भंडारा येथे आग लागून झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अग्निशमन दलानेही मुंबईत नर्सिंग होम आणि रुग्णालयांची झाडाझडतीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. अग्निशमन दलाकडून मुंबईतील सर्वच आस्थापनांची नियमितपणे तपासणी करण्यात येते. मात्र भंडारा येथील दुर्घटनेमुळे या कार्यवाहीला वेग येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला 2018 मध्ये लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मुंबईतील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे सर्वच नर्सिंग होम आणि रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेचे ऑडिट, तपासणी आणि यंत्रणा सुरू नसल्यास कारवाई करण्याची मोहीम पालिकेकडून सुरू आहे.
ऑक्टोबरमध्ये मुंबई सेंट्रल येथील मॉलला आग लागल्यानंतर सर्व मॉलची पाहणी करून अग्निशमन यंत्रणा नसलेल्या मॉल्सना नोटिसा बजावण्यात येत असल्याचेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
महापौरांनी ऑडिट रिपोर्ट मागवला
भंडाऱयातील दुर्घटना अतिशय दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील नर्सिंग होम, रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेच्या तपासणीचा वेग वाढवण्याचे निर्देश अग्निशमन दलाला देण्यात आले असून अग्निसुरक्षा नसणाऱया ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिल्याचेही महापौर पेडणेकर यांनी सांगितले.
मानखुर्दमध्ये सर्वाधिक बेकायदा नर्सिंग होम?
मुंबईत 1300 हून अधिक नोंदणीकृत खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम आहेत. मात्र मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर परिसरात 40 हून अधिक नर्सिंग होम, रुग्णालयांना अग्निशमन दल आणि पालिकेच्या इमारत आणि कारखाने विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केला असून संबंधितांवर पालिकेने कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.