हिकडे गावाकडे लय म्हंजे लयच थंडीचा कडाका आहे. त्यामुळा रोजच्या पेक्षा घोटभर जास्ती घेवची लागता मागा, काय करनार! तर तुज्या आवशीक राग येता. माका म्हनता, दारयेच्या ऐवजी मी गोमूत्र पियालंय आसतंय इतक्या आयुष्यात, तर तब्बेत चांगली झाली आसती नी दारयेर जेवडो पैसो खर्च झालो तेच्यात धा म्हशी नि धा गायी घेवक गावले आसते. बाप्या, आता तूच सांग- अशे हिशेब करीत र्हवलं आसतंय मी तर येवड्यात मी भारताचो अर्थमंत्री झालं नसतंय निर्मला शीतारामनसारो?
चिरंजीव थोरला बापू धोंडू पेडणेकर
उमर ४३, र्हानार कोळ्याची चाळ कॉलनी,
रूम नं. ७१, भांडुप (पूर्व).
यास आपला बापूस धोंडू राजाराम पेडणेकर याचा आशीरवाद. तरी परंतु ह्या साली तू चवथीला आला नाही ह्या चांगलाच झाला. जे जे मुंबयकार हिकडे गनपतीक म्हनुन आपापली लटांबरा घेवून इले ते आपल्यावांगडा कोरोना घेवून इले नि ह्येच्यामुळा जी काय धुमशाना होवची ती झालीच. आपल्या ग्रामपंचायतीन ठराव केल्लो होतो की जे कोन चवथीक भायल्या गावातसून येतील तेनी १४ दिवस शाळेत आफडीच्यासारख्या भायर र्हवायचा नि मगच गावात यायचा. पन `तुमी आमका कोन सांगनार? आमी आमच्या गावात येनार…!’ अशी खाज दाखवन काय काय चाकरमानी डायरेक इले नी तेनी कोरोनाच्ये मोदक नी न्हेवर्यो सगळ्यांका वाटल्यानी. जेनी जेनी ह्यो शानपाना केल्ल्यानी त्या सगळ्यांची ढेंगा वर झाली. आनि आमच्ये कनकवलेच्ये डाक्टर तुका म्हायतीच आसत बाप्या- अरे सादो कोन थंडीतापावयली गुळी घेव्क गेलो तर तेका टायफायड झालो म्हनान डायरेक अॅडमीट करनारे ह्ये डाक्टर. मागे येकदा पावसाकारनीची भाची पोटात चावरी होता म्हनुन येकटीच डाक्टराकडे गेली, तर मायझ्यान तिका भूल देव्न डायरेक शीजरीन केल्यान. आयचो घो ह्येंच्या- तेवा सांगुचो पाईंट काय, तर मुंबयकारांचो प्रावीडंट फंड सगळो कोरोनाच्या ट्रिटमेंटीत खराचलो. गाववाले प्रायवेट डाक्टरांकडे कोन जावकच नाय. सरकारी दवाखान्यातसून काय काय जन बरे होवन इले- काय काय मायझ्ये येवडे ताठ की तेंका भियान कोरोनाच त्वांड घेवन पळालो!
बाप्या, माका याक नवाल वाटता- ती कोन झुडतार नटी नि तो माजी मुख्यमंत्र्यासारखो किंचाळनारो बातमेवालो मुंबैचो, आमच्या महाराष्ट्राचो इतको इन्साट करीत आसताना तुमी सगळे मराठी लोक गप कशे र्हवलात? अरे तुमी दोन-चार लाख मराठी लोकांनी मोर्चा काडुन ह्येंची तोंडा गप करूक व्हयी होती.
