तापमानातील या मोठय़ा घसरणीने मागील 30 वर्षांतील विक्रम मोडीत काढला आहे. उत्तरेकडील इतर राज्येही थंडीने गारठून गेली आहे. गुरुवारी पहलगाम भागातील पारा उणे 12 अंशांपर्यंत खाली घसरला. तसेच गुलमर्ममध्ये उणे 10 अंश किमान तापमान नोंद झाले. बर्फवृष्टी सलग सुरू राहिल्यामुळे कश्मीर खोऱयातील तापमान उणे 8.4 अंशांवर खाली घसरले आहे. परिणामी, दल सरोवरावर पर्यटकांसाठी शिकारा चालवणेही मुश्कील बनले आहे.
जम्मू- कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रस्त्यांवरील बर्फ तत्काळ हटवण्याचे तसेच नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
राजस्थानमध्ये बुधवारच्या रात्री सर्वाधिक थंडी पडली होती. पंजाबच्या लोहडी परिसरातही गेल्या वर्षीच्या तुलनेत थंडीचा कडाका वाढला आहे. राजस्थानमध्ये माऊंट अबूपाठोपाठ श्रीगंगानगरमध्ये कडाक्याची थंडी आहे.
दिल्लीही गारठली
राजधानी दिल्लीही थंडीने चांगलीच गारठली आहे. गुरुवारी सकाळी पालम भागात 6.2 अंश, तर सफदरजंग परिसरात 2 अंश तापमान नोंद झाले. 1 जानेवारीला दिल्लीचा पारा 1.1 अंशांवर ढेपाळला होता. त्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच पाऱयाची मोठी घसरण झाली. शहरात पुढील दोन-तीन दिवस तापमानात मोठी घट नोंद होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.