जार्काता विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या श्रीविजया एअरलाइन्सचे बोईंग 737-500 हे बेपत्ता झालेले विमान जाकार्तानाजीक समुद्रात कोसळल्याचे वृत्त स्थानिक टीव्ही चॅनेलने दिले आहे. या विमानात सात लहान मुले, सहा क्रू सदस्यांसह एकूण 62 प्रवाशांचा समावेश होता. हे सर्व प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. विमानाने उड्डाण घेताच अवघ्या चौथ्या मिनिटातच त्याचा एटीसीशी संपर्क तुटला होता.जाकार्तानजीकच खोल समुद्रात काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे सांगाडे आणि मानवी अवयव आढळून आल्याने विमान कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाल्याची माहिती इंडोनेशियन तटरक्षक दलाच्या त्रिसुला गस्ती नौकेचे कमांडर एको सूर्या हादी यांनी दिली आहे. या भीषण दुर्घटनेमुळे नववर्षाचा प्रारंभही दुःखद झाल्याची चर्चा सर्वत्र आहे.
इंडोनेशियाच्या जाकार्ता येथील सुकर्णो विमानतळावरून श्रीविजया एअरलाइन्सचे एसजे 182 क्रमांकाच्या विमानाने उड्डाण घेतली. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या चार मिनिटांतच विमानाचा एअर ट्रफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्याची माहिती समोर आली होती ज्यावेळी विमानाचा संपर्क तुटला त्यावेळी विमान तब्बल 10 हजार फूट उंचीवर होते. विमानांवर नजर ठेवणाऱया फ्लाइट रायडर 24ने दिलेल्या वृत्तानुसार विमान तांत्रिक बिघाडामुळे अचानक खाली कोसळल्याचे संकेत मिळाले होते. अखेर एटीसीची भीती खरी ठरल्याचे तटरक्षक दिलेल्या माहितीवरून उघड झाले आहे.
या विमानामुळे इंजिनाची बचत होत असली तरी या विमानाच्या इंजिनमध्ये समस्या असल्याने हे विमान बरेच चर्चेत राहिले आहे. इंजिनातील समस्येमुळे विमानाचा वेग कमी होऊ शकतो, तसेच विमान बंददेखील पडू शकते. ही समस्या दूर करण्यासाठी कंपनीने एक सॉफ्टवेअर विमानात बसवले होते. मात्र अनेकदा हे सॉफ्टवेअरदेखील चुकीचे निर्देश देत असल्याचे आढळून आले होते. याच कारणामुळे हे विमान अपघातग्रस्त झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.