नव्या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली की लोक तो सिनेमा पाहायला गर्दी करतात हे जुने समीकरण आहे. पूर्वीपेक्षा हल्ली सोशल मिडीयामुळे सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवता येऊ शकते. या माध्यमात मिळणाऱ्या अपडेट्समुळे प्रेक्षकांची आतुरता वाढते. यामुळे सेलिब्रिटी आणि चाहत्यांमधले अंतरही कमी व्हायला लागले आहे. आता हेच पाहा ना… अभिनेता ललित प्रभाकरने सई ताम्हणकर हिच्यासोबतचा आपला एक फोटो नुकताच शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शनही भन्नाट टाकले आहे. फोटोत सई आणि ललित वटवृक्षाखाली आपली पटकथा वाचत आहेत.
ललित म्हणतो, ‘कनेक्शन… बोले तो जड़ से मजबूत… तू कमालच आहेस सई ताम्हणकर…’ विशेष म्हणजे ललित प्रभाकर एका आगामी सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सई ताम्हणकरसोबत दिसणार आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’ फेम दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांच्या ‘कलरफुल’ या नव्या सिनेमात सई आणि ललित ही जोडी झळकतेय. यापूर्वी सई व ललित हे दोघेजण ‘मिडीयम स्पायसी’ या सिनेमात एकत्र आले होते. पण लॉकडाऊनमुळे तो सिनेमा प्रदर्शित होऊ शकलेला नाहीये.