तुझ्या पोतडीतून काहीही निघतं का रे? अनेक भावाबहिणींच्या म्हणजे गेलेल्या नोकर्या परत येतील? कापलेला पगार? बुडालेली बँकांची कर्ज? आणि शेतमालाला योग्य किंमत? पडलेला रुपया? सरकारी तिजोरीत पैसा? कोणीही कोणाशीही लग्न करून दंगली होणार नाहीत, अशी सोय करता येईल तुला? चीन माघारी जाईल? सियाचेनवरच्या सैनिकांना थोडी ऊब पाठवू शकतोस? नाही म्हणजे देतोच आहेस म्हटल्यावर मागण्या कशा भराभरा सुचत जातात…
प्रिय संताजी,
असा दचकू नको! जगभरात तुला ज्या नावाने ओळखतात, ते मला माहित्ये. पण तुला आठवतंय का, तो कुठलासा फ्रेंच राजपुत्र म्हणाला होता, की ‘राज्य मिळत असेल तर मी कॅथॉलिक व्हायला तयार आहे.’ तसं या देशात तुला सगळीकडे मोकळेपणी वावरायचं असेल, तर स्वतःला संताजी म्हणवून घे. कारण काय आहे नं, तू तर काही शे वर्षं बुढ्ढा आहेस रे, पण आमच्याकडे सध्या जन्माला न आलेल्या अर्भकालाही आईच्या पोटातून स्वतःच्या धर्माची खात्री द्यावी लागते. तेव्हा तुझ्या जीवाची रिस्क कशाला? म्हणून या वर्षापूरता तू आपला संताजीच बरा, नाही का?
तर तुझ्याकडे आमच्या अगदी पारंपरीक पध्द्तीने नवस बोलायला हे पत्र आहे. तशी बरीच जणं गार्हाणं घालणार आहेत. आणि बहुतेकांची आर्जवं कोरोनापासून मुक्ती मिळावी, लस लवकर बाजारात यावी, तिचे दुष्परिणाम होऊ नये, परवडणार्या दरात (निवडणुका नसतील तरी!) ती सगळ्यांना मिळावी, ही असणारच आहेत. पण संता, माझं अजून एक मागणं आहे. अर्रे हा कोरोना सुरू झाल्यापासून नं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना दादागिरी करायची हौस आलेली होती. सोसायटीच्या सेक्रेटरींना कॉलनी म्हणजे जेल बनवायची होती. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली, तरी ग्रामपंचायतीना दुकानं बंद ठेवायची होती. सरकारने नको सांगितलं, तरी कंपन्यांना कामावर बोलावायचं होतं. आणि विरोधक नको म्हणत असले, तरी केंद्राला गरिबांना मैलोनमैल चालवायचं होतं. महामारीच्या काळात म्हणजे हे घरोघरी फुकट फौजदारकी करणारे चौकीदार उपटले होते आणि त्यांच्या स्वयंघोषित दरडावणीने आम्ही अगदी जेरीला आलेलो होतो. तेव्हा संताबाबा, या खेपेला या सगळ्यांना तुझ्या पोतडीतून थोडी थोडी सबुरी दे. साथीच्या काळात एकमेकांना सांभाळून घ्यावं, म्हणावं. धाकात ठेवू नये!
कोरोनाच्या निमित्ताने आठवलं. ही महामारी आली आणि आमची माध्यमं, फेबु आणि व्हाट्सअप्पचे तर्कतीर्थ, विचारवंत यांना आरोग्यसेवेबद्दल जाग आली. मग बेड मिळत नाहीत, इथपासून ते प्रेत हॉस्पिटलमध्ये पडलेलं होतं, इथपर्यंत बातम्या बनल्या, त्याबद्दल सामूहिक चीड झाली. पण हा विचार कोणी केला नाही संताभाऊ, की आपल्याकडे मुळातच आरोग्याकडे कित्येक वर्षं दुर्लक्ष झालंय.
आपल्याकडच्या विद्वानांपासून कॉर्पोरेटपर्यंत प्रत्येकाला इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा म्हणजे फक्त रस्ते, सिंचन आणि मोबाईल वाटतो. डॉक्टर अधिक हवे, हॉस्पिटल हवी, आरोग्यकेंद्र हवी, याचा विचार कोणी केलेलाच नाही आत्तापर्यंत. मग अचानक साथ आल्यावर दुसरं काय होणार? आपण आपके सरकारला सवयीने शिव्या घालून मोकळे!
खरंतर इतक्या वर्षांचा बॅकलॉग असताना महाराष्ट्राच्या नवख्या मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती जी हाताळली, ती उत्तमच म्हणायला हवी. पण साथ संपली की पत्रकार, विचारवंत, कॉर्पोरेट वगैरे या गोष्टींकडे पुन्हा दुर्लक्षच करणार आहेत. आणि राज्याला आरोग्यसेवांचं महत्व कितीही पटलं, तरी केंद्र हक्काचा पैसाच सोडत नाही. तेव्हा या खेपेला बाबाजी, तूच तुझ्या पोतडीतून या महाराष्ट्राला पाच पंचवीस हॉस्पिटलं आणि शंभर दोनशे तरी आरोग्यकेंद्र दे. म्हणजे दुर्दैवाने आलीच परत वेळ, तर आम्ही तयार राहू!
