महावितरणने वीज चोरीविरोधात धडक मोहीम सुरू केली असून मुलुंड परिसरात तब्बल 30 लाख रुपयांची वीजचोरी पकडली आहे. भांडुप झोनच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईंतर्गत 60 हजार युनिट विजेची चोरी झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार वीजचोरीचे 48 गुन्हे दाखल करण्यात आल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
मुलुंडच्या सर्वोदय, पाच रस्ता, नीलम नगर परिसरात बेकायदेशीरपणे विजेचा वापर केला जात असल्याची माहिती महावितरणच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये बेकायदेशीरपणे वीज वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी भरारी पथकाने आतापर्यंत किती विजेची चोरी झाली आहे. याची सरासरी आकडेवारी काढली असून ती जवळपास 60 हजार युनिट एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित वीज चोरांविरोधात 30 लाख रुपयांच्या वीज चोरीचा ठपका ठेवत गुन्हे दाखल केले आहेत. तसेच मुलुंडच्या गवाणपाडा, संभाजीनगर, डंपिंग रोड, नानेपाडा येथेही वीजचोरी विरोधात करवाई केल्याची माहिती भांडुप झोनचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.
नागरिकांनी अधिकृतपणे वीजपुरवठा घ्यावा!
भांडुप, मुलुंड परिसरातील बैठय़ा चाळींमध्ये एकाच मीटरवरून दहा-बारा रहिवाशांना बेकायदेशीरपणे वीजपुरवठा केला जातो, हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे प्रत्येक घरमालकाने इतर व्यक्तीकडून बेकायदेशीरपणे वीजपुरवठा घेण्याऐवजी महावितरणकडून स्वतंत्रपणे वीजपुरवठा घ्यावा, असे आवाहन सुरेश गणेशकर यांनी केले आहे.