जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वेबसाइटवर हिंदुस्थानच्या नकाशाशी छेडछाड करण्यात आली आहे. या नकाशात गंभीर चूक झाली असून हिंदुस्थानने त्यावर आक्षेप नोंदवला आहे. डब्लूएचओच्या वेबसाइटवरील हिंदुस्थानच्या नकाशात जम्मू-कश्मीर आणि लडाख हे हिंदुस्थानपासून वेगळे दाखवण्यात आले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवर कोरोना व्हायरसशी संबंधित डॅशबोर्डवर जगाचा नकाशा दाखवण्यात आला आहे. त्यात हिंदुस्थानच्या नकाशात जम्मू- कश्मीर आणि लडाख हा प्रदेश हिंदुस्थानपासून वेगळा दाखवण्यात आला आहे. हिंदुस्थानने यावर आक्षेप घेतला असून त्यावर कठोर भूमिका घेण्यात येणार आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन डब्लूएचओचे एक्सिकेटिव्ह बोर्ड चेअरमन आहेत. त्यामुळे हिंदुस्थानकडून याबाबत कठोर भूमिका घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधीही काही आतंरराष्ट्रीय समारंभात किंवा कार्यक्रमात नकाशात हे प्रदेश हिंदुस्थानपासून वेगळे दाखवण्यात आले होते. त्यावर हिंदुस्थानने आक्षेपही नोंदवला होता.