टीआरपी घोटाळ्यासंदर्भात पुढील सुनावणी होईपर्यंत रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या संस्थेतील इतर कर्मचाऱयांवर कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, असे राज्य सरकारनं बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. असे असले तरी या प्रकरणात पोलिसांना सबळ पुरावे सापडले असल्याची माहिती सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला दिली आहे.
रिपब्लिक टीव्हीच्या टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्राविरोधात अर्णब गोस्वामी यांच्यासह इतरांनी दाखल केलेल्या विविध याचिकांवर बुधवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकाकर्त्यांचे वकील काही अपरिहार्य कारणास्तव सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे अर्णबसह इतर आरोपींवर तूर्तास कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही. मात्र, या प्रकरणात पोलिसांना आता सबळ पुरावे मिळाल्यामुळे पुढील सुनावणीनंतर कारवाई न करण्याबाबत कोणतीही ग्वाही देण्याच्या विचारात मुंबई पोलीस नाहीत.
फक्त वैद्यकीय कारण अनिवार्य असल्यामुळे पुढील सुनावणीपर्यंतच आम्ही वेळ देऊ शकतो असे राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच या प्रकरणाचा तपास सुरूच राहणार असून त्या तपासाबाबतचे अहवाल वेळोवेळी न्यायालयात सादर करण्यात येतील अशी माहितीही सिब्बल यांनी खंडपीठाला दिली.