आमच्ये बाळासायब आज आसते तर ह्या दळींदरांची नि तेंची बाजू घेनार्या कळींदरांची हिम्मत झाली आसता काय रे `मुंबै पाकिस्तानात आसा’ असा म्हन्न्याची? मायझ्यांका अशी तुडवन काडले आसते ना बाळासायबानी- की खालना बेंबटायचा काय वरना ह्या पन समाजला नसता तेंका. तरी राऊत सायबानी तेंची तोंडा फोडल्यानी म्हनुन बरा-
तो लुडबो बोलत सारखो मुंबैविरुद्ध घान वकीत आसता तो मुलुंडचो कोन रे तो? -हा – कारीट- तेका येकदा नरकचतुर्दशी दिवशी डाव्या पायाच्या आंगठ्यान फोडून टाका रे कोनी तरी. काय मेल्याक धड चार शब्द बोलाक येयत नाय नी ह्येका चार हजार शब्द बोलाची हौस. नि तो घाटकोपरवालो- कदम कदम रडाये जा- मेल्याची रड काय सोपत नाय- नटीक काय बोला नुको नी मोती गोस्वामीक अटक करू नुको- च्यामारी…! उपोषनाक बसलेलो येडझयो- जसो काय दुसरो अन्ना हजारेच. अरे ह्येची लायकी काय? `तुमी बिनधास्त पोरी पळवा- मी तुमच्या पाटी आसय.. म्हनुन बराळनारो ह्यो हराम! त्या मेंटल नटीक ह्यो झाशीची रानी म्हनाक लागलो तेवाच समाजले लोक की ह्येच्या पन बिचार्याच्या डोक्यार परिनाम झाल्लो आसा. ह्येच्यासारखोच तो प्रवीण मसालेवालो. खयलोव विषय आसांदेत, ह्येना तेचा लोकनचा केल्यानच समजायचा. अरे बाबा तुझो पगार किती नी तू बोलतंस किती-? तुला काय वाटला मुंबै बँक नि मुंबै पोलीस येकच? आता येकेकाच्या बोच्यार फटके बसाक लागले की समाजतला काय ता कोन नाय कोन्चा नि वरनभात लोन्चा.
तरी परंतु हिकडे गावाकडे लय म्हंजे लयच थंडीचा कडाका आहे. त्यामुळा रोजच्या पेक्षा घोटभर जास्ती घेवची लागता मागा, काय करनार! तर तुज्या आवशीक राग येता. माका म्हनता, दारयेच्या ऐवजी मी गोमूत्र पियालंय आसतंय इतक्या आयुष्यात, तर तब्बेत चांगली झाली आसती नी दारयेर जेवडो पैसो खर्च झालो तेच्यात धा म्हशी नि धा गायी घेवक गावले आसते. बाप्या, आता तूच सांग- अशे हिशेब करीत र्हवलं आसतंय मी तर येवड्यात मी भारताचो अर्थमंत्री झालं नसतंय निर्मला शीतारामनसारो? पन असो बिनडोकपना माका आयुष्यात जमनार नाय म्हनताना मी आपलो आसय तो धोंडू पेडनेकार म्हनुनच बरो आसंय. अरे तुमचो ह्यो चिपीचो इमानतळ आता झालो- पन ह्यो होवच्या आदी गेली पन्नास वर्सा मी माजा इमान येका पावशेरात रोज उडवीत नी जगातल्या खयल्याव इमानतळार उतरवीत इलंय- माका सांग बाप्या, गोमूत्र पिवान कदी कोनाचा इमान उडात काय रे? लयच लय म्हतला तरी गोमूत्रान रिक्षापन चलनार नाय-
तर सांगायचा म्हंजे आता ह्या दिवसात तुका कोनी इंग्लंडाक फुकट घेवन जातंय म्हनुन म्हतल्यान तरी जावू नये. कारन की थकडे कोरोनाच्या चुलतभावान धुमशाना सुरू केल्ली आसत, असा बातम्यात सांगल्यानी. तसेच ह्या दिवसात जिवाला सांबाळुन कामधंदा करणे व कायव झाला तरी भायर फिरताना तोंडार मुसक्या बांदूनच फिरणे. तशेच बाबल गावकाराच्या झिलाकडे रवळनाथाचा आंगारा पाठवला आहे, तो रोज स्वत: लावणे व तुज्या बायकोला तशेच मुलानला लावणे. डाक्टर काय पन बोलोत, पन माज्या मते कोरोना ही कायतरी भायली नड आसून कोनी तरी मंगळावयल्या किंवा शनीग्रहावयल्या मांतरिकाने आपली प्रिथवीवरची मानवजात नष्ट होन्याकरता उलटी मूठ मारलेली आहे. रवळनाथ सगळ्यांका बघून घेय्त. पत्राला जबाब पाठवने. लिवनार्याचा वाचनार्यास नमस्कार.
