अभिनेता सुशांत सिंग राजपूत शांत स्वभावाची आणि चांगली व्यक्ती होती. सर्वांना तो आवडायचा, लोकही त्याच्यावर प्रेम करायचे. मुख्य म्हणजे ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात त्याने केलेले काम कौतुकास्पद असून चित्रपटातील त्याचा सोज्वळ चेहरा सर्वांच्याच कायम लक्षात राहील, अशा शब्दांत न्यायमूर्ती एस एस शिंदे यांनी सुशांतची आज प्रशंसा केली.
सुशांतची एक बहीण दिल्लीतील डॉक्टराच्या मदतीने बनावट डिस्क्रिप्शनच्या आधारे तसेच फेस रेकॉर्ड तयार करत सुशांतला औषध देण्याचा प्रयत्न करत होती असा आरोप रियाने केला असून याप्रकरणी पोलिसांनी 7 सप्टेंबर रोजी सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंग आणि मीतू सिंग या दोघींसह डॉ तरुण कुमारवर गुन्हा दाखल केला.
हा गुन्हा रद्द करण्यात यावा तसेच सीबीआयने कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी करत प्रियंका आणि मीतू ने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद र्किणक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.