कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज दिवसभरात 3 हजार 39 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.79 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 2 हजार 910 कोरोना रुग्णांची नोंद झाली.
कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 52 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.54 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 37 लाख 43 हजार 486 चाचण्या झाल्या असून 19 लाख 87 हजार 678 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 24 हजार 705 जण होम क्वारंटाइन असून 2 हजार 37 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
मुंबईत दिवसभरात 700 कोरोनामुक्त
मुंबईत आज दिवसभरात 571 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 700 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 392 दिवसांवर पोहोचला आहे. सक्रीय रुग्णाच्या संख्येतही घट झाली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 235 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 83 हजार 135 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 392 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 965 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 25 लाख 82 हजार 248 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 3 लाख 2 हजार 223 वर पोहोचली आहे.