मुलुंडच्या गौड सारस्वत ब्राम्हण (जीएसबी) सभा या संस्थेद्वारे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्याने पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह येत्या 7 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. या समारोहात पं. राजा काळे यांना पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचा या महोत्सवात सहभाग आहे.
२०२१-२२ हे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने या महोत्सवाला विशेष महत्त्व आले आहे. या महोत्सवात ज्येष्ठ गायक पं. राजा काळे, गिटारवादक अभिषेक प्रभू, तबलावादक मंदार पुराणिक, विघ्नेश कामत, हार्मोनियमवादक अनंत जोशी, पखवाजवादक हनुमंत रावडे, मंजिरावादक अनिल पै, तानपुरा आणि गायक सहायक श्याम जोशी आणि अमृता काळे यांचा सहभाग आहे.
श्रुती रानडे कार्यक्रमाचं सूत्रसंचालक करणार आहेत. ७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत होणार आहे.