा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा मला भावली. प्रेम आणि थरार या दोघांचा मिलाफ असणारा हा चित्रपट आहे. अमिताभ बच्चन या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.’
अपयशातूनच आपल्याला शिकता येते.
‘प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असते आणि जिथे स्पर्धा असते तिथे तुलनाही होते. काही वेळेला ती तुलना फार गंभीर असते. पण त्यातून आपल्याला बरेच शिकता येते. कारण 100 चित्रपटानंतर जे यश आज पाहतोय ते आलेल्या अपयशातून पाहायला मिळाले आहे. तुमची कमजोरी ओळखा आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या आयुष्यात एका टप्प्यावर अपयश येते पण त्यातून पुन्हा उभे राहून त्यावर मात करता आली पाहिजे. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन यांच्याही आयुष्यात चढ-उचार आले, मात्र आजही ते लोकांवर राज्य करत आहेत. आता आपल्याला प्रत्येक शुक्रवारी नवीन सुपरस्टार पाहायला मिळतो.’ असं अजय देवगणने या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.