डिप्लोमानंतर थेट द्वितीय वर्ष इंजिनीयरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने यंदा प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळत आहे. सुमारे 5 हजार 700 हून अधिक विद्यार्थी हे विविध अभ्यासक्रमात 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे आहेत. त्यातच ऑल इंडिया कौन्सिल फाँर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी राखीव असलेला जागांचा कोटा 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणल्याने कॉलेजमध्ये प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सरासरी 3 ते 6 जागाच उपलब्ध आहेत.
गेल्या वर्षी डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 1 हजार 200 इतकी होती. पण यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन पार पडलेल्या परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थ्यांना 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुणांची लॉटरीच लागली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या पाहता एआयसीटीईकडे जागांचा कमी केलेला कोटा 13 जानेवारीला जाहीर होणाऱया पहिल्या प्रवेश फेरीपूर्वी वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे वांदे
संवैधानिक आरक्षणानंतर द्वितीय वर्ष इंजिनीयरिंग प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध जागा कमी झाल्या आहेत. एकूण 61 हजार 893 विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षाच्या बीटेक आणि बीई अभ्यासक्रमाच्या उपलब्ध 76 हजार 266 जागांसाठी नोंदणी केली आहे.