सोनी मनोरंजन वाहिनीवर लवकरच ‘सरगम की साढेसाती’ ही हलकीफुलकी विनोदी मालिका सुरू होतेय. मनोरंजनासोबतच ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. या विनोदी मालिकेत अभिनेत्री अंजली तत्रारी ही सरगमच्या तर अभिनेता कुनाल सलुजा हा अपारशक्ती अवस्थी या प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
त्यांच्यासोबतच दर्शन जरीवाला, राजेंद्र चावला, सनत व्यास, जैनिराज राजपुरोहित, विभू भोलवानी, वैभव मांगले, आकाश मखिजा आणि अजिंक्य मित्रा यांच्याही भूमिका पाहायला मिळतील. गाझियाबादच्या पार्श्वभूमीवर बेतलेली ही मालिका सरगम आणि तिच्या जगावेगळ्या सासुरवाडीत घडणाऱ्या घटनांभोवती गुंफण्यात आली आहे. सासरी साडे सात पुरुषांमध्ये सरगम ही एकटीच महिला आहे.
या कुटुंबातील प्रत्येक पुरुष हा त्यांच्या विचारांवर कायम ठाम राहणारा असा आहे. त्यामुळे कुटुंबातील अगदी साधी घटनादेखील मजेशीर आणि गुंतागुंतीच्या स्थितीपर्यंत पोहोचते. कसे ते या मालिकेत पाहायला नक्कीच गंमत येईल.