सोनी मनोरंजन वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या‘स्टोरी 9 मंथ्स की’ या मालिकेत सुकीर्ती कांडपाल आलिया श्रॉफ या महिलेची व्यक्तिरेखा साकारतेय. ही आलिया एक स्वतंत्र आणि यशस्वी उद्योजिका आहे. विवाह अपयशी ठरल्यानंतर तिने आयव्हीएफच्या माध्यमातून आई होण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ती एका अनुरूप डोनरच्या शोधात आहे.
गर्भधारणा (इन्सेमिनेशन) यशस्वी झाल्याचे समजल्यावर आलिया भावुक होते आणि आपल्या बाळाचे संगोपन कसे करायचे याचा विचार करू लागते. या जादुई क्षणाच्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल सुकीर्ती म्हणते, आई होणे हा सगळ्यात गौरवपूर्ण अनुभव आहे. तुम्ही स्वतःला दिलेली ती सगळ्यात सुंदर भेट आहे. गर्भधारणा झाल्यापासूनच स्त्रीला आपल्या बाळाबद्दल वात्सल्य भावना दाटून येते आणि त्याला जपण्याची गरज लक्षात येते. मला या मालिकेतील आलियाची आई होण्याची उत्कंठा समजू शकते, कारण हा तिच्या आयुष्यातील खास काळ आहे, जेव्हा ती आपल्या बाळाला जन्म देणार आहे आणि त्याचबरोबर एक स्त्री म्हणून स्वतःचाही पुनर्जन्म अनुभवणार आहे. म्हणूनच आलिया या माझ्या व्यक्तिरेखेसाठी आई होण्याची भावना स्वप्नवत आहे, असेही ती पुढे स्पष्ट करते.