कलर्स या हिंदी मनोरंजन वाहिनीवरील ‘छोटी सरदारनी’ या मालिकेतील नाट्यमय वळणांमुळे प्रेक्षक जणू बांधले गेले आहेत. ही मालिका आणखी रोचक व्हावी यासाठी मालिका 5 वर्षांचा गॅप घेत पुढे झेपावल्याचे दाखवण्यात येणार आहे. यातील प्रमुख व्यक्तिरेखा मेहेर (निम्रत कौर अहलुवालिया) व सरबजीत (अविनेश रेखी) ज्या प्रकारे जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर मात करून सशक्त झाले ते पाहून प्रेक्षकांनाही जीवनात प्रेरणा मिळते.
कथा पुढे सरकत असताना, मेहेरला खोट्या आरोपावरून तुरूंगात टाकले आहे. ती गरोदर आहे आणि ती सेहेर नावाच्या मुलीला जन्म देते. पुढच्या कथेत मेहेर व सरबजीतच्या जीवनाचा व त्यांच्या सेहेर मुलीच्या जीवनाचे नवे प्रकरण दाखवले जाणार आहे. सेहेरची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री केविना टाक हिला घेण्यात आले आहे. ती आईप्रमाणेच चलाख आहे, विनोदी आहे आणि अवघड आव्हाने स्वीकारण्यात ती मागे रहात नाही.
या भूमिकेविषयी बोलताना केविना टाक म्हणाली, अभिनय कारकीर्द सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ही भूमिकाही उत्तम आहे. काश्मीरमध्ये चित्रीकरण करणे खूपच विलक्षण होते, असेही ती सांगते. दुसरीकडे सरबजीत साकारणारा अविनेश रेखी म्हणाला, 5 वर्षांच्या झेपेमुळे मेहेर आणि सरबजीत यांची आयुष्ये अनपेक्षित पण तरीही रोमांचक कलाटणी घेणार आहे. यातून त्यांचे नातेच नाही तर कथेतील नाट्य आणि कलाटणीचे पुन्हा परिभाषित केले जाणार आहे.