ज्वलंत हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड, लाखो-करोडो शिवसैनिकांचे दैवत आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचा अंगार चेतवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज 95 व्या जयंतीनिमित्त राज्य आणि देशाच्या कानाकोपऱयातून आदरांजली वाहण्यात आली. शिवतीर्थावरील आपल्या लाडक्या साहेबांच्या स्मृतिस्थळावर लहान थोर, नेते, पुढारी, सर्वसामान्य असे सर्वच नतमस्तक झाले. सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा जयघोषात या प्रखर हिंदुतेजाला पुष्पांजली अर्पण केली.
शिवसेनाप्रमुख म्हणजे मराठी मनाचा मानबिंदू. समस्त हिंदूंचे आदरस्थान. शिवसेनाप्रमुख हे केवळ शिवसैनिकांचेच नव्हे तर सर्वांचेच लाडके नेते होते. प्रत्येक पीढीचे स्फूर्तिस्थान होते. आजही त्यांचे विचार मराठी माणसाला आणि हिंदूंना प्रेरणा देतात. तीच स्फूर्ती आणि प्रेरणा घेण्यासाठी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी वंदन केले. साहेबांचा फोटो गळ्यात घालून कांदिवलीहून आलेल्या चार वर्षीय पलक सावंत हिच्यासह अनेक चिमुकली स्मृतिस्थळावर नतमस्तक झाली.
शिवतीर्थ भगवेमय
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी आज शिवतीर्थाचा परिसर भगवामय झाला होता. अनेक जण हाती भगवा झेंडा घेऊन स्मृतिस्थळी आले होते. जन्मदिनानिमित्त साहेबांच्या स्मृतिस्थळावर रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती. स्मृतिस्थळाभोवती झेंडूच्या भगव्या फुलांची आकर्षक सजावट लक्षवेधी ठरत होती. शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरीला त्यांच्या आवडत्या मनमोहक चाफ्याच्या फुलांनी सजवण्यात आले होते. हिंदू, मुस्लिम, शीख अशा सर्वच धर्मीयांनी शिवसेनाप्रमुखांना मनोभावे आदरांजली अर्पण केली.