आपला,
धोंडू बापू पेडणेकर
शिरीयुत धोंडू राजाराम पेडणेकर, वडील यांचे सेवेशी चिरंजीव बापू धोंडू पेडणेकर, रा. भांडुप यांजकडून साष्टांग नमस्कार वि.वि.
आपले पत्र आताच मिळाले व आपला नातू म्हनज्ये माजा मुलगा आनंद बापू पेडणेकर, इयत्ता चौथी याचेकडून आताच वाचून घेतले. आपन सर्व गावाकडे खुशाल आहात, हे वाचून खुशी झाली. तसेच हसायला पन आला की आपन गावाकडची मानसे अजून पन कोरोना आला ह्याचे कारन कोनीतरी परग्रहावरील मांतरिकाने उलटी मूठ मारली किंवा तिकडे तांबड्या मंगळावर उलट्या पाखाची काळी कोंबडी कापून प्रिथवीवरील मानसांवर देवपान केली अशी अंधश्रद्धा बाळगता. तेवा कोरोना ही भायली बियली कोनतीही नड नसून ती भुतुरलीच अडचन आहे व ती चायनाच्या तिथल्या गावकारानी केलेली करनी आहे, ह्या ध्यानात ठेवणे. तशेच `करनी वैसी भरनी’ ह्या न्यायाने जगाला जसा तरास चायनाने दिला तसाच त्या देशाला पन आपल्या कर्माची फळे भोगायला लावीत आहे. आमी सर्वजन तोंडाला मुसक्या बांदूनच भायर फिरतो- तशेच गरम पान्याची वाफ पन घेतो व उगाचच्या उगाच काय कामधंदा नसताना भीडभाडवाल्या ठिकानी जात नाय. तरी तुमी पन कोरोना खतम होने तक तसाच करने. तशेच थंडी आसल्याकारनान घोटभर रोज जास्ती घेयाची गरज नाय. दारवेमुळे प्रतिकारशक्ती कमी होता- त्यामुळा आपला विमान कायमचा ढगात जाव् शकता.
तुमाला दुसरी गोस्ट कळवायची मंजे, कोरोनाचा टायम आला नि माजी कंत्राटदाराकडली मुकादमाची नोकरी सुटली. कारन की युपी नि बिहारच्ये कामगार बिल्डींगच्या कामावर होते. ते आपापल्या गावाला गेल्याकारणाने सगळी कामा थांबली नि कंत्राटदार म्हनला की परत कंट्रक्शन सुरू होयपर्यंत मला बी पगार देणे मुसकील हाय. तेवा मी आनि बायकोने सध्या भाजी इकायला सुरवात केलेली हाय. एक हातगाडी ह्या कामाकरता घेतलेली असून सकाळी आठ वाजल्यापासना रात्री आठपर्यात बारा तास मी आनि बायको वेगवेगळ्या सोसायटीत हातगाडी फिरवून भाजी ईकतो. ह्याच्यातना सध्या संसार चालवावा लागत असल्यामुळा तुमाला बर्याच म्हयन्यात मनीआर्डर करता आलेली नाय, तरी राग माणू नये.
मला ह्याबद्दल लय वाईट वाटता- पन माजोव नाविलाज झालेलो आसा. कंत्राटदाराची कामा परत सुरू झाल्यार मग पुना तुमाला गावी पैशे पाठवनार- तरी तोपर्यंत कळ काढने.
