अभ्युदयनगरच्या रेंगाळलेल्या पुनर्विकासाला आता रहिवासीच कंटाळले असून या मोठय़ा वसाहतीतील पाच इमारतींनी ‘स्वतंत्र’ पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात यासंदर्भात या इमारतीच्या प्रमुख पदाधिकाऱयांची नुकतीच एक संयुक्त बैठक झाली आणि त्यात स्वतंत्र पुनर्विकासाचा विचार पुढे आला.
काळाचौकी येथील अभ्युदयनगर ही म्हाडाची सर्वात मोठी वसाहत आहे. 45 गृहनिर्माण संस्थांच्या या वसाहतीचा सामूहिक पुनर्विकास व्हावा या हेतूने गृहनिर्माण संस्थांचा महासंघही स्थापन झाला. पुनर्विकासाची निविदाही मंजूर झाली. मात्र त्यानंतर विकासकाकडून काहीच हालचाल झालेली नाही. गेली काही वर्षे हा सामूहिक पुनर्विकास केवळ कागदावरच तयार झाला असल्याचे अनेक रहिवाशांचे म्हणणे आहे.
काय म्हणणे आहे त्यांचे?
- अभ्युदयनगरातील 2 ते 6 या पाच इमारतींतील पदाधिकाऱयांचे म्हणणे एवढेच आहे…
- विकासकाला काम पूर्ण करण्यास आणखी किमान 10 वर्षांचा कालावधी लागणार आहे. शिवाय येत्या 2 ते 3 वर्षांत काम सुरू होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.
- वसाहतीतील इमारतींची स्थिती लक्षात घेतली तर 4 ते 5 वर्षांत या इमारती निवासासाठी योग्य राहणार नाहीत.
- रहिवाशांनी 20 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा. म्हणजे पुढील कार्यवाही करणे सोपे जाईल.
महासंघ काय म्हणतो?
‘त्या’ पाच सोसायटय़ांच्या कार्यकारिणींनी यासंदर्भात आमच्याशी कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही. आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही निश्चितच त्यांच्याशी चर्चा करू असे महासंघाच्या एका पदाधिकाऱयाने सांगितले.