कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकरी-धंद्यांवर गदा आली, रोजगार बुडाले. संसाराची विस्कटलेली घडी कशी बसवायची या चिंतेत देशातील सर्वसामान्य माणूस असताना सतत होणार्या इंधन दरवाढीमुळे तो मेटाकुटीस आला आहे. पेट्रोल, डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल आणि महागाईचा भडका आणखीनच उडेल या चिंतेने देशातील जनतेत असंतोष पसरला आहे. शिवसेना या देशातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी असून 5 फेब्रुवारी रोजी 11 वाजता या पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे.
जगात सर्वाधिक पेट्रोल, डिझेलचे दर हे हिंदुस्थानात आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सतत पेट्रोल, डिझेल दरवाढ सुरूच आहे. कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यायचा नाही अशीच केंद्र सरकारची नीती आहे. महागाईच्या या भडकणाऱया वणव्यातून सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना 5 फेब्रुवारी रोजी 11 सकाळी वाजता पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात हे आंदोलन छेडणार आहे, अशी माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, विनायक राऊत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
केंद्र सरकारविरोधात होणाऱया आंदोलनादरम्यान राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालये तसेच शासकीय कार्यालयांसमोर निदर्शने केली जाणार आहेत. बैलगाडय़ा, सायकल मार्च काढून केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा तीव्र निषेध केला जाईल. या आंदोलनात शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी होतील, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.