अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी आणि ज्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे अशा सर्वांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने दिलासा देणारी बातमी दिली आहे. येत्या शुक्रवारपासून म्हणजेच 29 जानेवारीपासून लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे.
लॉकडाऊनपूर्वी पश्चिम रेल्वेच्या दिवसाला 1357 फेऱ्या होत होत्या. निवडक प्रवाशांसाठी लोकलसेवा सुरू करत असताना दोन्ही मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आली होती. पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या 1201 फेऱ्या सुरू असून त्या 29 तारखेपर्यंत वाढवण्यात येणार आहेत असं जाहीर करण्यात आलं आहे. 29 तारखेपासून पश्चिम रेल्वे मार्गावर 1300 फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेनेही याबाबतचा निर्णय जाहीर केला असून त्यांनीही शुक्रवारपासून आपली सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करणार असल्याचं जाहीर केलं आहे. लॉकडाऊन काळात मध्य रेल्वेच्या 1580 फेऱ्या सुरू असून 29 तारखेपासून या फेऱ्यांची संख्या 1685 इतकी होईल.
कोरोना संकट अजून कायम आहे. लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेल्या गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निर्णय घेतलेला होता. हे निर्णय घेत असताना लोकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करणे आणि शक्य तितके वेळा हात धुणे याचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आलेले आहे.
लोकलसेवा सुरू करत असताना रेल्वे प्रशासनाने 3 जणांच्या आसनव्यवस्थेत एक जागा रिकामी राहील आणि दोन प्रवाशांत अंतर राहील याची काळजी घ्यायला सांगितली होती. टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्रातील व्यक्तींना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आल्याने लोकल ट्रेनमधील गर्दी वाढायला लागली आहे. फेऱ्यांची संख्या कमी असल्याने काही लोकल ट्रेनमध्ये गर्दी होत असून सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यामुळेच फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
लॉकडाऊनपूर्वी मुंबईतील लोकलसेवेद्वारे दिवसाला 45 लाख प्रवासी रोज ये-जा करत होते. 6 जानेवारी 2021 रोजीच्या आकडेवारीनुसार प्रवाशांची संख्या ही 8 लाख 26 हजारच्या घरात होती. मुंबईत लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत दिले होते. मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एक बैठक झाली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.