पोतडीवरून आठवलं. आम्ही ऐकलंय संताजीपंत, की तुम्ही म्हणे रात्री आम्ही झोपेत असताना येऊन उशाशी गिफ्ट ठेवता. यावेळेला एक आयडिया देऊ का? या खेपेला आम्ही झोपेत असताना हळूच उशाशी असलेला मोबाईल, एक दिवसासाठी काढून न्या! म्हणजे काय आहे, आम्ही तंत्रज्ञानाच्या बाजूनेच आहोत आणि मोबाइलने आम्हाला खूपच फायदे करून दिलेत, हे शंभर टक्के मान्य. पण झालंय काय, या हातभर खेळण्याने आमचा दिवसभर खाल्लाय. फोटो काढला नाही तर समोरच्या ताटात असलेलं घशाखाली उतरत नाही. लाईक्स आले नाही, तर मैत्री झूट वाटायला लागते. `जेवला का’, म्हणून फोन आला नाही, तर बायको गेली कुठे म्हणून नवर्याला काळजी पडते. लहानी पोरं रडायला लागली, तर `घे फोन आणि बस गप’ करतो आम्ही. आमचं सगळं विश्वच या बोटांत अडकलंय. भावाभावांच्या भांडणापासून देश चालवण्यापर्यंत, सगळ्या समस्या आम्हाला त्या स्क्रीनवर सोडवायच्या आहेत. आणि त्या सुटायच्या राहो, अजून अजून वाढतायत!
तेव्हा मी काय म्हणतो, एक दिवस तरी आम्हाला नाताळचा डिजिटल उपास घडला, तर डोक्यात पचन थोडं बरं नाही का होणार? वाटलं तर परत देताना मॉडेल जरा अपग्रेड करून दे, म्हणजे झालं!
तुझ्या पोतडीतून काहीही निघतं का रे? अनेक भावाबहिणींच्या म्हणजे गेलेल्या नोकर्या परत येतील? कापलेला पगार? बुडालेली बँकांची कर्ज? आणि शेतमालाला योग्य किंमत?पडलेला रुपया? सरकारी तिजोरीत पैसा? कोणीही कोणाशीही लग्न करून दंगली होणार नाहीत, अशी सोय करता येईल तुला? चीन माघारी जाईल? सियाचेनवरच्या सैनिकांना थोडी ऊब पाठवू शकतोस? नाही म्हणजे देतोच आहेस म्हटल्यावर मागण्या कशा भराभरा सुचत जातात…
पण या डिमांड जरा गंभीर होतायत का रे? असं काही नाही, फुटकळ फुटकळ गोष्टीही खूप आहेत मागण्यासारख्या म्हणजे लॉकडाऊनमध्ये घरी राहिला असशीलच, तर आमच्यासारख्या तूही वेबसिरीज खूप पाहील्या असशील. आता येशील, तर एक जरा सुटसुटीत साधी सिरीज आणता आली तर पाहशील का? तिच्यात दर १० मिनिटांनी रक्तबंबाळ खून पडला नाही, तर बरं होईल. सलग चार पाच एपिसोड सगळ्याच्या सगळ्या स्त्रियांनी (आणि पुरुषांनीही!) आपापले कपडे आपापल्याच अंगावर ठेवले तर फारच उत्तम आणि संपूर्ण मालिकेत कोणीही कोणाच्याही आईवडील-भावाबहिणींचा उद्धार केला नाही, तर भरूनच पावू. तुला वाटतंय, पण अशाही मालिकेला येईल बघ चांगला प्रतिसाद (आणि नाहीच आला, तर टीआरपी कुठून म्यानेज करायचा, तुला माहिती आहेच)!
संताजीराव, या वर्षाने आमचं खूप काही नेलं. अर्थव्यवस्था आधीच घायाळ होती, लॉकडाऊनने ती पार झोपवली. पगार कापले, नोकर्या नेल्या, धंदे बसवले. जवळची लोकं अचानक कोरोना भुताने उचलली आणि दूरची असली तरी आपली वाटणारी इरफानपासून सुशांतपर्यंत अनेक माणसं गेली. तू तरी कोणाकोणाला कायकाय देणार? पण एवढं सगळं तुझ्याकडे मागितलं, ते आपलं मन की बात करण्यासाठी तू सगळं देऊ शकशील असंही नाही. बस तू तुझ्या जादुई पोतडीतून आमचा हुरूप वाढवायला काहीतरी दे. एखादं चॉकलेट चालेल, किंवा छानसं फूल, किंवा खेळणं, नाहीतर अगदी चविष्ट शेवपुरी असली तरी हरकत नाही आम्हाला पक्की खात्री आहे, `अगला साल हमारा है’. पण एक बर्फ़ाळ, पांढर्याशुभ्र दाढीतला म्हातारा, डोळे मिचकावत, रात्री आमच्या खिडकीत असं काही सोडून जाईल, या कल्पनेनेच आम्हाला जो थोडा जोश, थोडा उत्साह येईल. आणि तेव्हढासुद्धा येत्या वर्षी पुरून जाईल!
तुझाच,
निर्ढावलेला आशावादी!
(विंदांची परवानगी गृहीत धरून!)