आमची मुंबय कशीव आसली तरी ती आमची आसा. आमका आवशी-बापाशी सारी आसा. त्यामुळा मुंबयक कोनी गाळी घातल्यान तर तेना आमच्या आवशी-बापाशीक गाळी घातल्यान असा आमी समाजतव. म्हणून आमानला पन त्या दळिंदर नटीचा आनि पिसाळलेल्या चॅनलवाल्याचा लय राग येतो. साले हरामी आपापली पोटं भरायला मुंबयमदी येतात नी मुंबयलाच शिव्या देतात. आनी तो हवा गेलेल्या फुग्यासारखा माजी झील्ल आनि तेच्ये पंटर पन मुंबयविरुद्ध अशा कारस्तानामदी सामील व्हतात हेचा लय वाय्ट वाटता. ह्ये आमाला हिंदुत्वाच्या गोस्टी शिकवनार! अरे ह्याचऽऽ बाबरी मशीद पडली तेवा ह्येंचे सगळे हिंदुत्ववाले कुल्याला पाय लाव्न पळून गेले. येकटे बाळासाहेब खनखणीत बोलले की, `जर बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकानी पाडलेली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे!’ आनि आता रामाच्या नावावर वरगणी गोळा करायला दारोदार फिरत राजकारण करनारी चिंधी जमात आमाला सांगायला लागलीय की, राम कसा एकवचनी नि एकबाणी होता ते. धा तोंडांनी धा प्रकारची नौटंकी करनारा रावण जर स्वत:ला राम समजायला लागला अन बिभीषण स्वत:ला लक्ष्मण समजायला लागला जर रामायणाचा काय होनार शेवटी? ताच सध्या ह्या देशामदी चाललेला हाय. मायेरचो पावनो पादलो तरी वासाचो तसा ह्या कमळाबायचा झालेला आसा. इतके अहंकारी नि अडानी लीडर ह्येंच्ये – काय मायझ्ये एकेक अकलेच्ये तारे तोडतंत-
हाल्ली ह्येनी आनखी एक नाटक सुरू केल्यानी हा. हेंका कोनी जरा जरी विरोध केलो तरी तेच्यार देशद्रोही असो शिक्को मारुन तेची निंदानालस्ती करायची. म्हंजे समजा ह्येंच्या परधानशेवकान आनि त्या शेवकाच्या शेवकान मिळान दोगानी डिक्लेर केल्यानी की पूर्ण देशात फक्त रिलायन्स ही येकच कंपनी उद्यापासना चालू र्हवात, बाकी सगळे कंपने बंद- आनि तुमी म्हटलात, वो असा कसा – आनखी येक अदानीची कंपनी तरी आसांदे- तर ह्ये म्हंतीत, `तुमका आमचा म्हनना पटत नाय? तुमी देशद्रोही आसात.’ ह्येची खरी पंचायत केल्यानी पंजाबच्या शेतकर्यानी. ते खलिस्तानी असत, ते पाकिस्तानाक सामील आसत अशी न्हेमीची घानयारडी रेकार्ड लावन ह्येनी बगल्यानी. पन तेचो काय परिणाम त्या शेतकर्यांवर होव्क नाय. तेनी ह्येंका असा बूच मारून ठेवल्यानी हा की यांव रे यांव! चौकीदार चोर है की मोर है, ह्या शेतकर्याका कळलेला आसल्यामुळे कृषी कायद्यांची पंक्चरा काडुच्यासाटी आता ह्ये जागे झालेत. पन शेतकरी म्हंतहत टायरच बदलूक व्हयो-
आपानु, मुंबयतलो कोरोना तसो आता आटोक्यात इलेलो आसा. पन आजुन तसो सोपलेलो पन नाय हा. काय काय लोक इतके येडझयासारखे बाजारात नि लगनांका -बिगनांका गर्दी करतात की इच्यारता सोय नाय. आनि पार्टे बिर्टे करूक तर कायकाय जन सगळ्यात फुडे. पोलिसानी धाडी मारून ह्या पार्टे बिर्टेवाल्यांच्या बोच्यार फटके मारुक सुर्वात केल्यानी हा परत. त्यामुळा हटेलवाले बोंब मारतहंत- पन नुकसानी काय सगळ्यांचीच होता हा ना कोरोनाच्या मुळा. तेवा हटेलवाल्यानी पन ही परिस्थिती समजान घेवक व्हयी. संचारबंदी परवाडली पन परत लॉकडाऊन नको, असा सगळे म्हंतहत. कोरोना आज ना उद्या खतम होतलोच. नी आपा तुमचा पन हटेल तुमी उगडतलास- मी पन परत कंत्राटदाराकडे परत मुकादमकीच्या कामार हजर होतलंय- तोपर्यात देवाक काळजी! आयेला शिरसाषटांग नमस्कार. लिवनार्याचा वाचनार्यास नमस्कार.
आपला थोरला,
बापू धोंडू पेडणेकर.