मेलबर्नच्या मैदानावर टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. या विजयात कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यासह अष्टपैलू रवींद्र जाडेजा याचेही मोलाचे योगदान राहिले. जाडेजाने पहिल्या डावात रहाणेसोबत 121 धावांची भागिदारी केली. या लढतीत त्याने पहिल्या डावात 57 धावा केल्या आणि सामन्यात 3 बळीही घेतले. यासह त्याच्या नावावर एका खास विक्रमाचीही नोंद झाली.
‘बॉक्सिंग डे’लढतीपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजा घेऊन मायदेशी परतला आणि त्याच्या जागी कोणाला संधी द्यायची हा पेच निर्माण झाला. विराटच्या जागी के.एल. राहुलच्या नावाची चर्चा सुरू असताना संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराने अष्टपैलू जाडेजावर डाव खेळला. जाडेजाचा हा 50 वा कसोटी सामना होता. माजी कर्णधार एम.एस. धोनी, विराट कोहली यांच्यानंतर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये 50 हून अधिक सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.
या लढतीनंतर रवींद्र जाडेजाने ट्वीट करत या विक्रमाची माहिती दिली. ‘माही भाई आणि विराटसोबत क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये 50 हून अधिक सामने खेळण्याचा विक्रम शेअर करणे सन्मानाची गोष्ट आहे. बीसीसीआय, माझे सहकारी आणि संघ व्यवस्थापकाने माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. आशा आहे हे पुढेही असेच सुरू राहिल. जय हिंद’, असे ट्वीट जाडेजाने केले आहे.
कारकीर्द
रवींद्र जाडेजा याने 2009 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 50 कसोटी, 50 टी-20 आणि 168 एक दिवसीय लढतीत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटीत त्याने 216, एक दिवसीयमध्ये 188 आणि टी-20 मध्ये 39 बळी घेतले आहेत. तसेच कसोटीत त्याच्या नावावर 1926, एक दिवसीय क्रिकेटमध्ये 2411 आणि टी-20 मध्ये 217 धावांची नोंद आहे.
सौजन्य- सामना