गुजरातच्या सूरत जिल्ह्यात मांगरोलमध्ये टेक्सटाईल पार्कमधील एका कंपनीत कुख्यात नक्षलवादी ओळख लपवून तीन वर्षांपासून काम करत होता. या फॅक्टरीमध्ये सैन्यदलातील जवानांसाठी बुलेटप्रुफ जॅकेट, हेल्मेट, पॅराशूटचे कापड बनवण्यात येते. संरक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या फॅक्टरीत नक्षलवादी तीन वर्षांपासून काम करत असल्याचे उघड झाल्याने अशा फॅक्टरीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. झारखेड पोलिसांनी या नक्षलवाद्याला अटक केली आहे.
झारखंडच्या नोडीया बाजार परिसरातील या नक्षलवाद्यावर बॉम्बस्फोट घडवणे, शस्त्रास्त्रे बाळगणे आणि हत्येचे असे एकूण 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे नाव गुड्डू सिंह असून तो 2013 मध्ये गुजरातमध्ये आला होता. झारखंड पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, ओळख लपवून संरक्षण क्षेत्राशी संबंधीत फॅक्टरीत काम करत असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत होता.
गुड्डू सिंहने वापीतील कुसुमनगर कॉर्पोरेट कंपनीतून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने कपड्यांच्या गुणवत्तेवर लक्ष देण्याचे काम सुरू केले. त्यानंतर तो मांगलोरला आला. येथील सैन्य दलातील जवानांसाठी बनवण्यात येणाऱ्या कपड्यांच्या गुणवत्तेवर देखेरेख ठेवण्याचे काम तो करत होता. गेल्या अनेक वर्षांपासून झारखंड पोलीस त्याचा शोध घेत होते.
सौजन्य : दैनिक सामना